मुंबई : रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये व्यासंगी अभ्यासक अशी ज्यांची ख्याती होती त्या दाजी पणशीकरांनी समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्वाचं काम केले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील कला विश्व पोरके झाल्याची भावना लोकांनी व्यक्त केले आहे. दाजी पणशीकर यांच्या पार्थीवावर दि. ७ जून रोजी सकाळी ९:३० वाजता ठाण्याच्या जवाहर बाग वैकुंठभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दाजी पणशीकर यांनी लिहिलेल्या विविध वृत्तपत्रातील लेखमाला हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा वैचारिक ठेवा आहे. " महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता?, कथामृतम, कणिकनिती, शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित स्तोत्र गंगा (दोन भाग), अपरिचित रामायण (पाच भाग), गानसरस्वती किशोरी आमोणकर - आदिशक्तीचा धन्योद्गार अशा त्यांच्या विविध ग्रंथांच्या आजवर 30 हून अधिक आवृत्या निघाल्या आहेत. विषयाचा व्यासंग, सखोल चिंतनाची बैठक, स्पष्ट भूमिका आणि परखड विवेचन हे त्यांच्या लिखणाचं बलस्थान. आचार्य अत्रे यांच्या 'मराठा' या दैनिकामध्ये त्यांनी विपुल लेखन केले होते. त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री पणशीकर यांच्या साहित्य संचिताचा वारसा त्यांनी पुढे चालवला. रामायण, महाभारत, आदी विषयांवर त्यांनी देश विदेशामध्ये अडीज हजार व्याख्यानं दिली. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकार पणशीकर हे त्यांचे मोठे बंधू. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेसाठी व्यवस्थापक म्हणून अनेक वर्षी त्यांनी काम बघितले. व्यवस्थापक म्हणून दाजी पणशीकर यांचा मराठी साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट, क्षेत्रातल्या दिग्गज कलाकारांशी जवळून संबंध आला.
वैचारिक दुवा हरपला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दाजी पणशीकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की " दाजी पणशीकर म्हणजे भारतीय संस्कृती, संत साहित्य, वेद आणि शास्त्र यांच्या अभ्यासातून सिद्ध व्यासंगी, सडेतोड आणि आजन्म ग्रंथोपासक विचारवंत होते. त्यांच्या जाण्याने एक महत्त्वाचा वैचारिक दुवा हरपला आहे. त्यांनी वेदाभ्यास, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, महाभारत भाष्यातून वैदिक ज्ञान परंपरेचा अभ्यास तर केला, पण तो आधुनिक पिढीसमोर अतिशय समर्पकपणे मांडला. त्यांचे व्याख्यान, लेखमालांमधून दिलेले विवेचन हे वाचकांमध्ये विचार जागवणारे होते."