या जगात जे काही उत्तम आहे, त्याचे रचियेता पाश्चिमात्य लोक आहेत, असा एक समज युरोपियनांमध्ये आढळतो. अर्थात, हा अहंकार अनेक पिढ्यांमधून पाश्चात्यांच्या रक्ताचा गुण झाला आहे. त्यामुळेच धर्म ते रंग असे अनेक भेदाभेद त्यांनी केले. मात्र, काही वर्षांपूर्वी युरोपीय प्रदेशात राहणारा मानव कृष्णवर्णीय असल्याचा शोध अलीकडेच लागला. त्याचा हा आढावा...
पन सिन्हा हे एक प्रसिद्घ बंगाली चित्रपट दिग्दर्शक होते. सत्यजित राय (रे हा चुकीचा उच्चार), मृणाल सेन, ऋत्विक घटक आणि तपन सिन्हा ही बंगाली चित्रपट क्षेत्रातली महत्त्वपूर्ण चौकडी मानली जाते. 1970 साली तपन सिन्हांनी बंगाली भाषेत ‘सगीना महतो’ नावाचा चित्रपट काढला. हिंदी चित्रपटातला महानायक दिलीपकुमार हा या चित्रपटाचा नायक होता. दिलीपकुमार उर्फ युुसुफ खानने प्रादेशिक भाषेत काम केलेला हा एकमेव चित्रपट. दार्जिलिंग परिसरातले चहाचे मळे इंग्रजांच्या मालकीचे होते. हे मळेवाले गोरे लोक स्थानिक कामगारांना पिळून काढत. त्यांच्याविरुद्ध कामगारांना संघटित करणार्या सगीना महतो या खर्याखुर्या मजदूर नेत्यावर आधारलेला हा चित्रपट, तिकीटबारीवर चांगलाच यशस्वी झाला.
मग 1974 साली तपनदांनी त्याच कथेवर ‘सगीना’ हा हिंदी चित्रपट काढला. हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद या तीन महानायकांचे, संगीतकार आणि गायक जवळपास पक्के ठरलेले असायचे. दिलीपकुमार नायक म्हटला की, संगीतकार नौशाद आणि आवाज रफीचा; राज कपूर नायक म्हटला की, संगीतकार शंकर-जयकिशन आणि आवाज मुकेश किंवा मन्ना डे यांचे. देव आनंद नायक म्हणजे, संगीत सचिन देव बर्मनचे आणि गायक रफी किंवा किशोर, अशी समीकरणे ठरलेली होती.
तपनदांच्या या हिंदी ‘सगीना’मध्ये नायक दिलीपकुमार होता; पण संगीत सचिन दादा बर्मन यांचे, तर आवाज किशोर कुमारचा होता. दिलीपकुमार आणि ओमप्रकाश यांच्यावर चित्रित झालेल्या एका विनोदी गाण्यात गीतकार मजरूह सुलतानपुरी लिहितात, “साला मैं तो साहब बन गया... ये सूट मेरा देखो, ये बूट मेरा देखो, जैसे गोरा कोई लंधन का.’
आपणा सगळ्यांनाच केव्हा ना केव्हा हा अनुभव येतो की, नेहमी आपल्याबरोबर हसून-खेळून राहणारा एखादा सहकारी, मित्र जरा वरच्या पदावर गेला, त्याला जरा मान, प्रतिष्ठा, पैसा मिळाला की, तो लगेच ‘साहेब’ बनतो. नुसत्या पदाने नव्हे, तर लगेच तो स्वतःला आताच आपण ‘लंंधन’ (लंडन)वरून उतरलोत, असे समजायला लागतो. त्याच्या नजरेत, कालपर्यंतचे बरोबरीचे सहकारी, मित्र आता ‘ऑल दीज ब्लडी नेटिव्ह इंडियन्स, ब्लॅकीज्’ ठरतात. ही भावना गीतामध्ये अचूक पकडून मजरूह पुढे लिहितात, “तुम लंगोटीवाला ना बदला हैं, ना बदलेगा; तुम सब काला लोग का किस्मत, हम साला बदलेगा.”
