हरित इमारती निर्माणाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या व्याख्या असल्या, तरी ऊर्जावापर, पाण्याचा वापर, घरातील पर्यावरणीय गुणवत्ता, इमारतीचे उभारण्यात येणार्या जागेवर होणारे परिणाम आणि सामान्यतः इमारतींचे नियोजन, डिझाईन, बांधकाम आणि प्रक्रिया म्हणून सर्वाधिक पर्यावरणपूरक पद्धतीच हरित इमारती म्हणून स्वीकारली जाते. ‘महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण - 2025’ नव्या गृहनिर्माण धोरणात अधिकाधिक पर्यावरणपूरक इमारत उभारणीवर भर देण्यात आला आहे. त्याचा आढावा घेणारा लेख...
महाराष्ट्र सरकारने नीति आयोगाच्या मार्गदर्शनानुसार, आगामी पाच वर्षांत 35 लाख परवडणार्या घरांच्या निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. मात्र, ही गृहनिर्मिती करताना आगामी पर्यावरणीय आव्हाने, जागेची कमतरता आणि अधिकाधिक वर्षे टिकणारी पक्की बांधकामे, यांचा सर्वांगीण विचार करून राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण तयार करण्यात आले आहे. नव्या गृहनिर्माण धोरणात म्हटल्यानुसार, परवडणार्या दरात अधिकाधिक घरांची निर्मिती करण्यासाठी आणि घरांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवे तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण आणि पर्यावरणस्नेही बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. हे तंत्रज्ञान योग्य आहे की अयोग्य, हे ठरविण्याचा संपूर्ण अधिकार हे राज्य सरकारकडे असतील.
भारतासह विविध देशांमध्ये ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेला महत्त्व प्राप्त होताना दिसते. या इमारती बांधकाम आणि नंतर वापरादरम्यान प्रत्येक टप्प्यावर कमीत कमी कचर्याची हमी देतात, ज्यामुळे खर्चही कमी होतो. इमारत बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ‘ग्रीन बिल्डिंग’शी संबंधित तंत्रांमध्ये मातीची धूप रोखण्यासाठी उपाययोजना, पावसाच्या पाण्याचे संचयन, सौरऊर्जेचा वापर, पाण्याचा वापर कमी करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि जागतिक दर्जाच्या ऊर्जा-कार्यक्षम पद्धतींचा वापर यांचा समावेश आहे. मात्र, यासाठी शासकीय पातळीवर प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने हरित इमारतींच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला असून, गृहनिर्माण धोरणात काही महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख केला आहे. तो पुढीलप्रमाणे-
1. हरित इमारतींना प्रोत्साहन
अधिकाधिक इमारती हरित आणि पर्यावरणपूरक व्हाव्यात, यासाठी नवीन बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करणार्या, यातही हरित पद्धती स्वीकारणार्या क्लस्टर प्रकल्पांना ’तंत्रज्ञान नवोपक्रम अनुदान’ देण्यात येईल. हरित इमारतींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रमाणन स्तरांच्या आधारे हरित इमारतींच्या विकसकांना तीन टक्के, पाच टक्के आणि सात टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येईल.
2. पुरस्कार
नावीन्यपूर्ण आणि टिकाऊ बांधकाम तंत्रज्ञान आणि साहित्य वापरून इमारत बांधकाम करणार्या प्रकल्पांना सरकारतर्फे पुरस्काराने गौरविण्यात येईल.
3. निविदा प्रक्रिया
हरित इमारत उभारणीसाठी क्लस्टर पुनर्विकासात सरकार, प्रकल्प विकासासाठी निविदा प्रक्रियेतच नवीन बांधकाम साधनसामग्री आणि नवनवीन बांधकाम तंत्रज्ञानाचा तपशील समाविष्ट करेल.
4. मार्गदर्शन
स्थानिक पातळीवर अद्याप हरित इमारतीबाबत पुरेशी जागरूकता नसल्याकारणाने याविषयक आराखड्यांवर मार्गदर्शनासाठी सार्वजनिक प्राधिकरण, खासगी विकासकांना एक वास्तुशास्त्रीय पुस्तिका आणि साधनसामग्री व तंत्रज्ञान पर्याय सूचविणारी एखादी एजन्सी नेमण्यात येईल.
5. गुणवत्ता नियंत्रण
उच्च दर्जाच्या बांधकामासाठी मृदापरीक्षण, संरचनात्मक स्थिरता, साहित्याची गुणवत्ता आणि भूकंप प्रतिरोधकता यांसारख्या तांत्रिक बाबींचा अवलंब करण्यात येईल. जगभरात उपलब्ध असणारे सर्वोत्कृष्ट बांधकाम तंत्रज्ञान महाराष्ट्रात गृहनिर्माण क्षेत्रात मुख्य प्रवाहात वापरात आणणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान शाश्वत, आपत्ती प्रतिरोधक, किफायतशीर आणि वेगवेगळ्या भू-हवामान स्थितीसाठी योग्य असेल.
हरित इमारत म्हणजे काय?
‘हरित इमारत’ ही संकल्पना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साहित्याच्या वापरावर लक्ष केंद्रित करते. या संकल्पनेनुसार बांधलेल्या घराचा पर्यावरणावर तसेच इमारतींमध्ये दररोज राहणार्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव पडू शकतो. ‘ग्रीन बिल्डिंग’ म्हणजे इमारतीच्या संपूर्ण जीवनचक्रात नैसर्गिक घटकांचा समावेश करून प्रभावांना नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न होय. इतर संबंधित विषयांमध्ये शाश्वत डिझाईन आणि हरित वास्तुकला यांचाही समावेश आहे. भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता, वर्तमान पिढ्यांच्या गरजा पूर्ण करणे अशी शाश्वतता ‘हरित इमारत’ ही संकल्पना परिभाषित करते. ऊर्जा, पाणी तसेच भौतिक संसाधनांचे संवर्धन आणि निर्मिती करणार्या अधिक आरोग्यदायी, सुरक्षित आणि आरामदायी असलेल्या इमारतींच्या डिझाईन आणि बांधकामासाठी ‘हरित इमारत’ ही एक संपूर्ण प्रणाली आहे. हरित इमारतींचा विचार करताना अनेकांना सौर पॅनेलचा विचार येतो. मात्र, आपल्या घरांपासून ते गगनचुंबी इमारतींपर्यंत सर्व बांधकाम हे शाश्वत नाही, या जाणिवेला हरित इमारत प्रतिसाद देते. आजकाल अनेक आरोग्य समस्या हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेमुळे आणि सामान्यतः वापरल्या जाणार्या बांधकाम उत्पादनांमध्ये असलेल्या विषारी पदार्थांच्या संपर्कामुळे उद्भवतात. ‘हरित इमारत’ पद्धती या आरोग्य-हानीकारक परिस्थितीला दूर करू शकतात.
हरित बांधकामांसाठी वापरात येणारे साहित्य
नवीकरणीय स्रोत : जंगले
कचर्याचा पुनर्वापर : जुने प्लम्बिंग, दरवाजे इ.
सोलर टाईल्स : या इमारतीचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात आहेत. या टाईल्स दिवसभरात जमिनीवरील अथवा भिंतींवरील सूर्यकिरणे आणि उष्णता शोषून घेतात.
कागद इन्सुलेशन : वापरलेली वर्तमानपत्रे, पुठ्ठ्यापासून बनवलेले आणि नंतर रासायनिक फोमने भरलेली कीटक-प्रतिरोधक आणि अग्निरोधक साधने यांचा यात समावेश होतो.
वूल वीट : विटांसाठी लागणार्या चिकणमातीमध्ये लोकर आणि समुद्री शैवालमध्ये आढळणारे नैसर्गिक पॉलिमर एकत्रित करून विटांची निर्मिती करणे. या विटा जळलेल्या विटांपेक्षा 37 टक्के जास्त मजबूत, थंड आणि दमट हवामानास प्रतिरोधक म्हणून काम करतात.
शाश्वत काँक्रीट : काचेचा भुगा, लाकडी पट्ट्या व स्लॅग किंवा स्टील उत्पादनातून निघणारे हे कार्बनचे उत्सर्जन रोखण्यास मदत करते.
हरित घराचे फायदे काय?
पर्यावरण संरक्षण
तज्ज्ञांच्या मते, हरित इमारती पर्यावरण, रहिवासी आणि सर्वसाधारणपणे समाजाला फायदेशीर ठरतात. रिअल इस्टेट विकास हा नैसर्गिक संसाधनांचा (पाणी, ऊर्जा आणि कच्चा माल) एक प्रमुख ग्राहक आहे आणि मोठ्या प्रमाणात कचरा आणि प्रदूषक निर्माण करतो. अभ्यासांनुसार, दरवर्षी जागतिक ऊर्जा वापराच्या 40 टक्के वाटा इमारतींचा असतो. कमी नैसर्गिक संसाधनांचा वापर करून हरित इमारती पर्यावरणीय प्रभाव कमी करतात. शाश्वत डिझाईन, बांधकाम, ऑपरेशन, जलसंवर्धनाद्वारे हरित घरे कार्बन उत्सर्जन, ऊर्जा वापर आणि कचरानिर्मिती कमी करतात.
