कला विद्यार्थ्यांसोबत कलेचे भविष्यही उज्ज्वल : डॉ. अरविंद जामखेडकर

    30-Mar-2024   
Total Views |
Dr. Arvind Jamkhedkar


जे. जे. कला महाविद्यालयाला अनन्य अभिमत विद्यापीठाचा दर्जा नुकताच प्राप्त झाला. त्यानंतर ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांची जे. जे. महाविद्यालयाच्या कुलपतीपदी नेमणूक झाली. यानिमित्ताने कला आणि तिची कालसापेक्षता, कला शिक्षण, विद्यार्थ्यांची जबाबदारी यांसारख्या विविध विषयावर त्यांच्याशी साधलेला संवाद...


सर्वप्रथम जे. जे. अनन्य अभिमत विद्यापीठाचे पहिले कुलपती म्हणून तुमची नुकतीच निवड झाली, त्याबद्दल अभिनंदन! खरे तर कला हा मानवी जीवनाचा गाभा. कला म्हणजे सृजनाची अपरिहार्यता. तेव्हा, तुमच्या दृष्टिकोनातून पुरातत्वशास्त्राचा कलेशी संबंध काय सांगता येईल?

पुरातत्वविद्या भौतिक अवशेषांवर प्रकाश टाकते. अनेक शस्त्रांचा जेव्हा शोध लागला, तेव्हा एका अभ्यासकाने त्याचे ढोबळमानाने तीन भागांत वर्गीकरण केले. अगदी ओबडधोबड-मोठाली अशी काही, तर काही नाजूक, पात्यासारखी, सुंदर वाटावी अशी. पुढे धातूचा शोध लागला. माणूस धातूच्या शस्त्रनिर्मितीत पारंगत होत होता. त्याची प्रगत होत गेली. निसर्गावर आपला वकूब मिळवण्याचे माणसाचे हे निरंतर प्रयत्न असतात. त्यातून सृजनाचे आविष्कारही घडतात. पण, पुरातत्व विद्या म्हणते, मनुष्याने अशी काही साधने तयार केली आहेत, ज्यायोगे तो निसर्गाशी जुळवून घेतो. आता आपण नव्या युगात येतो. तांत्रिक प्रगती. तिच्या जोडीने जगणं समृद्ध झालं आणि त्यानंतर आपण विविध शस्त्र निर्माण केली. त्यासोबत तत्त्वज्ञान. त्यातून लिपीचा जन्म झाला. लिपी ही ज्ञानासाठी नाही, तर हिशोब ठेवण्यासाठी आहे. शहरे गावांच्या भोवतीनेच तयार झाली. नागरीकरण झाल्यानंतर, त्या-त्या नगराची एक शैली तयार झाली. माणूस स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त करतो. हे सगळे सृजनाचे आविष्कार. हा आपला इतिहास आणि यातल्या भौतिक साधनांचा अभ्यास पुरातत्व विद्या करते.

स्थापत्य, शिल्प अशा कला आपल्याला त्यांच्या जन्माचा काळ सांगतात. कोणत्या राजाचा, कोणत्या प्रदेशाचा, स्थळाचा किंवा काळाचा प्रभाव त्या कलाकृतीवर आहे, हे आपल्याला पाहून लक्षात येते. पण, आजची कला बहुआयामी, बहुगुणी, बहुरंगी, बहुढंगी आहे. तिच्यात विविधता आहे. तेव्हा उद्याच्या पुरातत्वशास्त्राचे निकष काय असतील, असे तुम्हाला वाटते?

दीडशे वर्षांपूर्वी ’खरी कला काय?’ असा प्रश्न अनेकांना पडायचा. कलेत आपण अनुकरण करतो, आपली प्रेरणा काही वेगळी असते. म्हणजे कुणा ना कुणाचा, कसला ना कसला प्रभाव असतोच. कलाकार कोणत्याही माध्यमातून स्वतःलाच मांडत असतो. ती अभिव्यक्ती आहे. मग ते शिल्प असो, चित्र असो, नृत्य असो किंवा संगीत. हे त्याच अभिव्यक्तीचं साधन असतं. हे कलेचं माध्यम मात्र त्याने अनुकरणाने स्वीकारलेलं आहे. दुसरा भाग आहे, तो धर्मकल्पनांचा. या धर्मकल्पना आपल्याला जुन्या काळाशी बांधून ठेवतात. कला ही नेहमी काही तरी अभिनव करत असते, ती धर्मकल्पनांच्या विरोधात जाते. म्हणजे एकाअर्थी ही रस्सीखेच आहे. हा संघर्ष नेहमीच सुरू राहणार आहे. आता एक उदाहरण देतो. एखाद्या व्यक्तीला निवारा हवा आहे. ऊन, पाऊस, थंडीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी. त्याला जर ते एखादी झोपडी देत असेल; पण ग्रीक स्थापत्य देऊ शकत नसेल, तर कितीही सुंदर दिसणारं असलं म्हणून ग्रीक स्थापत्य उत्कृष्ट होऊ शकेल का? कलेला ही बंधनं पाळावीच लागतात, नाही तर तिच्यात काहीही अर्थ उरत नाही.

आर्ट डेकोच्या इमारती म्हणा किंवा पायात बूट-मोजे घातलेली सूर्यदेवाची मूर्ती, अशा भारतीयेतर संस्कृतीचा प्रभाव आपल्या घडवणुकीवर पूर्वीही झाला आहे. येत्या काळात जागतिकीकरणामुळे हे संस्कृतीवरचे आक्रमण नक्कीच तीव्र होईल. या प्रश्नाकडे तुम्ही कसे पाहता?


आता सूर्यदेवाचेच उदाहरण घेतलेस ते बरे झाले. माझ्या दृष्टिकोनातून मी त्याला ‘आक्रमण’ म्हणत नाही. नीट पाहायला गेले तर, आपल्या सर्व देवतांना एक साज आहे. अलंकार, भरजरी वस्त्र, आभूषणे आणि माळा.. पण सूर्यदेवाची मूर्ती मात्र आपल्याला अचंबित करते. सूर्यदेवाच्या मूर्तीच्या पायात मोजे घातलेले दिसते. आपण मंदिरात जाताना चप्पल घालत नाही आणि हा देवच कसा बूट घालून उभा आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच. देवतांच्या प्रतिकृती या त्यांच्या मूलस्थानाच्या भोवतालच्या निसर्गाला अनुलक्षून झाल्या आहेत. ही मूर्ती मग ब्राह्मणांनी अवेस्त्याहून आपल्याकडे आणली. खरेतर सूर्याची पूजा आपल्याकडेही होत होतीच. सूर्याची बारा रूपे आहेत. प्रत्येक रूप एक वेगळी शक्ती प्रदान करते. ‘पुषण’ हा संध्याकाळचा देव. ‘सविता’ हा सकाळचा. सूर्य प्रकाश देणारा आहे. वरुण साम्राज्य स्थापन करणारा आहे. मित्र मैत्री करणारा आहे. ही सगळी त्या आदित्याची स्वरूपे आहेत. परंतु, यापेक्षा एक वेगळी कल्पना अवेस्त्यात जन्माला आली. या भक्तीला मूर्तिरूप दिले ब्राह्मणांनी. त्यानंतर पुढे ही सूर्योपासना ग्रीक आणि रोमन लोकांमध्येही गेली. आपल्याकडे ही परंपरा कुशाणांच्या काळात पारशांकडून आली. पण, हे काही पारशांचे अनुकरण नाही. ही भक्तीची भावना आहे.

तुला माहिती आहे का, इसवी सन पूर्व दुसर्‍या शतकात एका ग्रीक राजाने त्याच्या नाण्यावर कृष्ण आणि दुसर्‍या बाजूला बलराम कोरून घेतले. आता हे काही भारताचं त्यांच्या प्रदेशावर झालेलं आक्रमण नव्हतं. तुला अजून एक गोष्ट सांगतो. सहाव्या शतकात बाण नावाच्या कवीने ‘सूर्यशतक’ लिहिले. या कवीची गोष्टही सर्वश्रुत. ‘सूर्यशतक’ हे एक महाकाव्य आहे. काव्य कशासाठी लिहितात? यश, प्रतिष्ठा आणि अर्थ मिळवण्यासाठी. पैसा हवाच ना? त्याचबरोबर व्यवहारसुद्धा हवा. अनेक कारणांसाठी काव्य केले जाते. त्याने सूर्याच्या उपासनेची गोष्ट आपल्या काव्यातून लिहिली. बाणाला श्वेतकुष्ठ होते, परंतु ‘सूर्यशतक’ काव्य लिहिल्यानंतर ते नाहीसे झाले. हे जेव्हा इतरांना समजले, तेव्हा त्या प्रांतात बरीच सूर्यमंदिरे बांधण्यात आली. परंतु, सूर्याचं पाहिलं मंदिर मुलतानला बांधलंय बरं का? मुलतानच मूळ नाव ‘मूलस्थान.’ सांबाची गोष्ट तर सर्वश्रुत आहे. कृष्णाचा मुलगा सांब. जांबुवंती आणि कृष्णाच्या या मुलाने सूर्याची भक्ती केली होती. त्याचे कारणही रंजक आहे. एका ऋषींसमोर गर्भवती स्त्रीचे रूप घेऊन आपल्याला पुत्ररत्न होणार की कन्यारत्न, असा अगोचर प्रश्न सांब याने विचारला होता. या ऋषींच्या खरी हकीकत लक्षात आल्यावर त्यांनी सांबाला शाप दिला. तेव्हा त्याने सूर्यभक्ती करावी, असा सल्ला नारदांनी दिला. त्याला गरुडावर बसून द्वीपकल्पात जाऊन तेथील ’मग ब्राह्मणां’ना घेऊन यायला सांगितले.

या ‘मग ब्राह्माणां’करवी सूर्यमंदिर बांधून घेतल्यावर सांबाचा रोग बारा झाला. ही कथा सर्वदूर झाल्याने ज्यांना ज्यांना श्वेतकुष्ठ होते, त्यांनी त्यांनी सूर्याची उपासना केली आणि आठव्या ते दहाव्या शतकाच्या काळात आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सूर्यमंदिरे बांधण्यात आली. मध्य आशियातून येणारे आक्रमक सर्व देवळे पाडत. पण, त्यांनी हे सांबाने बांधवून घेतलेले देऊळ पाडले नाही. का? कारण, त्यातून त्यांना कर मिळत होता. हिंदुस्थानातले सर्व श्वेतकुष्ठग्रस्त लोक त्या मंदिरात जात असत. पुढील २०० वर्षे मोठ्या प्रमाणावर कर त्यांनी वसूल केला. आजही मुंबईत एक सूर्यमंदिर आहे. मी तिथे गेलो होतो. मी त्यांना विचारले, “तुम्ही कोण?” तर म्हणे, “मी मग ब्राह्मण आहे!” इथले ब्राह्मण या परदेशातून आलेल्यांना आपले मानत नसत. रोटीबेटी व्यवहार नाही. पण, तरीही देवाची प्रतिष्ठापना करणारे म्हणून ब्राह्मण. ‘ब्राह्मण’ दर्जा आहे, मग त्यांची ही वेगळी जातच निर्माण झाली. आता मला सांग, या सर्व उदाहरणांनंतर आपण याला ‘सांस्कृतिक आक्रमण’ म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. अनेक कल्पना आपल्याकडे इतर प्रांतातून येत असतात, तशी या सूर्यदेवाची आली, तेव्हा तो आपलाच आहे. त्याच्यावर पुराणेसुद्धा आपल्याकडे निर्माण झाली. तो सर्वस्वी आपला देव झाला.

शिक्षणाचे झपाट्याने बदलते स्वरूप आणि सर्वच क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर लागणारे शोध हे सर्व पाहता, मी मुख्यत्वे कला शाखेच्या विद्यार्थ्यांबाबत बोलतेय, विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याव्यतिरिक्त विद्यापीठांची काय जबाबदारी असावी, असे तुम्हाला वाटते?


जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स जेव्हा स्थापन झाले, तेव्हा त्याचा मूळ हेतू काय होता? आता मी इथे नवीन आहे, हे पहिले नमूद करतो. परंतु, जेव्हा हे स्कूल निर्माण झाले, तेव्हा त्यात एक शब्द होता-’इंडस्ट्री.’ ‘क्राफ्ट्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री.’ दक्षिण गोलार्धातील मंडळी ही उत्तम कारागीर असतात, तर असे उत्तम कारागीर घडवण्यासाठी, जे. जे. स्कूलची स्थापना झाली. नंतर या प्रणालीत हळूहळू बदल झाला. सॉलोमनसारखी माणसे आली. त्यांना भारतीय विचारसरणीची जी कल्पना आहे, त्यानुसार त्यांनी ती घडवण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे पाश्चात्य कलेचे आपण अनुकरण करत होतो, ते मागे पडून भारतीय कला निर्माण करणार्‍या कारागीरांना मार्गदर्शन करतो. हा जे. जे. स्कूलमधील बदल इतिहासात १०० वर्षांपूर्वीच घडला. यात भारतीयत्व आलेच पाहिजे. दोन स्कूल झाली, एक बंगाल स्कूलच्या कलेतील भारतीयत्व आपण पाहायला हवे. आपल्या कलेत भारतीयत्व कसे असायला हवे, हे त्यांनी मांडले. पण, तेही मागे पडले. आपल्याच लोकांना रुचले नाही?


उदाहरणार्थ, दिल्लीत जेव्हा राजधानी बदलली, तेव्हा तिथल्या राजप्रासादात असणार्‍या एका भवनाच्या अलंकारणाचे काम आले, ते जे. जे. स्कूलच्या विद्यार्थ्यांना मिळाले. कलेचा हा कायाकल्प सतत होत असतो. भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठीच हे प्रयत्न १०० वर्षांपूर्वी सुद्धा होत होते. एक नवी दृष्टी आपल्या भारतातील कलाप्रकारांना देणे म्हणजे पाश्चात्य कलेचे अंधानुकरण नाही. आता तू बघ एम. एफ. हुसेनची जी कला आहे, ती एका अर्थाने भारतीयच आहे. म्हणून कलाकारांना त्यांच्या कल्पना असतात, हे समजून आपण केवळ मार्गदर्शन करू शकतो. त्यांना घडवायचे काम करू नये. म्हणून नवे शैक्षणिक धोरण अभ्यासणे महत्त्वाचे ठरते.कला केवळ आपण घडवत नसतो, तर ती तशीही कालानुरूप बदलत असते, घडत असते. त्यामुळे कलेत बदल होणारच; पण उत्तम कलाकार तयार होतील, यासाठी उत्तम पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतील, यासाठी आमचा प्रयत्न असेल. कारण, कला विद्यार्थ्यांसोबत कलेचे भविष्यही उज्ज्वल आहेच!


मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.