डिजिटल व्यक्तिचित्रकार

    12-Apr-2024   
Total Views |

pranav satbhai 
 
वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील मुलगा जेव्हा आपल्या स्वप्नांचा आदर करतो आणि पिढीजात व्यवसायापेक्षा आपल्या अंगभूत कलेवर विश्वास ठेऊन अवघ्या २५ व्या वर्षी विश्वविक्रम करतो तेव्हा या झपाटलेल्या कलाकाराचा प्रवास सांगणारा हा लेख. डिजिटल व्यक्तिचित्रे रेखाटणाऱ्या प्रणव सातभाई विषयी..
 
निफाडजवळ वनसगावात रयत शिक्षण संस्थेची एक शाळा होती. त्या शाळेत गावातल्या डॉक्टरांचा मुलगा होता. जन्मजात कलाकार. घरात आई वडिलांपासून शाळेत शिक्षकांपर्यंत सर्वांचे स्वप्न प्रणवने डॉक्टर व्हावं. प्रणव मात्र अभ्यासापेक्षा पाठच्या बाकावर रमणारा मुलगा. बाबांच्या स्मार्टफोनमधून फोटो काढायला त्याला आवडायचे. आणि मग त्याला फोटोग्राफर व्हायचं होतं. वन्यजीव छायाचित्रकार. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. नावातच किती कौतुक आहे ना! वडिलांच्या आग्रहाने त्याने दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि याच काळात त्याने घरी सांगून टाकले, त्याला छायाचित्रकार व्हायचे आहे. घरात कल्लोळ माजला. फोटोग्राफीसाठी बंदी नाही पण डॉक्टरीची परीक्षाही दे, असा घरचा आग्रह तर फोटोग्राफीतच करियर करायचंय हा प्रणवचा हट्ट. अशात प्रणवने एक प्रश्न घरच्यांसमोर ठेवला. फोटोग्राफी करू द्या नाहीतर आयुष्यभर माझ्या पालन पोषणाची जबाबदारी घ्या. आता घरचे गपगार. त्याकाळात खेड्यात फोटोग्राफी म्हंटल्यावर केवळ लग्नाचे फोटो काढणारे फोटोग्राफर माहिती असायचे, तेव्हा हा गोंधळ स्वाभाविक होता. कॅमेरा घेऊन दिला आणि प्रणवचे पक्षी दर्शन सुरु झाले. त्याने एका महाविद्यालयात शिकायला सुरुवातहि केली. एक वर्ष झाले आणि कोरोना काळ सुरु झाला. प्रणव पुन्हा घरी. वर्ष गेलं. एक लाट ओसरली. दुसरी आली. आता मात्र तणाव जाणवू लागला. अनेक लोक या काळात घर बसल्या काम करत होते. आपला व्यवसाय करत होते. प्रणवचं मात्र शिक्षणच अर्ध्यात राहिलं, तेव्हा अनुभवाअभावी काम तरी काय करणार? वैफल्य येऊ लागलं आणि अशातच त्याने आपले फोटो एडिट करायला सुरुवात केली.
 
रंगसंगतीचा अभ्यास सुरु झाला. बॅकग्राउंड फोरग्राउंड आणि त्यातला विरोधाभास. एकच रंग असेल तरी कसा उठाव देता येईल यावर अभ्यास. एकदिवस त्याने व्यक्तीचित्र तयार केलं. डिजिटल पोर्ट्रेट. तेव्हापासून आजवर हा प्रवास असाच सुरु आहे. एका वर्षात त्याने 1 हजार पोर्ट्रेट्स तयार केली आणि विश्व विक्रम घडला. अतिशय महत्वाची आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे यापूर्वी त्याने कधीच कागदावर चित्र काढले नव्हते!
 
शरद पोंक्षे यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित भाषणे त्याने अनेकदा ऐकली होती. त्यांना टीव्हीवर पाहिले होते. सावरकरांविषयी अतिशय तळमळीने बोलणाऱ्या या आपल्या आवडत्या कलाकाराचे पोर्ट्रेट तयार करून त्याने त्यांना फेसबुकवर पाठवून दिले. त्यांनी कौतुकाचा मेसेज केला आणि आपल्या फेसबुकवरून ते चित्र शेअर केले. झाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रणवला 150-200 मित्र विनंत्या. एका रात्रीत प्रणव कौतुकाचा विषय झाला होता. त्यानंतर नाना पाटेकर यांचे चित्र बनवले आणि समोरून पाटेकरांनी खुद्द फोन केला. प्रणवची कीर्ती अवघ्या काही दिवसात होऊ लागली. या सर्वात वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मात्र मागे पडली. त्यासाठी लागणारे पेशन्स, वेळ आणि मेहनत यांच्या तुलनेत अर्थार्जनाची साधनं मात्र कमी आहेत. आज त्याने मॉडेलिंग फोटोग्राफी करायला सुरुवात केली आहे आणि सध्या जोशी बेडेकर महाविद्यालयात फिल्म मेकिंग मध्ये मास्टर्स कोर्स करतो आहे. या केवळ 2 ते अडीच वर्षांच्या प्रवासात त्याला अनेक भारावून टाकणारे, काही शिकवणारे, काही भावनिक होण्याजोगे प्रसंग आले. अनेक ओळखी झाल्या, माणसं भेटली. आज अर्ध्या अधिक इंडस्ट्रीशी त्याची दोस्ती आहे.
प्रणव स्वामींचा भक्त. अक्कलकोट ला नियमित जाणे येणे होते. एकदा असाच सहकुटुंब अक्कलकोट ला गेल्यावर अचानक शाही स्वागत झालं. मंदिराच्या विश्वसतांनी उत्तम व्यवस्था ठेवून आदरांतिथ्य केलं. दरबारात त्याच्या हस्ते आरती झाली. हे पाहून आईवडील आवाक. त्यांच्या मुलातील हा बावनकशी गुण त्यांना अशा तर्हेने निदर्शनास आला. स्वामिंचे पोर्ट्रेट तयार केल्यावर एक फोन आला. स्वामींपर्यंत तू पोहोचला आहेस एवढे बोलून फोन बंद झाला आणि त्या दिवसानंतर आपल्या कलेची भरभराट झाली असे तो मानतो.
 
या काळात त्याची 3 एक्सिबिशन्स संपन्न झाली. पाहिलं प्रदर्शन नाशिक शहरातच कुसुमाग्रज स्मारकात झालं. त्यानंतर ममता सकपाळ यांनी त्याला भेटून सिंधू ताईंच्या चित्रांचे प्रदर्शन भरवू असे सांगितले. पुढील 6 महिन्यात तेही झाले. पुण्यातही एक प्रदर्शन झाले. सध्या तो पुढच्या प्रदर्शनाची तयारी करण्यात गुंतला आहे. आयुष्याच्या पंचविशीतच आपण शून्यापासून सुरुवात केली आणि अल्पावधीत आपली ओळख निर्माण करू शकलो याबाबत त्याला अभिमान वाटतो. करियरची वेगळी वाट निवडताना शालेय कालावधीत आलेले अनुभव मात्र तो विसरू शकत नाही. शेवटच्या बाकावर बसून विज्ञानासंबंधी प्रश्न विचारल्यावर उत्तर देता न आलेला मुलगा जेव्हा त्याच शाळेत जाऊन मुख्याध्यापकांसोबत बसून चहा घेतो किंवा पाढे पाठ नाहीत म्हणून पायांवर फटके बसलेल्या मैदानात जेव्हा सगळ्या लहान मुलांसमोर भाषण देतो तेव्हा त्याला वाटतं करियरच्या नव्या वेगळ्या वाटांचे शिक्षण या खेड्यातल्या मुलांनाही मिळायला हवे. आज तो अनेक शाळा महाविद्यालयात मुलांचे करियरविषयक तास घ्यायला भेटी देतो. त्याची प्रगती उत्तरोत्तर बहरत राहो अशा दै मुंबई तरुण भारत कडून सदिच्छा!

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.