कमी देखभाल आणि व्यवस्थापन खर्च
‘ग्रीन हाऊस डिझाईन’चा उद्देश ऊर्जा आणि पाणी वाचवणे आहे. त्यामुळे घरमालक त्यांच्या पाणी आणि ऊर्जेच्या बिलांची बचत करू शकतात. दीर्घकाळात आणि इमारतीच्या संपूर्ण जीवनचक्रात हरित घरांचे, इमारतींचे व्यवस्थापन करणे खूपच कमी खर्चिक असते. कारण, ते प्रकाश आणि वातानुकूलनासाठी कमी पाणी आणि ऊर्जा वापरतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
चांगले आरोग्य
हरित इमारतींमध्ये वास्तव्य करणार्या लोकांना असंख्य आरोग्यविषयक फायदे मिळतात. कारण, बांधकामात धोकादायक साहित्य वापरले जात नाही. उदाहरणार्थ, हरित बांधकाम कंपन्या विषारी पदार्थ उत्सर्जित करणारी उत्पादने वापरणे टाळतात. परिणामी, घरातील हवेची गुणवत्ता सामान्य इमारतींपेक्षा अनेकदा खूपच चांगली असते.
महाराष्ट्रात कशा असतील हरित इमारती?
राज्य सरकार ‘भारतीय हवामान शीतन कृती योजने’च्या आधारावर परवडणार्या गृहनिर्माण प्रकल्पात उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी साहाय्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल. छत थंड राहावे, याचे धोरणही निश्चित करण्यात येईल. उष्णतेमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी छत, भिंती, कुंपण, खिडक्या, दारे, वायुमार्ग बांधण्याची मानके ठरविण्यात येतील. इमारतींच्या भिंतींवर ‘व्हर्टिकल गार्डन’ संकल्पनेतून हरित क्षेत्र निर्माण केले जाईल. राज्य सरकारच्या चार हजार चौ. मीटरपेक्षा मोठ्या भूखंडांवर उभारल्या जाणार्या प्रकल्पांना सौरऊर्जा जलतापन प्रणाली आणि छतावरील सौरऊर्जा विद्युत प्रणाली याची तरतूद करणे आवश्यक असेल. पाच हजारांपेक्षा अधिक घरे असणार्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना व वसाहतींना तटस्थ ग्रीड संलग्न सौरऊर्जा प्रणाली उभारणे बंधनकारक असेल. प्रतियुनिट झाडांची संख्या निश्चित करण्यात येईल. परंतु, या ठिकाणी आवश्यकतेनुसार लागवडीसाठी आवश्यक झाडांची यादीही देण्यात येईल. गच्चीवरील बागांसाठी स्वयं साहाय्यता समूह किंवा स्टार्टअप्सना भागीदारीसह काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल.
उद्यानांना प्रोत्साहन
जीआयएस मॅपिंगच्या साहाय्याने शहराच्या हद्दीतील ओसाड आणि पडीक जागांचा शोध घेतला जाईल. या जागा उद्यानांसाठी विकास आराखडा तयार केला जाईल. याठिकाणी, ‘इंदोर ऑक्सिजन पार्क’सारखा प्रकल्प मॉडेल म्हणून समोर असेल. बफर झोनमध्ये, नाल्यांनजीकचा परिसर व इतर जागेत मियावाकी लागवडीला प्राधान्य देण्यात येईल.
‘इंडियन ग्रीन बिल्डिंग काऊन्सिल’नुसार, भारताने 7.17 अब्ज चौ. फूट ’हरित इमारत’ पूर्ण केली आहे. अहवालानुसार, देशात जवळजवळ सहा हजार हरित इमारत प्रकल्प आणि 5.77 लाख एकरांपेक्षा जास्त मोठे विकास प्रकल्प आहेत, ज्यामुळे हरित इमारतींसाठी 75 टक्के लक्ष्य निर्धारित वेळेच्या आधीच साध्य करण्यात येईल. एका सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र भारतातील हरित इमारतींमध्ये आघाडीवर आहे, त्यानंतर कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या (थकज) मते, घरातील खराब पर्यावरणीय गुणवत्तेमुळे होणारे श्वसन आणि फुप्फुसाचे आजार हे मृत्यूच्या पाच प्रमुख कारणांपैकी तीन आहेत. हरित इमारतींच्या गुणधर्मांमुळे आरोग्य सुधारते. संशोधनात असेही दिसून आले आहे की, हरित इमारतींमध्ये काम करणारे लोक पारंपरिक इमारतींमध्ये काम करणार्यांपेक्षा अधिक आनंदी, निरोगी आणि अधिक उत्पादनक्षम असतात. इमारतींमध्ये नैसर्गिक वातावरणाचा समावेश केल्याने रहिवाशांचे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्य सुधारते.