मुंबई : " माणिक वर्मा यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असंख्य पैलू दडले होते, वास्तविक माणिक वर्मा म्हणजे परिपूर्णतेचा साक्षात्कार होता" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. दिवंगत गायिका माणिक वर्मा यांच्या सांगीतिक जीवनाचा आढावा घेणाऱ्या " माणिक मोती" या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, लेखक अच्युत गोडबोले, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, जेष्ठ शास्त्रीय संगीतकार विकास कशाळकर, चैतन्य कुंटे, माणिक वर्मा यांच्या शिष्य शैला दातार, माणिक वर्मा यांच्या कन्या राणी वर्मा, लेखिका शोभा बोंद्रे, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना आशिष शेलार म्हणाले की " माणिक वर्मा यांनी अत्यंत लहान वयात शास्त्रीय संगीत आत्मसात केलं, त्यांचा संघर्षमय प्रवास सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे. जीवनाकडे बघण्याचा त्यांचा एक स्वतंत्र दृष्टिकोन होता, म्हणून त्या एक संवेदनशील गायिका झाल्या."
दि. १२ मे रोजी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये शोभा बोंद्रे लिखित " माणिक मोती" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, लेखक अच्युत गोडबोले, सांस्कृतिक कार्यामध्ये आशिष शेलार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माणिक वर्मा यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना माणिक वर्मा यांच्या कन्या राणी वर्मा म्हणाल्या की माणिक वर्मा यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा या पुस्तकाच्या निमित्ताने सांगितिक वैभवचा खजिना अनुभवता येणार आहे. २०२५ हे वर्ष माणिक वर्मा यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आयोजन यावेळी केला जाणार आहे. माणिक मोती या पुस्तकाच्या लेखिका शोभा बोंद्रे म्हणाल्या की " माणिक वर्मा यांचं गाणं आज सुद्धा ताजं वाटतं, याचं कारण त्यांच्या गाण्यांमध्ये असलेली विविधता. त्यांचे स्वर आज सुद्धा ऐकणाऱ्याला भुरळ पाडतात. अशा या एकमेवाद्वितीय गायिकेवर लिहिण्याचा मी निश्चय केला. या लेखन प्रपंचामध्ये, मला त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या श्रोतुवर्गाने मदत केली." माणिक वर्मा यांच्या शिष्या शैला दातार यांनी यावेळी माणिक वर्मा यांच्या जीवनातील असंख्य गोष्टी उलगडून सांगितल्या, यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून आला. यावेळी कौशल इनामदार ग्रुपच्या माध्यमातून माणिक वर्मा यांच्या गीतांवर आधारित हसले मनी चांदणे हा सांगीतिक कार्यक्रम सादर केला.
... तोवर माणिक वर्मा हे नाव अमर आहे : सचिन पिळगावकर
" माणिक मोती " या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्राचे लाडके अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले की " माणिक वर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्यावर पुत्रव्रत प्रेम केलं. लोकांना माणिक वर्मा त्यांचं गाणं ऐकायला मिळालं. परंतु मला मात्र प्रत्यक्ष त्यांना ऐकण्याचे भाग्य लाभलं. माणिक वर्मा यांच्या स्मृतीला ज्या पद्धतीने त्यांच्या मुलींनी जिवंत ठेवला आहे, त्यांच्या या कार्याला सलाम. जोपर्यंत भारतामध्ये संगीत जिवंत राहील तोवर माणिक वर्मा हे नाव अमर आहे" असे मत सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले.