आई- बाबा नाहीत, कुणीही नाही... ही सल एखाद्या लहान लेकराच्या डोळ्यात दिसली, तर काळीज हादरतं. अशीच एक गोष्ट आहे रेखा, शितल, अर्जुन आणि रामकृष्ण या चार भावंडांची. वडील गेल्यानंतर एका क्षणात त्यांचं जीवनच उद्ध्वस्त झालं. घर नाही, आधार नाही, नातेवाईकांनीही साथ सोडली. लहान वयातच त्यांच्या डोळ्यात अनाथपणाची भीती उतरली होती.
कोणालाही नकोशी झालेली ही चार भावंडं निराशा, भितीने थरथरत होती. त्यावेळी एक सज्जन व्यक्ती त्यांच्या मदतीला धावली आणि त्यांना गिरीश प्रभुणे यांच्या ‘यमगरवाडी एकलव्य शिक्षण संकुला’त आणून दिलं. त्या दिवशी गिरीश यांनी त्या चारही भावंडांना आपुलकीने जवळ घेतले, प्रेमाने डोळे पुसले आणि म्हणाले, “तुम्हाला कोणी नाही असं समजू नका. मीच तुमचा आईबाबा आहे.”
हे शब्द फक्त दिलासा नव्हते, तर ते वचन होतं. त्या दिवसापासून या भावंडांना केवळ छप्पर नाही, तर मायेचं घर मिळालं. रेखा तेव्हा सात वर्षांची होती, शितल पाच, अर्जुन तीन वर्षांचा आणि रामकृष्ण अवघ्या सहा महिन्यांचा. एवढ्या कोवळ्या वयात, जेव्हा सगळं हरवल्यासारखं वाटत होतं, तेव्हा गिरीश प्रभुणे यांनी त्या निरागस जीवांना आयुष्य दिलं.
‘एकलव्य शिक्षण संकुला’त त्यांना प्रभुणे काकांनी केवळ आश्रयच दिला नाही, तर शिक्षणाची गोडीही लावली. अंगणवाडीतून शाळेत, शाळेतून पुढील शिक्षणाच्या प्रवासाकडे काकांनी त्यांना उत्थानाची वाट दाखवली. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांना शिकवलं की, परिस्थिती कितीही वाईट असली, तरी स्वप्न ही पाहायलाच हवी.
आज ही चारही भावंडं समाजासमोर एक आदर्श म्हणून उभी आहेत. रेखा मुंबईत मुलुंड येथील रुग्णालयात परिचारिका म्हणून अनेकांना आधार देते. शितलनेही परिचारिका प्रशिक्षण घेऊन रुग्णसेवेत योगदान दिलं आहे. अर्जुनने आयुर्वेद महाविद्यालयातून ‘बीएएमएस’ (इअचड) पदवी मिळवली आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. तो ‘एकलव्य शिक्षण संकुला’तून पारधी समाजातील पहिला डॉक्टर ठरला. सर्वांत लहान भाऊ रामकृष्ण सध्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे शिक्षण घेत आहे.
ही यशोगाथा केवळ या चार भावंडांची नाही, तर ही गिरीश यांच्या मायेची, तळमळीची आणि शिक्षणावरच्या अगाध विश्वासाची आहे. गिरीश प्रभुणे यांनी दाखवलेली माया, प्रेम आणि समर्पणामुळे या मुलांनी नव्या जीवनाची वाट धरली. त्यांच्या संस्कारांनी या भावंडांना माणुसकीची खरी किंमत शिकवली. आजही ही चारही भावंडं आपल्या गिरीश काकांना आदर्श मानतात. गिरीश काकांनी आम्हाला वाढवलं, शिकवलं, जगायला शिकवलं. त्यांच्यामुळेच आम्ही इथवर पोहोचलो. आता त्यांच्या आदर्शावर चालत आम्हीही समाजात सकारात्मक काम करू, अशी त्यांची ठाम भावना आहे.
ही गोष्ट फक्त चार मुलांची नाही; ती आपल्याला सांगते की, माणुसकीचं बळ किती मोठं असतं. खरंच कुणी नसलं, तरी कुणीतरी असतंच, जो अनाथांना आपलं म्हणतो, त्यांचं जीवन घडवतो आणि समाजापुढे एक प्रेरणादायी उदाहरण उभं करतो.
- सागर देवरे