राम जन्मला गं सखी

    16-Apr-2024   
Total Views |
 
ram
 
रामजन्मकथा ही आपली सगळ्या भारतीयांची एक लाडकी गोष्ट आहे. आपल्याच घरात एक बाळ जन्माला आलंय त्याचा जन्मसोहळा आपण दरवर्षी त्याच उत्साहाने साजरा करतो. पण आता मी जी सांगतेय, ती गोष्ट आहे, 'राम जन्मला' या गीताच्या जन्माची. या गाण्यात त्या सर्व सोहळ्याचे, मुहूर्तासहित गोंधळ, धांदल आणि लगबग स्पष्ट जाणवते. मुळात, या संपूर्ण गीतमालिकेचं यश बाबूजी आणि गदिमा यांच्यात सामावलेलं आहे. गाण्यासोबत त्या दोघांचीही मैत्री अशीच आकाराला येऊ लागली. कोल्हापूरपासून मुबईपर्यंतचा त्या दोघांचा प्रवास आणि त्यात दर आठवड्याला एक गीत घेऊन त्याला चाल देऊन त्यावर रागसंस्कार करणं ही प्रक्रिया जेवढी जादुई होती, तेवढेच जादुई त्याचे स्वर.
गदिमा म्हणतात,
 
चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी
दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्यथांबला?
 
मुहूर्त वर्णन केला आहे. मुहूर्ताचे महत्व गदिमांशिवाय कुणाला ठाऊक असायचे? त्यांच्या जन्माच्या वेळी आनंद नव्हे रडारड झाली होती. बाळ मृत जन्माला आलेलं. शेवटचा पर्याय म्हणू सुईणीने चुलीतील लाकूड लावून पाहिलं तेव्हा गदिमा रडू लागले. त्यांच्या आजोबांनी गावातला जोतिषी आणून कुंडली करवली आणि त्यात असे समजले की नक्षत्र वाईट, घरच्या मूळ पुरुषाचा मृत्यू होणार. झालेही नेमके तसेच. वर्षाच्या आत आजोबा गेले. त्यामुळे मुहूर्त, घटका फार महत्वाच्या होत्या. पुढे त्यांनी रामाचे वर्णन केले. आपलाच इतका प्रभावशाली पुत्र पाहून डोळे दिपले नाहीत तर नवल. यात रामाची माहिती आहेच पण आईच्या प्रसूती वेदनांचेही वर्णन द्वयर्थी आले आहे.
 
कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें
 
मला कौतूक वाटत ते बाबूजींचं. म्हणजे गदिमा उत्कृष्ट कवी होतेच. पण त्याकाळात कविता पहिले आणि गीत नंतर आणि चाल पहिले त्यावर शब्द लिहिणे अश्या २ पद्धती गीत पूर्ण होण्याच्या होत्या. गदिमा शब्द प्रभू. चालीच्या चौकटीत आपली लेखणी बसवणे त्यांना फारसे रुचायचे नाही. नवहंस चित्रपट कंपनीत असताना त्यांचे यावरून बरेच बखेडे संगीत दिग्दर्शकाशी व्हायचे. याउलट, बाबूजी. बाबूजींची गायकी शब्द प्रधान होती. ती सूर प्रधान केव्हाच नव्हती. त्यांचा, ब, भ, किती स्पष्ट असायचा. कोणत्याही रचनेला चाल लावताना ताल आणि भावनांचे प्रकटीकरण या कसोटीवर ती हमखास उतरायची. कोल्हापुरातच या दोन प्रतिभावंतांची मैत्री घट्ट होऊ लागली. एकाच रागातील गीत आहे, पण पुत्र जन्माच्या नाजूक वेळा निघून गेल्यावर उधानून आलेला आनंद ते दाखवतात.
 
राजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनुअंगणीं
 
राजवाड्यात सर्वनाच एवढा आनंद झाला आहे की गोशाळेतील गायीची आपल्यालाच वासरू झाल्याप्रमाणे पान्हा फुटून हंबरू लागल्या आलेत अशी कल्पना. ज्यावेळी ही गीते आकार घेत होती, तो काळ होता सुखं साजरी करण्याचा. जराशी सुखद वार्ताही घराघरातून माणसांना घटनास्थळी पोहोचवत. हा काळ सुद्धा या गीतातून अगदी दडून बसल्यासारखा पण स्पष्टपणे हे दोघे समोर मांडतात.
 
वार्ताही सुखद जधीं पोंचली जनीं
गेहांतुन राजपथीं धावले कुणी
युवतींचा संघ कुणी गात चालला
 
गदिमा त्यावेळी मुंबई पुणे मार्गावर पंचवटी बंगल्यात राहायचे. हा प्रकल्प हातात घेतल्यावर काही गाणी त्यांनी बसल्या जागी लिहून दिली पण चित्रपटांचे काम चालू असायचे. गाण्याचे ते सपशेल राहून जायचे. मग २-३ दिवस गेले बाऊजींचे सहाय्यक प्रभाकर जोग पंचवटीत जायचे. गाणे घेतल्याशिवाय निघणार नाही असे अडून बसायचे. मग रामाच्या दूताला रिकाम्या हाती कसे पाठवायचे म्हणून गदिमा एका कागदावर गीत लिहून देत. ते बाबुजींकडे आणून चाल लावण्याचे सोपस्कार व्हायचे.
बाबूजी अजूनही बाळंतिणीच्या खोलीतील स्त्रियांची गडबडच सांगतात.
 
पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें
हास्यानेलोपविले शब्द, भाषणें
 
इतका आनंद होता की लोक बोलणे विसरले. काय अन किती बोलणार? वादन, संगीत अव्याहत सुरु होतं, पण त्याचा आवाज, ती सुरावट ऐकायला कुणाला वेळ होता? एवढंच काय पण दुपारी बाराच्या ठोक्याला आंब्याच्या झाडावर उंचावर बसलेल्या कोकिळा सुद्धा बावरल्या. रोज ऐकू येणारि कोकीळांची गोड हाक आणि आजच या एवढा मोटा गोड कोलाहल. गदिमा लिहितात,
 
वीणारव नूपुरांत पार लोपले
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला
 
गदिमांना अभिनय करायचा होता, गीतेच लिहायची होती आणि नावाजलेल्या साहित्यिकांचे लेखनिकही व्हायचे होते. या सगळ्यात त्यांनी अनेक चित्रपट संस्था पायाखाली घातल्या, आपल्यासारखाच गरिबीतून आलेला एक फकीर गायक राम. राम म्हणजे आताचे सुधीर फडके. त्यावेळी टोपण नाव घ्यायची पद्धत होती. माडगूळकरांचेही आडनाव कुलकर्णी होते. तर हे दोघे एकमेकांसोबत आपली कला फुलवू पाहत होते. संगीत, काव्य या अशा सुरील्या अवस्थेत बुडून जायचा तो काळ. त्या काळाचे वर्णन पुढे.
 
बुडुनि जाय नगर सर्वनृत्यगायनीं
सूर, रंग, ताल यांत मग्ने मेदिनी
 
अर्थात संदर्भ रामजन्माचा. अयोध्या अशीच संगीत गायनात दंग झाली असावी ही कल्पनाच किती छान! या असा सगळ्या कोलाहलातून, रससाधनेतून, आनंद सोहळ्यांतून, लगबग गर्दीतून रामजन्म झाला. राम जसा जसा आकार घेऊ लागला तसे हे गित रामायणही फुलारू लागले. हे अचाट कर्तृत्व घडले. गदिमा आणि बाबूजी दोघेही या रचनेचे श्रेय स्वतः घेत नाहीत. त्यांच्याकडून हे घडून गेले, दैवी संकेतानुसार घडवलगेले असे म्हणत. रामजन्मच तो, दैवीच असणार! तसेच दैवी हे शब्द.
राम जन्मला ग सखी राम जन्मला ..

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.