इन्कम टॅक्स रिटर्न भरताना...

    20-Jun-2024
Total Views | 40
income tax return filing


जून महिना म्हणजे चाकरमान्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा महिना. गेली अनेक वर्षे पगारदार करदाते हे वार्षिक पगाराचा व टॅक्स भरल्याचा दाखला, म्हणजेच ‘फॉर्म 16’ची आतुरतेने वाट पाहत असतात. त्या फॉर्ममधील माहितीवरूनच आयकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) भरत असू. परंतु, आता परिस्थिती खूपच निराळी असून, यामध्ये आणखीन काही नियमांची भर पडली आहे. त्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊया...

'फॉर्म 16’ बरोबरच इन्कम टॅक्स पोर्टलवरून मिळणारा ‘फॉर्म 26 एएस’ हा पण एक महत्त्वाचा भाग. तो देखील कमी पडला की काय, हे समजायच्या आधीच नवीन माहितीपत्रक म्हणजे ‘एआयएस’ (अ‍ॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट) हे सर्वात महत्त्वाचे मानावे लागते.mगेली काही वर्षे आपण सर्व खूश होतो की, आपला आयकर परतावा लगेच मिळू लागला आहे आणि ते खरेही आहे. परंतु, ‘एआयएस’च्या वाढत्या महत्त्वामुळे रिटर्न भरणे आता पूर्वीएवढे सुलभ होणार नाही, हे नक्की.,‘एआयएस’मध्ये करदात्याने केलेल्या आर्थिक व्यवहारांची जी काही रक्कम आहे, ज्यावर आगाऊ कर कापला गेला आहे, त्यापेक्षा कमी रक्कम करदात्यांनी रिटर्नमध्ये जाहीर केली असेल तर, ‘एआयएस’मधील जादा रकमेनुसारच त्याच्या रिटर्नची छाननी होईल, अशी तरतूद आयकर खात्याच्या ‘32 बी ए’ नियमामध्ये केली गेली आहे. म्हणून पूर्वी करदाता कागदपत्रे गोळा करण्यासाठी जी मेहनत घेत होता, तशीच मेहनत आता त्याला रिटर्न भरण्यापूर्वी घ्यावी लागेल.

आयकर खात्यास अनेक प्रकारची माहिती डिजिटल मीडियामधून प्राप्त झाल्यामुळे, ती माहिती बरोबर आहे किंवा नाही, याबाबत आता करदात्यास स्वतःच काम करावे लागणार आहे. कसे ते पाहू. तत्पूर्वी आपल्याला ‘एआयएस’ची मांडणी आधी समजावून घेणे आवश्यक आहे, ‘एआयएस’ हे पत्रक दोन भागांत विभागले आहे. पहिला भाग म्हणजे ‘पार्ट ए’मध्ये करदात्याचे नाव, जन्मतारीख, घरचा पत्ता, टेलिफोन नंबर वगैरे अशी वैयक्तिक माहिती असते. ‘बी’ विभागात उपविभाग असतात. पहिल्या उपविभागात ‘टीडीएस’चे विवरण असते. त्यात तुमचा टॅक्स कोणी कापला, कोणत्या प्रकारच्या उत्पन्नावर आणि किती रकमेवर कापला अशी माहिती असते. तसेच तुमच्या वतीने कोणी किती ‘टीसीएस’ केला आहे, हे देखील लिहिलेले असते. अर्थात, ही माहिती आयकर विभागाला टॅक्स कापलेल्या व्यक्तीने दिलेली असल्याने चुकीचीदेखील असू शकते.

दुसर्‍या उपविभागात 'Statement of Financial Transactions' (एसएफटी)ची यादी असते. त्यामध्ये करदात्याने वर्षभरात जे निरनिराळे आर्थिक व्यवहार केलेले असतात, त्याची माहिती असते. mहा अत्यंत महत्त्वाचा उपविभाग आहे. कारण, जर या विभागात जे व्यवहार नोंदविलेले असतात, त्यामधून जी रक्कम करदात्याला मिळाली आहे, त्याची पडताळणी त्यांनी भरलेल्या रिटर्न्सही केली जाते आणि त्यानुसार ज्या प्रमाणात रिटर्नमधील उत्पन्न आणि आय रक्कम ‘एआयएस’पेक्षा कमी असेल, त्या प्रमाणात करदात्यास त्याच्या ‘टीडीएस’ कमी वापरण्यास दिला जातो.

त्याचप्रमाणे करदात्याने दाखविलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणापेक्षा जास्त रकमेच्या इतर उलाढाली केल्या असतील, म्हणजे उत्पन्न 15 लाख आणि बँकेतील मुदत ठेवी 25 लाख असतील, तर त्याचा खुलासा करदात्याकडून विचारला जाऊ शकतो. म्हणून, आता जरी ऑनलाईन पद्धतीने रिटर्न भरणे सोपे झाले असले, तरी त्यामागची तयारी करणे जास्त महत्त्वाचे झाले आहे. त्याकरिता खाली सुचविलेल्या गोष्टी उपयोगी पडतील.

1.पहिल्या उपविभागात असलेल्या सर्व नोंदी तुमच्याकडील रेकॉर्ड्सप्रमाणे बरोबर आहेत का, ते तपासणे आवश्यक आहे. कारण, जर कोणी प्रत्यक्षात दिलेल्या रकमेहून जास्त रक्कम रिपोर्ट केली असेल, तर तुम्हाला त्या जादा रकमेवर नाहक टॅक्स भरावा लागेल.

2. तुम्ही प्रत्यक्षात जितके व्याज मिळवले असेल, त्यापेक्षा निराळे व्यवहार जर ‘एफटी’मधील रेकॉर्ड्सवरून दिसून आले, तर तुम्हाला त्या जादा रकमेवर नाहक टॅक्स भरावा लागेल.

3. प्रत्यक्षात विकलेल्या शेअरच्या किमतीपेक्षा जास्त रक्कम जर शेअर ब्रोकरने दाखवली असेल तर, तुमचे ’LTCG STATEMENT’ चुकीचे धरले जाईल आणि अधिक माहितीसाठी नोटीस येण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे तुमच्या ‘टीडीएस’वर गदा येण्याची शक्यता दाट आहे.

4. जर तुम्ही व्यावसायिक असाल आणि तुम्ही ‘टीडीएस’ तक्त्यामध्ये दाखवलेली रक्कम ‘26 ए एस’पेक्षा कमी असेल, तर तुमचे रिटर्न हे चुकीचे म्हणजे ’Defective’ म्हणून बाद होईल.

या सर्व कारणांमुळे आयकर विवरण म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरावयाच्या आधी आपल्या करसल्लागाराबरोबरही सखोल चर्चा करणे आवश्यक आहे. लक्षात असू द्या की, डिजिटल युगामध्ये मशीन म्हणते तेच खरे मानले जाते. डिजिटल युगामध्ये संवाद मशीनबरोबर असतो, म्हणून तो अत्यंत काटेकोरपणे करावा लागतो. चुकीची दुरुस्ती खूप महाग पडते.

सी. ए. अतुल दोंदे
(लेखक व्यवसायाने सनदी लेखापाल आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121