‘आम्ही गोरे लोक रंगाने आणि वंशानेसुद्धा श्रेष्ठ आहोत आणि जगातले इतर सर्व रंग आणि वंश आमच्यापेक्षा नीच आहेत. त्यामुळे जगावर राज्य करणे, हे मुळी आमचे दैवदत्त कार्यच आहे. आम्ही या काळ्या, पिवळ्या, लाल रंगांच्या नि हलक्या वंशांच्या लोकांना गुलाम म्हणून वागवू आणि हळूहळू त्यांना सुधारून सुशिक्षित नि सुसंस्कृत बनवू,’ असा भयंकर अहंगंड ‘सुपिरिऑरिटी कॉम्प्लेक्स’ युरोपातील गोर्या रंगाच्या लोकांना होता, आजही आहे. या भावनेवर आधारित एक कविता रुडयार्ड किपलिंग या सुप्रसिद्ध ब्रिटिश साहित्यिकाने लिहिली. तिचे नाव ‘व्हाईट मॅन्स बर्डन.’ या कवितेत त्याने हीच भावना अभिव्यक्त केली की, आशिया-आफ्रिकेतील काळ्या-पिवळ्या लोकांना सुधारणे, हे जॉन बुलच्या खांद्यावरचे ओझे आहे, तर अमेरिकेतल्या लाल (रेड इंडियन्स) लोकांना सुधारणे हे अंकल सॅमच्या खांद्यावरचे ओझे आहे, वृत्तपत्रीय आणि साहित्यिक परिभाषेत ब्रिटनला ‘जॉन बुल’, तर अमेरिकेला ‘अंकल सॅम’ असे म्हटले जाते. रूडयार्ड किपलिंगला आपल्या गोर्या रंगाचा आणि अँग्लो-रॉक्सन वंशाचा भयंकर अभिमान होता. याची उलट बाजू म्हणजे, तो काळ्या लोकांचा भयंकर तिरस्कार करीत असे. त्यांना तुच्छ, हलके, गुलाम बनण्याच्या लायकीचे समजत असे. गंमत म्हणजे त्याचा जन्म 1865 साली मुंबईत झाला कारण, त्यावेळी त्याचा बाप लॉकवुड किपलिंग हा मुंबईचा प्रसिद्घ ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्’चा प्रिन्सिपल होता. लहान मुलांना फार प्रिय असलेल्या ‘जंगलबुक’ आणि त्यातल्या ‘मोगली’ या व्यक्तिरेखेचा निर्माता असणारा हा रुडयार्ड किपलिंग भारतीय लोकांचा मनःपूर्वक द्वेष करायचा. कारण, ते रंगाने काळे होते नि वंशाने अँग्लो-सॅक्सन, ग्रीको-रोमन, जर्मेनिक वगैरे उच्च बीजाचे नसून, अनेक सरमिसळ वंशांचे होते. ‘चड्डी पहन के फूल खिला हैं’ अशी मोगलीची गोंडस, निरागस व्यक्तिरेखा रेखाटणारा हा लेखक मनाने विषारीच होता.
युरोपीय गोर्या कातडीच्या लोकांना आपल्या रंगाचा आणि वंशाचा हा भयंकर अहंगंड केव्हापासून निर्माण झाला? तर असे म्हणता येईल की, युरोपात ‘पुनरुत्थान’ किंवा ‘रेनेसान्स’ काळ म्हणजे साधारण इसवी सनाच्या 15व्या शतकापासून हा अहंकार पोसला जायला सुरुवात झाली. आमची चित्रकला श्रेष्ठ, आमची शिल्पकला श्रेष्ठ, आमची स्थापत्यकला श्रेष्ठ, आमचे नकाशाशास्त्र अत्याधुनिक, आमचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सतत विस्तार पावणारे, आमचे नौकानयन श्रेष्ठ, आमच्या धाडसी दर्यावर्दींनी त्या नौकानयनाचा उपयोग करून नवनवीन खंडे शोधली.
अरेच्चा! या नव्या शोधलेल्या किंवा जुन्याच, पण नव्याने संबंध प्रस्थापित झालेल्या खंडांमधले लोक शस्त्रास्त्रांमध्ये आमच्यासारखे प्रगत नाहीत, मग लुटा त्यांना. ठार मारा, बाटवून ख्रिश्चन बनवा. अरेच्चा! हे सगळे आम्ही सहज करू शकलो की! म्हणजे मग आम्ही नक्कीच श्रेष्ठ आहोत. आमचा रंग, आमचा वंश, आमचा धर्म श्रेष्ठच आहेत. म्हणून तर आम्ही या सगळ्या काळ्या, पिवळ्या, लाल कातडीच्या लोकांना जिंकू शकलो. देवाने आम्हाला गौरेतर लोकांवर राज्य करण्यासाठीच जन्माला घातले आहे.
