‘डिजिटल अरेस्ट’चा अजून एक बळी; कर्नाटकातील महिलेला तब्बल ३.१६ कोटी रुपयांचा गंडा

    15-Jul-2025
Total Views |

 
बंगळूर: गेल्या काही महिन्यांत डिजिटल अरेस्ट घोटाळे झपट्याने वाढत आहेत. डिजिटल अरेस्ट पीडितांनी त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण बचत गमावल्याचे आपण ऐकतो. अशातच आता एका ४० वर्षीय कर्नाटकातील महिलेला डिजिटल अरेस्ट घोटाळ्यात तब्बल ३.१६ कोटी रुपये गमवावे लागले आहेत. गुन्हेगारांनी स्वतःला एनसीआरपीचे अधिकारी आणि सरकारी वकील म्हणून तिच्यावर दबाव आणत ही फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 
सायबर इकॉनॉमिक अँड नार्कोटिक्स क्राइम यांच्या माहीतीनुसार, दि. ६ जून रोजी, पीडितेला नॅशनल क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी) वरून बोलत असल्याचा दावा करणाऱ्या स्कॅमर्सकडून फोन आला. कॉलरने आरोप केला की तिच्या पतीच्या नावाने नोंदणीकृत असलेले सिम कार्ड बेकायदेशीर कामांसाठी वापरले जात आहे. पुढील काही दिवस स्कॅमर्सकडून पीडितेला वारंवार फोन येत होते. ज्यात एका स्कॅमरने सरकारी वकिलाची नक्कल करत पीडितेला वैयक्तिक आणि आर्थिक माहीती शेअर करण्यासाठी दबाव आणत पडताळणी प्रक्रियेनंतर पैसे परत केले जातील असे सांगून महिलेने १० जून ते २७ जून रोजीपर्यंत शेअर केलेल्या तिच्या अनेक बँक खात्यांमधून तब्बल ३.१६ कोटी रुपये चोरले.
 
या प्रकरणी, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, पोलिसांना दाट संशय आहे की, या घोटाळ्यामागे सायबर गुन्हेगारांचे मोठे नेटवर्क आहे ज्यामध्ये अनेक बनावट व्यक्तींचा समावेश आहे. पोलिसांनी ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या वाढत्या प्रकरणांचा इशारा देत नागरीकांना आवाहन केले कि, अनावश्यक कॉलवर वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील शेअर करणे टाळावे आणि सावधगिरी बाळगावी. असे कॉल आल्यास त्वरित तक्रार करण्याचे आवाहनसुद्धा पोलिसांनी केले आहे.