मुंबई : रत्नदुर्ग किल्ल्यालगत असलेल्या भाटकरवाडा येथील समुद्रात टेहळणी पाणबुरूजाजवळ भराव टाकून अतिक्रमण केले गेले आहे. या अतिक्रमणांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शासन कारवाई करणार का? असा सवाल भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात लक्षवेधीद्वारे उपस्थित केला.
लक्षवेधीवर बोलताना दरेकर म्हणाले की, रत्नदुर्ग किल्ल्यालगत भाटकरवाडा आहे. तेथे समुद्रात टेहळणी पाणबुरूजाजवळ भराव टाकून अतिक्रमण केले गेले. पेठ किल्ल्यातील ग्रामस्थांनी बंदर विभाग आणि रत्नागिरी नगर पालिकेकडे अतिक्रमणासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही. पोलिस निरीक्षकांनी बैठक घेतली. पण कारवाई झाली नाही. तिथे श्री भगवती मातेचे मंदिर आहे. बुरूजाच्या आजुबाजूला माती दगडांचा भराव टाकला गेला. अनधिकृत घरे उभारली गेली. मंजूर रस्ता होईल तेव्हा हे अतिक्रमण काढले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हा बुरूज आणि परिसर बंदर विभागाच्या अधिकार क्षेत्रात असला तरी रत्नागिरी पालिकेची ही जबाबदारी आहे. बुरुजाच्या पायवाटेवर अनधिकृत बांधकामे असून राजापूर हद्दीतील मजारीचे बांधकामही आढळून आलेय. त्यामुळे रस्ता मंजूर झाल्यानंतर अतिक्रमणे काढली जातील, असे ज्या प्रशासनाकडून सांगितले जात आहे, त्यांच्याविरुध्द सरकार कारवाई करणार का? हे सर्व अतिक्रमण किती दिवसात काढले जाईल? अतिक्रमणांना अभय देणाऱ्याअधिकाऱ्यांविरुध्द सरकार कारवाई करणार आहे का? असे प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केले.
दरेकरांच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. माझ्या मतदारसंघातील हा प्रश्नआहे. तेथे रस्ता आहे पण डीपीमध्ये आहे. सध्या डीपीचे आरक्षण पडले असून कुणालाही पाठीशी घालणार नाही. बुरुजावर कुठेही अतिक्रमण नाही. राजापूर येथे मजारीचे बांधकाम दोनशे वर्षांपूर्वीचे आहे. तिथे सूर्यमंदिर होते का याची चौकशी केली असता ते नसल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले.