राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुंबई ‘मेट्रो 3’च्या दुसर्या टप्प्यातील आचार्य अत्रे चौक, वरळी ते बीकेसी या मार्गिकेचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी येत्या वर्षभरात मुंबईत 100 किमी मेट्रोचे जाळे कार्यान्वित होणार असल्याचीही माहिती दिली. याच पार्श्वभूमीवर येत्या वर्षभरात कार्यान्वित होण्याच्या मार्गावर असणार्या आणि कार्यान्वित झालेल्या महामुंबईतील मेट्रो नेटवर्कच्या सद्यस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...
ग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात अवघी 11 किमीची मेट्रो मुंबईत धावली. मात्र, 2014 साली राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने मुंबईत मेट्रो नेटवर्कचा (मुंबई मेट्रो स्टेशन) विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए) मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) 337.1 किमी लांबीचे 12 मार्गांचे एक व्यापक मेट्रोचे जाळे साकारत आहे. यापैकी 67.16 किमी लांबीच्या चार मार्गिका (22.46 किमी भूमिगत अॅक्वा लाईन-3 सह) कार्यरत आहेत, तर 165.7 किमी लांबीच्या आठ मेट्रो मार्गिका बांधकामाच्या विविध टप्प्यांत आहेत, तर उर्वरित कॉरिडोर अद्याप नियोजन आणि निविदा प्रक्रियेत आहेत. डिसेंबर 2025 पर्यंत मुंबई 100 किमीचे मेट्रो नेटवर्क पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या मेट्रोच्या जाळ्यामुळे मुंबईतील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर मुंबईकरांचा प्रवासातील वेळ वाचून त्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकारक होणार आहे.
मेट्रो-1 : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर : 11.40 किमी
महाराष्ट्रातील आणि मुंबईतीलही पहिला मेट्रो प्रकल्प म्हणजे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर. या 11.40 किमीच्या मेट्रो प्रकल्पाला तत्कालीन केंद्र सरकारने दि. 19 ऑगस्ट 2004 मध्ये प्राथमिक मान्यता दिली होती. 2006 मध्ये तत्कालीन राज्य सरकारने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मुंबई ‘मेट्रो-1’ मार्गाला परवानगी दिली. मात्र, प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम फेब्रुवारी 2008 मध्ये सुरू झाले. पुढे 2011 साली मेट्रोच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली आणि दि. 8 जून 2014 मध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. पुढे वर्ष 2019 मध्ये ही मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू झाली. या प्रकल्पासाठी एकूण 2 हजार, 356 कोटी रुपये खर्च आला. पूर्वी वर्सोवा ते घाटकोपर हे अंतर पार करण्यासाठी 71 मिनिटे लागत होती. पण, मेट्रोच्या मदतीने हे अंतर आता अवघ्या 21 मिनिटांत पार करता येते. वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान एकूण 12 स्थानके असून, 2031 पर्यंत या मार्गावरून दैनंदिन आठ लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.
मेट्रो-2 अ : दहिसर - डीएन नगर : 18.6 किमी
मुंबई ‘मेट्रो 2 अ’ ही दहिसर ते डीएन नगर अशी 18.6 किमी लांबीची मेट्रो मार्गिका असून, या मार्गावर एकूण 17 उन्नत स्थानकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 11 डिसेंबर 2014 मध्ये मेट्रो लाईन-2 प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यापैकी ‘मेट्रो-2 अ’ ही मार्गिका डीएन नगर ते दहिसर अशी पश्चिम उपनगराला जोडते. या मार्गाने घाटकोपर ते वर्सोवा ‘मेट्रो-1’, डीएन नगर ते मंडाले ‘मेट्रो-2 ब’, अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) ‘मेट्रो-7’ आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी ‘मेट्रो-6’ यांच्याशी कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. हा मार्ग पश्चिम, मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई दरम्यान जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 2031 पर्यंत या मार्गावरून दैनंदिन आठ-नऊ लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.
मेट्रो-3 : आचार्य अत्रे चौक वरळी ते आरे जेव्हीएलआर : 22.46 किमी
‘मेट्रो-3’ हा मुंबईकरांसाठी एक सर्वाधिक महत्त्वाचा असा प्रकल्प. कुलाबा-वांद्रे-सिप्झ या एकूण 33.5 किमी मार्गिकेपैकी आचार्य अत्रे चौक, वरळी ते आरे जेव्हीएलआर अशी 22.46 किमी मार्गिका मुंबईकरांसाठी खुली झाली आहे. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच, वरळीपर्यंतचा दुसरा टप्पा कार्यान्वित होताच, मुंबईकरांचा या मार्गिकेला प्रतिसाद वाढला आहे. मुंबईकरांना बहुप्रतीक्षित असणारी ही मार्गिका दादर, सिद्धिविनायक, शितलादेवी आणि धारावीसारख्या मुंबईच्या दाटीवाटीच्या आणि वाहतुककोंडीच्या भागांतून जाते. त्यामुळे आता जलद आणि केवळ 60 रुपयांत होणार्या प्रवासामुळे या मार्गिकेला मुंबईकरांचा प्रतिसाद वाढतो आहे. आता या एकूण मार्गिकेपैकी केवळ 10.99 किमीची आचार्य अत्रे चौक ते कफ परेड अशी मार्गिका याच वर्षी सुरु होणे अपेक्षित आहे. ऑगस्ट, 2025 महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण करून हा अंतिम टप्पाही कार्यान्वित करण्याचा ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’चा प्रयत्न आहे. त्यामुळे 2031 पर्यंत या मार्गावरून दैनंदिन 17 लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.
