काही माणसे आपल्याला सर्वांर्थाने कळली, असे आपल्याला वाटते. प्रत्यक्षात मात्र आपण केवळ आपल्या बुद्धी व आकलनाच्या आधारे ती व्यक्ती कळली, असा दावा करत राहतो. ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे काकांच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. गिरीश काका म्हटले की भटक्या-विमुक्त समाजातील त्यांचे काम डोळ्यांसमोर उभे राहते. असाहाय्य, अकिंचन, अशिक्षित समाजाला मुख्य धारेशी जोडण्यासाठी गिरीश काकांनी काम केले. प्रचलित सामाजिक चळवळी व संस्था-संघटनांचा इतिहास पाहता, हे काम गिरीश काकांनी का केले? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण, स्वतः गिरीश काका भटक्या समूहातील नाहीत. आज ‘ज्या जातीचे नेतृत्व, त्या जातीचे संघटन’ अशी चळवळीची स्थिती असताना, गिरीश काकांनी भटक्या-विमुक्त जाती व जमातींसाठी चळवळ का केली, हा प्रश्न उपस्थित होतोच. याचे उत्तर आहे, गिरीश प्रभुणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. हे स्वयंसेवकपणच गिरीश काकांसाठी भटक्या-विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी कार्यप्रवण राहिले.
1956 साली चिपळूण येथे वयाच्या सहाव्या वर्षी गिरीश काका संघ शाखेत गेले आणि धम्मदीक्षेमुळे घडवून आलेले सामाजिक अभिसरणही त्यांनी याच काळात अनुभवले. आपले काही शाखामित्र एका दिवसात शाळेपासून दूर झाले. काय ताकद असेल त्या दिवसाची? त्या नकळत्या वयात असा प्रश्न गिरीश काकांना पडला नसेल, तर नवलच!
वडिलांच्या नोकरीमुळे बारा गावची फिरस्ती झाली. जिथे जातील तिथे संघ शाखा. सातारा रोड येथील वास्तव्य काळात कैकाडी या भटक्या जमातीतील कुटुंबाशी झालेले स्नेह आणि त्यातून घर सोडून त्या भटक्यांच्या तांड्यासोबत भ्रमंती करून गिरीश काकांनी समाजदर्शन घेतले. कोयना नदीवर धरण बांधण्यात आले. बाधित गावांचे पुनर्वसन करण्यात आले. अशाच एका गावात गिरीश काकांनी शाखा लावली. दि. 14 एप्रिल रोजी शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरीहीकेली. संगीतकार राम कदम यांनी दिलेली बुद्ध वेदनेचे सामुदायिक वाचन केले. अशी जडणघडण होताना गिरीश काका हळूहळू संघमय होत गेले. संघ म्हणतो, ‘हा सारा हिंदू समाज आपला भाऊ आहे. आपण त्यावर भ्रातृवत प्रेम केले पाहिजे. ही भारतमाता आपली आई आणि तिच्या उत्थानासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.’ संघ असे सांगतो, मग ते व्यवहारात जगणे आपले कर्तव्य आहे. हे जगणे गिरीश काकांनी बालवयातच आत्मसात केले. तारुण्यात पदार्पण करताना प्रचारक जीवनाचा अनुभव घेतला.
भोर आणि मुळशी तालुक्यातील संघकाम वाढवण्यासाठी गिरीश काकांनी प्रचारक म्हणून काम केले. वडील निवृत्त झाले आणि घरची जबाबदारी पेलण्यासाठी गिरीश काका प्रचारक जीवन थांबवून चिंचवडमध्ये आले. 1971च्या आसपासची ही गोष्ट. तेव्हा प्रचारक जीवन थांबले, पण आजही तीच वृत्ती आणि तसाच व्यवहार अनुभवास येतो. राष्ट्रीय विचार, सामाजिक एकात्मता या केवळ भाषणाच्या गोष्टी नाहीत, तर जगण्याच्या गोष्टी आहेत, हे गेली 50 वर्षांहून अधिक वर्षे गिरीश काका आपल्या सहज वर्तनातून दाखवून देत आहेत. संघर्ष आणि समन्वय या दोन्ही गोष्टी गिरीश काकांच्या जीवनात अनेक वेळा आल्या. पण, त्यामागचा हेतू संघविचार होता. चिंचवडचा क्रांतिवीर चापेकर बंधूंचा वाडा मुक्त करताना त्यांनी संघर्ष केला, तर चिंचवडमध्ये दलित साहित्य संमेलन आयोजित करून गंगाधर पानतावणेंपासून ते टेक्सास गायकवाडांपर्यंत सार्यांना निमंत्रण दिले. नकार, विद्रोहाच्या पलीकडे काहीतरी आहे, तो आहे बंधुभाव, याच बंधुभावाची अनुभूती येण्यासाठी कृतिरूप समन्वय आवश्यक आहे. तो गिरीश काकांनी अंगीकारला. पुढे निमगाव म्हाळुंगी येथे ‘ग्रामायण’चे काम करताना पोट जाळण्यासाठी गाव सोडून परागंदा झालेल्या बांधवांना पुन्हा गावात आणून त्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी गिरीश काकांनी जे प्रयत्न केले, ते एका समाजऋषीचे प्रयोग होते.
कुर्डूवाडीजवळ ‘मिनार एक्सप्रेस’वर दरोडा टाकणार्या पारध्यांचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला आणि ती बातमी ऐकून संघमानस अस्वस्थ झाले आणि सुरू झाली एक शोधयात्रा. या यात्रेचे प्रमुख यात्रिक होते गिरीश काका होते. त्यांनी केवळ पारध्यांची पाले शोधली नाहीत, तर पारध्यांचा गौरवशाली इतिहास आणि त्यांचे भारतीय समाजाच्या विकासातील योगदानही शोधून काढले. संघविचारांतून भटक्या-विमुक्तांचे काम सुरू झाले आणि पायाला भिंगरी लावून गिरीश काकांनी सारा महाराष्ट्र पालथा घातला. पारध्यांबरोबरच वडार, गोंधळी, नंदीबैलवाले, मरिआईवाले, मशानजोगी, डवरी गोसावी, ओतारी, तडवी भिल्ल अशा असंख्य भटक्या-विमुक्त जातींचा इतिहास समजून घेतला आणि त्या त्या समाजाला विस्मृत झालेला त्यांचा गौरवशाली वारसा सांगितला. संघ योजनेतून सुरू झालेल्या ‘भटके-विमुक्त विकास परिषदे’चे गिरीश काका संघटनमंत्री. संघटनेची धुरा सांभाळत त्यांनी भटक्या-विमुक्त जातीजमातींमध्ये संघ पोहोचवला. संघ विचार म्हणजे तरी काय? सत्य, चारित्र्य, प्रामाणिकपणा, परस्पर विश्वास, आपुलकी, सहवेदना. या गोष्टी भटक्या-विमुक्तांच्या जीवनात अभावानेच दिसत. कारण, त्या अंगीकार केल्या तर जगणे मुश्किल. पण, काकांनी अथक परिश्रम केले आणि अकल्पित घडले.
एक पारधी पोलीस स्टेशनमध्ये नंदीबैलवाल्याची बाजू घेत म्हणाला, “हे नंदीबैलवाले धर्माची माणसं, ते चोरी नाही करत.” हीच आत्मीयता, हाच विश्वास संघ समाजात अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. गिरीश काकांनी तो भटक्या समाजात जागवला. यमगरवाडी, ‘समरसता पुनरूत्थान गुरुकुलम्’च्या माध्यमातून गिरीश काकांनी हाच विश्वास व हीच आत्मीयता नव्या पिढीमध्ये पेरली. समाजाच्या मूळ धारेपासून तुटलेल्या आपल्याच बांधवांना पुन्हा जोडून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
आपल्या ज्ञानपरंपरा, आपल्या कला आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालत कौशल्यसंपन्न पिढी गिरीश काकांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहे. त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे उपेक्षा आणि अवहेलनेची शिकार झालेल्या समाजात डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक तयार झाले आहेत. यामागे गिरीश काकांचे योगदान आहे. पण असे म्हटले, तर ते काकांना आवडत नाही. “मी संघाचे काम करतो, त्यामुळे या कामातून निर्माण झालेल्या परिणामांचे श्रेय संघविचाराचे आहे,” हा भाव कायम मनात ठेवून गिरीश काका संघ विचार जगले आणि या जगण्याची परिणीती गिरीश काकांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात झाली. ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित गिरीश प्रभुणे काकांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांना दीर्घायु आणि निरामय जीवनाच्या शुभेच्छा.
- रवींद्र गोळे