मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणार्या ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर पाहून एकच प्रश्न सगळ्यांना पडला आहे, ‘तो म्हणजे बॅग कुठे आहे?’ टीझरमध्ये एका काळ्या बॅगेभोवती फिरणारी गोष्ट उलगडताना दिसते. प्रारंभीच दाखवलेली पैशांनी भरलेली बॅग गायब होते आणि तिथून सुरू होतो, रहस्याने भरलेला व विनोदाने सजलेला प्रवास. या बॅगेच्या शोधात अनेकजण एकमेकांवर संशय घेताना, गोंधळात अडकताना दिसत आहेत. त्यामुळे एकीकडे रहस्य वाढते, तर दुसरीकडे संवाद आणि प्रसंगांमधून विनोदही प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. ही बॅग नेमकी कुठे गेली, हे दि. ४ जुलैला चित्रपटगृहात पाहायला मिळेल.
या चित्रपटात प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारखे उत्तम कलाकार पाहायला मिळणार असून, प्रत्येक पात्राकडे एक गूढ बाजू आहे आणि ती पडद्यावर उलगडताना या कलाकारांचा अभिनय चित्रपटाला अधिकच मनोरंजक बनवतो. तन्वी फिल्म्स’ प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत, तर लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा योगिराज गायकवाड यांनी सांभाळली आहे.