मुंबई : " भाषेच्या विकासासाठी, आपल्याला प्रथम भाषाविचाराला प्राथमिकता देणे आवश्यक आहे. भाषेचा विकास कसा होतो, त्याच्या विचारविश्वाची व्याप्ती काय हे समजून घेणे गरजेचे आहे " असे मत भाषा अभ्यासक तथा बदलापूरच्या स्वायत्त मराठी विद्यापीठाचे विश्वस्त श्याम जोशी यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या " मराठी भाषा : अभिजातता आणि वस्तुस्थिती" या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई मराठी साहित्य संघाचे उपाध्यक्ष मधुकर वर्तक, मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष उषा तांबे उपस्थित होते.
दि. १७ मे रोजी, गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघामध्ये " मराठी भाषा : अभिजातता आणि वस्तुस्थिती" या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी केले यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आता मराठी शाळांसाठी काम करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा यावर भाष्य करताना श्याम जोशी म्हणाले की " अभिजातता म्हणजे संस्कार संपन्नता, शालीनता हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मराठी भाषेला ज्या लोकांमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यांचे स्मरण पण कायम ठेवले पाहिजे. मराठीच्या प्रचार प्रसारासाठी संशोधन कार्यासाठी केंद्र सरकारकडून आता मुबलक प्रमाणात अभ्यासकांना निधी उपलब्ध केला जाणार आहे, त्यामुळे तशा प्रकारचे प्रकल्प आखण्याचं व त्यावर काम करण्याची वेळ आलेली आहे." यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या प्राचीन ज्ञानाच्या खजिनेवर भाष्य केलं. शब्दांची व्यत्पत्ती, शब्दकोशांचे महत्व तसेच भाषेविषयी असणाऱ्या अनेक प्रचलित समज गैरसमजंविषयी त्यांनी भाष्य केलं.
कार्यक्रमाचा समारोप करताना कार्याध्यक्ष उषा तांबे म्हणाल्या की " मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळाला पण आता कृतिशील पणे त्यावर कसं काम करायचं या संबंधित आज आपल्याला श्याम जोशी यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले.