गुजराती लिपीमध्ये पहिल्यांदाच शब्दचित्र रेखाटताना हिरल भगत यांनी शहर, स्थलांतर यांसारख्या गंभीर विषयांना हात घातला आहे. त्यांच्या याच आगळ्यावेगळ्या शब्दचित्रांचा आणि या शब्दचित्रांमागच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...
अभिव्यक्तीचा सूर माणसाला केव्हा आणि कसा सापडेल, याचे काही एक सरधोपट गणित नसते. माणसाचे अंतरंग त्याला जसा प्रतिसाद देतात, तसा तो त्याची अभिव्यक्ती फुलवत जातो. आपल्या मार्गावर चालता चालता त्याला स्वतःची आणि स्वतःच्या कलेची नव्याने ओळखही होत जाते. हिरल भगत यांना शब्दचित्रांमध्ये आपल्या अभिव्यक्तीचा सूर सापडला. त्यांनी जसे शब्दचित्रांना आकार दिला, तसेच शब्दचित्रांनीसुद्धा त्यांना घडवले. जवळपास एक दशकांहून अधिक काळ शब्दचित्रांची साधना करताना त्यांना त्यांच्या कलेचे संचित गवसले. या कलासंचितामध्ये कविता आहे, मानवी भावभावनांचे दर्शन आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या या कलेमध्ये जिवंतपणा आहे. मुंबईतील जहांगीर कलादालन येथे दि. २ ते ८ जून, सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत या शब्दचित्रांचा आस्वाद कलारसिकांना घेता येणार आहे.
‘शब्दचित्र’ या कला प्रकारातील विविधता कलेच्या वाढीसाठी तशी अत्यंत पूरक. शब्दचित्रांच्या अभिव्यक्तीचे विस्तारलेले क्षितिज या गोष्टीची साक्ष देणारे आहे. ‘कॅलिग्राफी’ या कलाप्रकाराकडे केवळ शब्दांची एक विशिष्ट रंगसंगती व आकृतीबंधनिर्मिती अशा आशयाने न पाहता, यामध्ये किती विविधता असू शकते, याची प्रचिती चित्रकारांनी निर्माण केलेल्या शब्दचित्रातून येते. गुजराती भाषा आणि गुजराती लिपीमध्ये शब्दचित्रांची मुहूर्तमेढ रोवणारं असचं एक नाव म्हणजे हिरल भगत. कॅलिग्राफीच्या माध्यमातून त्यांना त्यांचा ‘स्व’ गवसला. कला शाखेची विद्यार्थिनी म्हणून ‘व्हिज्युअल आर्ट’शी त्यांचा परिचय होताच. अच्युत पालव यांच्या शब्दचित्रांच्या प्रेरणेतून हिरल भगत यांनी कामाला सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात रोमन, देवनागरी या लिपींच्या माध्यमातून शब्दचित्रांच्या विश्वात त्या मुशाफिरी करत होत्या. परंतु, कालांतराने हिरलं यांना असं लक्षात आलं की, अद्याप गुजराती लिपीमध्ये अशा प्रकारची शब्दचित्र काढलीच गेलेली नाही. आपल्या मातृभाषेमध्ये या कलेचा आणि या कलाविचाराचा प्रचार- प्रसार व्हावा, यासाठी मग त्यांनी कामाचा श्रीगणेशा केला.
हिरल भगत यांनी कुठल्याही प्रकारच्या चौकटींना न जुमानता, आपल्या कुंचल्यातून एक वेगळाच अविष्कार सिद्ध केला. हिरल यांच्या शब्दचित्रांमधून कवितेचं विश्व डोकावतं. परंतु, या कविता प्रेमाच्या आणि विरहाच्या नाहीत. या कविता आहेत शहराच्या, या कविता आहेत स्थलांतराच्या... स्थलांतराची प्रक्रिया माणसामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणते. एक कलाकार आपल्या नजरेतून हे बदल समर्थपणे टिपत असतो. एक कवी हे बदल शब्दबद्ध करतो आणि आपल्या वर्तमानाकडे बघण्याची आपल्याला एक नवीन दृष्टी प्रदान करतो.
गुजराती साहित्याला मागच्या अनेक शतकांपासून कवींची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. नरसी मेहता यांना गुजराती भाषेचे आद्यकवी मानलं जातं. आधुनिक काळामध्ये कवितेच्या माध्यमातून अहमदाबाद या शहराच्या स्थित्यंतरावर व स्थलांतरावर भाष्य करणारी काव्ये अनेकांनी केली. आदिल मंसूरी, निरंजन भगत, निर्जरी मेहता ही त्यांपैकी काही मोजकी नावे. हिरल भगत यांनी दिनेश देसाई आणि जयश्री देसाई यांनी संपादित केलेल्या काव्यसंग्रहाच्या ओळी आपल्या शब्दचित्रांमध्ये मांडलेल्या आहेत. इथे केवळ शब्दांना त्या रेखाटतच नाहीत, तर त्या शब्दांच्या माध्यमातून एका नव्या वास्तवाचा आपल्याला परिचयदेखील करून देतात. यामुळेच त्यांचे शब्द केवळ वाचले जात नाहीत, तर त्या चित्रांच्या माध्यमातून शब्दांची आगळीवेगळी अनुभूती दर्शकाला होते. व्यक्तिशः हिरल यांनी आपल्या जीवनामध्ये स्थलांतर अनुभवले आहे. एका बाजूला मुंबई आणि दुसर्या बाजूला अहमदाबाद, अशा दोन महानगरांचे जीवनविश्व त्यांच्या शब्दाचित्रातून डोकावतं. प्रत्येक शहराचा स्वतःचा एक इतिहास असतो, भूगोल असतो. त्याअनुषंगाने आपल्याला त्या शहरामध्ये अनेक स्थित्यंतरे अनुभवायला मिळतात. या स्थित्यंतराचा कोलाज म्हणजे हिरल भगत यांची शब्दचित्रे. ’थरपवशीळपस लळीूं’ या त्यांच्या चित्रामध्ये शहराची वेगवेगळी रूपे आपल्याला बघायला मिळतात. आपण ज्या महानगरात वावरतो, त्याच महानगराची आपल्याला स्वप्ने पडायला लागली तर? ही स्वप्ने नक्कीच एकजिनसी नसतील, त्या स्वप्नांमध्ये विघटन असेल, प्रवाह असेल, कधी कधी तिथे एकटेपणासुद्धा असेल. या सगळ्यांचे अचूक रेखाटन आपल्याला बघायला मिळते. शब्दांच्या या शिल्पामध्ये जेव्हा अक्षरे दाटीवाटीने एकमेकांना घट्ट चिकटलेली असतात, तेव्हा त्याला ‘आधुनिक अरण्य’ हे नाव का दिलं, हे आपल्या लक्षात येतं. या शब्दचित्रांच्या माध्यमातून शहराच्या जीवनावर, शहराच्या जाणिवांवर भाष्य करण्यात आले आहे. संवेदनशील माणसाच्या मनातून हळूहळू शहर दूर जातं, त्या शहराकडे बघताना एक समग्र चित्र तयार होतं. या घटनेचे प्रतिबिंब आपल्याला या शब्दचित्रांमध्ये उमटलेलं दिसतं. गुजराती भाषा आणि गुजराती लिपी यांमध्ये पहिल्यांदाच शब्दचित्र रेखाटताना, शहर आणि स्थलांतर हा विषय हिरल भगत यांनी अतिशय सक्षमपणे हाताळलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यांनी रेखाटलेले शब्दचित्रे येणार्या कलाकारांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील, यात शंका नाही.