अहंगंड हा माणसाला अफू सेवनाप्रमाणेच उन्मादी बनवतो. गंमत म्हणजे हा उन्माद मुख्यतः पश्चिम युरोपातल्या लोकांना आणि पश्चिम युरोपचेच ‘एक्स्टेन्शन’ असलेल्या अमेरिकन लोकांना आहे. ते पूर्व युरोपीय देशांनापण आपल्यात धरत नाहीत, कारण रशिया, पोलंड, रुमेनिया, बल्गेरिया इत्यादी पूर्व युरोपीय देशांचे लोक रंगाने गोरे असले, तरी वंशाने ‘स्लाव्ह’ आहेत. स्लाव्ह म्हणजेच स्लेव्ह किंवा गुलाम. तसेच, धर्माने ते ख्रिश्चनच असले, तरी त्यांचा पंथ पश्चिम युुरोपप्रमाणे कॅथलिक किंवा प्रोटेस्टंट नसून, ग्रीक ऑर्थोडॉक्स हा आहे.
आता, आधुनिक काळात प्रभावी शस्त्रास्त्रे, प्रभावी सैन्यशक्ती, या दोन्हींच्या बळावर यशस्वी राजकारण; त्यातून सर्वच मिळणारे विजय; त्यातून मिळणारी संपत्ती, सुबत्ता; त्या बळावर विज्ञान-तंत्रज्ञानात आणखी प्रगती, असे एका पाठोपाठ एक वैभवाचे टप्पे गोर्या लोकांनी गाठलेे. त्यामुळे विविध शास्त्रीय क्षेत्रातले गुणवत्तेचे निकष पण त्यांनीच ठरवले. उदा. अॅन्थ्रोपोलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र ही विज्ञानशाखा त्यांनीच ठरवली. मग कवटीचा अमूक आकार हाच आदर्श, नाक, ओठ, जबडा यांची अमूक ठेवण हीच श्रेष्ठ; केसांचे वळण, कातडीचा रंग, एकूण देहाचा बांधा अमूक प्रकारचा असेल, तोच श्रेष्ठ ही सगळी लक्षणे त्यांनीच ठरवली. मोठे डोके, सरळ नाक, सरळ केस, गोरा रंग, निळे डोळे, उंच बांधा असणारे युरोपीय लोकच श्रेष्ठ, बाकी सगळे तुच्छ. दुर्दैवाने शतकानुशतके राजकीय गुलामगिरीत काढल्यामुळे, काळ्या लोकांना स्वतःला पण तसेच वाटू लागले. आसने, प्राणायाम, ध्यान यांचे महत्त्व सांगणारे साधूसंत हे येडे, हाफ पॅन्ट घालून संघ शाखेत जाणारे तर अगदीच येडे. पण, गोर्या लोकांनी ‘योगा’ म्हणून तंगड्या वर केल्या की, मात्र ती फॅशन. गोर्या लोकांनी घाणेरड्या, घळघळीत, नाडी लोंबणार्या चड्ड्या घातल्या की, त्या बर्मूडा पॅन्टस्! त्यांची किंमत शेकड्यांमध्ये!
असो. तर, ब्रिटनमधल्या सॉमरसेट परगण्यात ‘चेडर गॉर्ज’ नावाचा एक डोंगराळ भाग आहे. या चुनखडीच्या डोंगरांमध्ये अनेक गुहा आहेत. त्यांपैकी एका गुहेत, एक पूर्णाकृती मानवी सांगाडा सापडला. याच्या नानाविध प्रकारच्या परीक्षांनंतर असे आढळले की, हा माणूस मेसोलिथिक काळात म्हणजे आजपासून दहा हजार वर्षांपूर्वी या ठिकाणी वस्ती करून राहिला होता. तो दगडी हत्यारांनी शिकार करून आणि कंदमुळे खणून काढून उपजीविका करत होता. त्याचा जबडा, ओठ, नाक यांची ठेवण साधारण आजच्या ब्रिटिश माणसासारखीच होती. त्याचे डोळे निळे होते. पण... पण त्याचा रंग मात्र काळा होता. संशोधन करणारे पुरातत्त्वशास्त्रज्ञ पुढे म्हणतात की, हंगेरी, लक्सेंबर्ग, स्पेन इत्यादी देशांमध्येही असेच अवशेष आढळले आहेत. यावरून असा निष्कर्ष निघतो की, दहा हजार वर्षांपूर्वी सर्वसाधारण युरोपीय माणूस रंगाने काळाच होता. नंतरच्या निओलिथिक आणि ब्रॉन्झ युगात पूर्वेकडून म्हणजे आशिया खंडातून, गोरी किंवा उजळ रंगाची माणसे युुरोपात स्थलांतरित होत गेली. ‘बीबीसी’ने काही पुरातत्त्व शास्त्रज्ञांना विचारले की, इ.स. 2000 ते 2025 या काळातली कोणती नवी घटना तुम्हाला लक्षणीय वाटते. त्यावरचे हे एका मान्यवर वैज्ञानिक महिलेचे उत्तर आहे. मग, आता? ‘इन सब काला लोेग का किस्मत बदलेगा?’