मेट्रो-7 : अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) : 16.5 किमी
अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) ‘मेट्रो-7’ हा एकूण 16.5 किमी लांबीचा मार्ग असून, या मार्गिकेवर एकूण 13 उन्नत स्थानके आहेत. 10.7 किमी लांबीचा आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोयसर, मागाठाणे, देवीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ओवरीपाडा या नऊ स्थानकांसह या मार्गिकेचा पहिला टप्पा दि. 2 एप्रिल 2022 रोजी कार्यान्वित झाला, तर गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी (पूर्व), गोरेगाव (पूर्व) या चार स्थानकांसह या मार्गिकेचा अंतिम टप्पा दि. 19 जानेवारी 2023 रोजी प्रवाशांच्या सेवेत आला. 2031 पर्यंत या मार्गावरून दैनंदिन 6.5 लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.
प्रगतिपथावर असणारे मार्ग
मेट्रो-2 ब : पहिला टप्पा मंडाले ते डायमंड गार्डन - 5.6 किमी
‘मेट्रो-2 ब’ या डीएन नगर - मंडाले मार्गाची एकूण लांबी 23.6 किमी एवढी असून, या मार्गिकेवर एकूण 20 उन्नत स्थानकांचा समावेश आहे. ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए)नुसार, ‘मेट्रा- 2 बी’च्या पहिल्या टप्प्यातील मंडाले ते डायमंड गार्डन या 5.6 किमी मार्गावर पहिल्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. आगामी काही महिन्यांत उर्वरित चाचणी प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ‘मेट्रो रेल सेफ्टी बोर्डा’चे प्रमाणपत्र मिळताच यंदाच्या वर्षभरात या मेट्रोचे दरवाजे मुंबईकरांसाठी खुले होतील. 5.6 किमीच्या मार्गावर पाच मेट्रो स्थानके आहेत. मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक आणि डायमंड गार्डन स्थानकांदरम्यान मुंबईकरांना मेट्रोने प्रवास करता येईल. ही मार्गिका पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनो रेल, ‘मेट्रो-1’ (घाटकोपर ते वर्सोवा), ‘मेट्रो-2 अ’ (दहिसर ते डीएन नगर)शी जोडलेली आहे. याशिवाय, मानखुर्द येथे छशिमट-पनवेल या लोकल उपनगरीय मार्गिकेला याची जोडणी आहे.
‘मेट्रो-9’ आणि ‘मेट्रो 7 अ’ : पहिला टप्पा : काशीगाव ते दहिसर (पूर्व) : 4 किमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच ‘मेट्रो-9’ टप्पा 1 - काशीगाव ते दहिसर (पूर्व) मेट्रोच्या तांत्रिक चाचणीचे उद्घाटन केले. ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने काशीगाव ते दहिसर (पूर्व) या ‘मेट्रो- 9’च्या पहिल्या टप्प्याच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. 2025च्या अखेरीस या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याची ‘एमएमआरडीए’ची योजना आहे. ‘मेट्रो-9’ कॉरिडोर ‘मेट्रो-7’शी जोडलेला आहे. अंधेरी पूर्वेतील दहिसर पूर्व ते गुंदवली ‘मेट्रो-7 अ’ या सध्या कार्यरत असलेल्या रेड लाईन 7चा विस्तार आहे. ‘मेट्रो 7 अ’चा 2.5 किमी मार्ग भूमिगत असेल, तर 0.94 किमी मार्ग उन्नत असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘मेट्रो-7 अ’ म्हणजेच अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-2 या मार्गावरील भूमिगत टनेलचे ब्रेक-थ्रू दि. 17 एप्रिल रोजी पार पडले. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यावर मिरा-भाईंदर ते मुंबई विमानतळापर्यंत मेट्रो मार्ग 9 आणि 7 द्वारे कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. ही मार्गिका डिसेंबर 2026 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. ‘मेट्रो-9’ मार्गावर एकूण आठ स्थानके आहेत. यांपैकी चार मेट्रो स्थानके चाचणीसाठी तयार आहेत, तर उर्वरित चार मेट्रो स्थानकेदेखील पुढील काही आठवड्यांत चाचणीसाठी तयार होतील. मुंबई मेट्रो रेड लाईन 9 ही ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो रेल्वे आहे, जी मीरा रोडपर्यंत धावेल. ही मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होताच 2031 पर्यंत या मार्गावरून दैनंदिन 4.62 लाख नागरिक प्रवास करतील, असा अंदाज आहे.
‘मेट्रो-4’ आणि 4 अ : पहिला टप्पा: कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन
वडाळा-कासारवडवली-गायमुख मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ हा एकूण मार्ग 32.32 किमी लांबीचा मार्ग आहे. या मार्गात एकूण 32 स्थानके असतील. ‘मेट्रो-4’ वडाळ्याहून ठाण्यातील घोडबंदरवरील कासारवडवलीपर्यंत धावणार असून, पुढे कासारवडवली ते गायमुख ‘मेट्रो-4 अ’ हा टप्पाही कार्यान्वित होणार आहे. हा मार्ग सध्याच्या पूर्व द्रुतगती मार्ग, मध्य रेल्वे, मोनोरेल, ‘मेट्रो 2 ब’ (डीएन नगर ते मंडाले), ‘मेट्रो-5’ (ठाणे ते कल्याण) आणि ‘मेट्रो-6’ (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर जोडणी प्रदान करेल. कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन या मार्गावरील मेट्रो डिसेंबर 2025 मध्ये सुरू होणार आहे, तर कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा मार्ग डिसेंबर 2026 आणि गांधीनगर ते भक्तीपार्क, वडाळा हा मार्ग नोव्हेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल. या मार्गावरील पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यान ही मेट्रो धावणार आहे. ही मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होताच, या मार्गावरून दैनंदिन 13.4 लाख नागरिक प्रवास करतील, असा अंदाज आहे.