मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागा'च्या (झेडएसआय) शास्त्रज्ञांनी अरुणाचल प्रदेशमधून खवले मांजराच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे (New species of pangolin). यापूर्वी भारतात केवळ भारतीय आणि चायनीज खवले मांजर या दोन प्रजाती सापडत होत्या (New species of pangolin). या शोधामुळे भाारतातील खवले माजंऱ्याच्या प्रजातीमध्ये भर पडली आहे. (New species of pangolin)
खवले मांजर हा जगातील सर्वात जास्त तस्करी होणारा वन्यजीव आहे.अशा परिस्थितीत संशोधकांनी या वन्यजीवाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. यासंबंधीचे वृत्त जर्मनीच्या जर्नल मॅमॅलियन बायोलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहे. या नव्या प्रजातीला मॅनिस इंडोबर्मनका असे शास्त्रीय नाव देण्यात आले असून इंडो-बर्मीज पँगोलिन या सामान्य नावाने ती ओळखली जाईल. ही प्रजात आशियाई खवले मांजरांमधील एक प्रजात म्हणून यापुढे ओळखली जाईल. चायनीज खवले मांजरासोबत ही प्रजात बरीच साधर्म्य साधत असल्याने तिच्या अस्तित्वाविषयी शंका होती. मात्र, गुणसूत्र तपासणीनंतर या प्रजातीचे गुणसूत्र चायनीज खवले मांजरापेक्षा ३.८ टक्के वेगळे असल्याचे समोर आले आहे. झेडएसआयच्या शास्त्रज्ञांच्या निष्कर्षांनुसार, ही प्रजाती सुमारे ३.४ दशलक्ष वर्षांपूर्वी चायनीज खवले मांजरापासून वेगळी झाली.
मार्च, २०२४ साली अरुणाचल प्रदेशमधील पूर्व सियांग जिल्ह्यातील सिल्लुक गावात काम करत असताना शास्त्रज्ञ लेन्रिक कोन्चोक वांगमो यांना गावकऱ्यांनी पकडलेले खवले मांजर आढळले. या प्राण्याचा शरीराचे नमुने गोळ करुन, फोटो काढून त्याला डेइंग एरिंग मेमोरियल वन्यजीव अभयारण्याच्या बोरगुली रेंजमध्ये सुरक्षितपणे सोडण्यात आले. ही प्रजात सध्या अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांमध्ये असण्याची आणि शक्यता आहे. ही प्रजात चायनीज खवले मांजराच्या अधिवासाचा विस्तार असणाऱ्या पश्चिमेकडील भागात आढळते. पूर्व नेपाळ, ईशान्य भारत आणि वायव्य म्यानमारमध्ये या प्रजातीचा अधिवास असण्याची शक्यता आहे. भारतात ही प्रजात अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग, पापुम पारे, अप्पर सुबानसिरी, पूर्व सियांग, अप्पर सियांग, लोअर दिबांग व्हॅली आणि आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात आढळते. या प्रजातीच्या खवल्यांचा रंग गडद तपकिरी आणि गडद हिरवट तपकिरी आहे. चेहऱ्याचा रंग गुलाबी आहे. इतर आशियाई खवले मांजरांप्रमाणे या प्रजातीच्या संपूर्ण शरीरावर देखील पिंजारल्यासारखे केस आहेत.