पिरॅमिड्सचे गवंडी
मुंबई बंदरासमोर भर समुद्रात घारापुरी हे बेट आहे. मराठी माणसांना घारापुरी म्हटले की, समजत नाही, एलिफंटा म्हटले की लगेच समजते. कारण, ते नाव गोर्या चामडीच्या पोर्तुगीजांनी ठेवलेले आहे. तर या घारापुरी बेटावर त्रिमूर्ती या भव्य शिल्पासह इतरही शिल्पे कोरलेल्या गुंफा आहेत. इसवी सनाच्या 8व्या शतकात घारापुरीसह उत्तर कोकण भागावर, शैव मताच्या पाशुपत संप्रदायाचा प्रभाव होता. त्यांनी या गुंफा कोरल्या असाव्यात, असा तज्ज्ञांचा तर्क आहे. पुढे जाऊन तज्ज्ञांचा असाही तर्क आहे की, घारापुरीच्या समोरच असणार्या मुंबईतल्या माजगाव या बेटावर ही लेणी कोरणार्या कलावंतांची वसाहत असली पाहिजे. त्या वसाहतीचे तत्कालीन नाव शिववाडी असावे. पुढे काळाच्या ओघात शिववाडीचे शिवडी झाले.
इजिप्तमध्ये अत्यंत भव्य, उत्तुंग असे पिरॅमिड्स आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. एकूण इजिप्तभरात एकंदर 138 पिरॅमिड्स आहेत; पण गीझा या गावाजवळ असलेला ’चेऑप्स’ किंवा ’खूफू’ या फारोहा सम्राटाचा पिरॅमिड सर्वांत भव्य आहे. गेली किमान 200 वर्षे जगभरचे वैज्ञानिक पिरॅमिड्सचा विविध अंगांनी शोध घेत आहेत. इजिप्तच्या आसपास कुठेही उपलब्ध नसणारे हे प्रचंड काळे दगड त्यांनी कुठून आणले असावेत? कप्पी म्हणजे पुलीचा शोध लागलेला नसताना, त्यांनी ते एवढ्या उंचीवर चढवून अतिशय अचूक रीतीने ते कसे रचले असावेत आणि हे अचाट काम स्थानिक लोकांचे नसून, फारोह राजांनी बाहेरून माणसे आणून ते करवून घेतले असावे, इत्यादी नाना प्रकारचे सिद्धांत आणि निष्कर्ष काढणारे अक्षरशः हजारो ग्रंथ आतापर्यंत लिहून झालेले आहेत.
आता पुरातत्त्व शास्त्रज्ञांना एक गावच सापडले आहे. अजून तिथे उत्खनन चालू आहे. पण, आतापर्यंत सापडलेल्या पुराव्यावरून असा निष्कर्ष निघतो आहे की, पिरॅमिड्स उभारणार्या गवड्यांची ही वसाहत असली पाहिजे. हे गवंडी चांगले कुशल कारागीर असले पाहिजेत आणि हो, त्यांच्यामध्ये महिलाही असाव्यात. नुसत्या मजूर नव्हे प्रत्यक्ष रचना करणार्यासुद्धा हे सर्व लोक बाहेरचे आणि गुलाम नसून, स्थानिकच असले पाहिजेत. किमान साडेसहा हजार वर्षांपूर्वीच्या त्या वसाहतीत रुग्णालय आहे, बेकरी आहे, खाटकाचे दुकान आहे आणि दारू गाळण्याची भट्टीही आहे. चित्रलिपीमध्ये काही लेख सापडलेत. एकावर ‘पिरॅमिडच्या बांधकामाचा निरीक्षक’ दुसर्यात ’कारागिरांचा मुकादम’, तर तिसर्यात ’खूफूचा मित्र’ असे शब्द आहेत. गोर्या लोकांनी कथित आधुनिक अभियांत्रिकी, स्थापत्य यांचा शोध लावण्यापूर्वी जगभरचे लोक गुहांमधून उघडे बाघडे राहत होते का? तुम्हीच ठरवा!