विज्ञानयोगी खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन!

    20-May-2025
Total Views |

jayant narlikar

मुंबई : मराठी मनांसाठी विज्ञान साहित्याचे समृद्ध दालन खुले करुन देणारे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांचे २० मे रोजी रोजी पुण्याच्या राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार निद्रीस्त असतानाच अनंतात विलीन झाले. त्यांच्या जाण्यामुळे केवळ मराठी साहित्यच नव्हे तर सबंध विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे वैज्ञनिक, साहित्यिक तसेच शिक्षण क्षेत्रातील तेजस्वी तारा मावळला अशी प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केली आहे.
१९ जून १९३८ रोजी कोल्हापूर येथे जयंत नारळीकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रँगलर विष्णू वासूदेव नारळीकर प्रसिद्ध गणिततज्ञ होते. त्याच बरोबर बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुखपद त्यांनी भूषवलं होतं. त्यांच्या मातोश्री सुमती नारळीकर संस्कृत विदुषी होत्या. त्यांचे शालेय शिक्षण वाराणासी येथे झाले. यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी लंडन गाठले. केंब्रिज विद्यापीठातामध्ये पीएचडीपर्यंत शिक्षण घेत त्यांनी टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार अशी अनेक बक्षिसं पटकवली.

विज्ञानविश्वार उमटवला ठसा!
जयंत नारळीकर यांनी जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून स्व:ताची वेगळी ओळख निर्माण केली. फ्रेड हॉएल यांचे पीएच.डी साठी मार्गदर्शक म्हणून लाभले. फ्रेड हॉएल यांचा प्रसिद्ध सिद्धांत आहे ‘स्टेडी स्टेट थिअरी’ अर्थात ‘स्थिर स्थिती सिद्धांत.’ या सिद्धांतात त्यांचे सहकारी होते हरमन बॉण्डी आणि टॉमी गोल्ड. त्यावर काम करत विश्वरचनाशास्त्रात नारळीकरांच्या संशोधनाने मोठी भर घातली.पीएच.डी पूर्ण झाल्यावर पुढे केम्ब्रिजच्या किंग्स कॉलेजचे ‘बेरी रॅम्से फेलो’ म्हणून त्यांनी खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीमधील पुढील पदवी प्राप्त केली. 'Quasi-steady State Cosmology' आणि 'Hoyle-NarlikarTheory of Gravity' या आणि संबंधित संशोधनासाठी नारळीकर-हॉएल नावं प्रसिद्ध झाली.

मराठी विश्वातील साहित्य संपदा!
जयंत नारळीकर यांनी मराठी साहित्यविश्वात विज्ञान साहित्याचे समृद्ध दालन उभे केले. यक्षांची देणगी या त्यांच्या पुस्तकाने मराठी वाचकांवर अधिराज्य गाजवले. अंतराळातील भस्मासूर, अभायारण्य, प्रेषित या काही निवडक साहित्यकृतींनी मराठी साहित्य विश्वाचे दालन समृद्ध केले. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवले.