सायमन लिफस्चुट्झ यांच्या प्रयत्नांमुळे ‘मोसैक पेंटिंग’ आणि ‘सिरॅमिक टाईल पेंटिंग’ भारतामध्ये प्रस्थापित झाले. परंतु, बद्री नारायण यांच्या कामामुळे या चित्रप्रकाराने एक वेगळीच उंची गाठली. या चित्रप्रकारातील अनेक कलाकृती आता मुंबईकरांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहेत. या चित्रशैलीचा आणि त्यामागच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.
एखादी कलाकृती जेव्हा जन्माला येते, तेव्हा तिच्या उगमाला तिच्या भोवतालाचे अनेक संदर्भ जोडलेले असतात. त्या त्या काळाचे संदर्भ आपल्याला ज्याप्रकारे त्या कलाकृतींमध्ये बघायला मिळतात, अगदी त्याचप्रकारे त्या कलाकृतींच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा असतो, तो त्या काळाचा. वेळेच्या एका विशिष्ट टप्प्यावर, काही माणसे एकत्र येतात, त्यांच्या संकल्पनेतून नवनिर्मितीचा विचार त्या त्या परिसरामध्ये पेरला जातो आणि आपसूकच कलेची एक समृद्ध चळवळ जन्माला येते. आज आपण जेव्हा मुंबईच्या काला घोडा कला महोत्सवाकडे बघतो, तेव्हा आपल्याला याच गोष्टीची प्रचिती येते. आज या कला महोत्सवाभोवती एक वेगळंच वलय निर्माण झालेलं आहे. परंतु, या सगळ्याआधी अनेक दशकांपूर्वी, चित्रकलेच्या प्रांतामध्ये एक वेगळा विचार करण्याचं काम एका दुसर्या महायुद्धातील निर्वासिताने केलं होतं. ही व्यक्ती मुंबईमध्ये आसरा शोधायला आली, व्यावसायिकदृष्ट्या ती यशस्वीसुद्धा झाली. परंतु, एवढ्यावरच न थांबता, कलेच्या माध्यमातून त्याने आपला भोवताल समृद्ध करायचा निर्णय घेतला. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे सायमन लिफस्चुट्झ.
या माणसाने मुंबई प्रांतात ‘मोसैक’ हा चित्रप्रकार केवळ रुजवलाच नाही, तर या चित्रप्रकारासाठी काम करणार्या कलाकारांना आपल्या हक्काची जागासुद्धा मिळवून दिली. त्यांच्या या प्रवासातील महत्त्वाचा शिलेदार म्हणजे बद्री नारायण. जो चित्रप्रकार आणि कलाकृती यांनी मुंबईत रुजविण्याचे काम केले, त्याचेच दर्शन आता कलारसिकांना घेता येणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे दि. 14 जून ते 31 ऑगस्ट, ‘जहांगीर निकोलसन आर्ट फाऊंडेशन’च्या माध्यमातून ‘अ ग्लेझड हिस्ट्री : बद्री नारायण अॅण्ड द विट्रम स्टुडिओ’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10.15 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले असून, या प्रदर्शनाचे तिकीट मूल्य 200 रुपये (प्रौढांसाठी) व 40 रुपये (5-15 वर्षे बालकांसाठी) आहे.
1950च्या दशकात सायमन यांनी काचेचा कारखाना मुंबईमध्ये सुरू केला. व्यवसायाबरोबरच त्यांनी ‘विट्रम स्टुडिओ’ची स्थापना केली. सिरॅमिकच्या टाईलवर चित्र रेखाटण्याचा एक वेगळा कलाप्रकार या स्टुडिओच्या माध्यमातून रुजवला गेला. हा कलाप्रकार हाताळणारे अनेक चित्रकार कालौघात वाढत गेले. कागदावरसुद्धा जितक्या बारकाईने चित्रकला होत नसेल, इतक्या काटेकोरपणे चित्रांची चौकट या सिरॅमिकच्या टाईलवर रेखाटली जात असेल. पुढे 1960च्या दशकांनंतर ‘विट्रम स्टुडिओ’मध्ये एका सभागृहाचीसुद्धा भर पडली, ज्याच्या माध्यमातून चित्रकारांना आपली चित्रकला जगासमोर आणण्यासाठी अवकाश प्राप्त झाला. हळूहळू लोकांना हा कलाप्रकार, चित्रकारांचं काम आवडायला लागलं, चांगली किंमत देऊन लोक त्यांचं काम विकत घेऊ लागली.
याच कलाकारांच्या मांदियाळीतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे बद्री नारायण. दोन दशकांहून अधिक काळ बद्री नारायण यांनी मुख्य चित्रकार म्हणून ‘विट्रम स्टुडिओ’ची धुरा सांभाळली. बद्री नारायण यांच्या चित्रांचे स्वतःची भाषा होती. चित्रकलेपासून ते लघुपटनापर्यंत अनेक वेगवेगळी माध्यमं त्यांनी हाताळली. बद्री नारायण यांनी आधुनिक भारतीय कला आणि भारतीय संस्कृती यांच्या अनोख्या संगमातून एक वेगळा विचार आपल्या चित्रांमधून पुढे आणला. चित्रांमधील प्रतीके, त्या चित्राचं एक अनोखं भावविश्व आपल्यासमोर मांडत असतात. बद्री नारायण यांचे चित्र म्हणजे, अध्यात्म आणि कलाकृती यांचा एक अनोखा मिलाप आहे. हे आपल्याला त्यांचे चित्र बघता क्षणी लक्षात येते. उदाहरणार्थ, ‘द लास्ट सप्पर’ हे चित्र आपण बघूया. लिओनार्दो द विंची या प्रसिद्ध इटालियन चित्रकाराने 15व्या शतकात काढलेले एक चित्र. येशू ख्रिस्त व त्यांच्या 12 शिष्यांदरम्यान घडलेल्या अखेराच्या जेवणावळीचा प्रसंग यामध्ये रेखाटण्यात आला आहे. आता बद्री नारायण यांनी चितारलेलं ‘लास्ट सप्पर’मध्ये आपल्याला येशू ख्रिस्ताचं एक वेगळं रुप बघायला मिळतं. चित्रचौकटीची घनता लक्षात घेता, अत्यंत काटेकोरपणे मांडणी करण्यात आली आहे. करड्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा आणि मधोमध भगव्या रंगाच्या वस्त्रातील असलेली येशू ख्रिस्तांची प्रतिमा यातून बद्री यांची कल्पकता अधोरेखित होते. कलेचा विचार केला की, आपसुकच 65 कलांचा अधिपती अर्थात श्रीगणेशाची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर येते. बद्री नारायण यांना हा अधिपती कसा दिसतो, हे बघणं तितकंच रोचक आहे. मोसैक चित्रशैलीमध्ये गणेशाचे जे चित्र आपल्याला बघायला मिळते, त्यामध्ये एका प्रकारची स्थिरता आहे. गणपतीच्या चेहर्यावरील भाव हे गंभीर आहेत, पण त्याच्या डोळ्यांत मात्र आपल्याला करुणा बघायला मिळते.
बद्री नारायण मूळचे सिकंदराबादचे. परंतु, कामानिमित्त मुंबईत आले. मुंबईत असताना ते चेंबूर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या चित्रकलेतील अभिव्यक्तीमध्ये त्यांचा हा भोवताल आला नसता तरच नवल! त्यांच्या एका ‘मोसैक पेंटिंग’मध्ये आपल्याला मुंबईची चाळ बघायला मिळते. चाळीमध्ये माणसांची घरं दाटीवाटीने एकमेकांना चिकटलेली असतात. या घरांचासुद्धा स्वतःचा एक आकार असतो. तो आकार अत्यंत संवेदनशीलपणा बद्री नारायण यांनी टिपला आहे. या चित्रातील रंगसंगतीसुद्धा वाखणण्याजोगी आहे.
बद्री नारायण यांच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे, ते केवळ चित्रकला आणि ‘मोसैक पेंटिंग’ यांच्यापर्यंत मर्यादित राहिले नाही. बद्री नारायण यांनी विद्यार्थ्यांच्या पिढ्या तर घडवल्याच, पण त्याचबरोबर ते ओळखले जाऊ लागले ते एक कथाकार म्हणून! कथाकथनाबद्दल आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले की, “इलेक्ट्रॉनिक मीडियाचा मारा कितीही झाला, तरी कथाकथन करणार्या कलाकाराची जागा ही माध्यमं घेऊ शकत नाहीत.” ज्येष्ठ लेखक मुल्क राज आनंद यांनी लिहिलेल्या पुस्तकांसाठीही बद्री नारायण यांनी चित्रं रेखाटली. आपल्या कुंचल्यातून त्यांनी रामायण आणि महाभारतातील गोष्टीसुद्धा दृश्य रुपात आणल्या.
बद्री नारायण यांची ही सामर्थ्यशाली चित्रशैली डोळ्यात पुरेपूर भरुन घेण्यासाठी हे प्रदर्शन बघायलाच हवे. परंतु, ‘सिरॅमिक पेंटिंग’, ‘मोसैक पेंटिंग’ हा कलाप्रकार आपल्या नगरीमध्ये कसा विकसित होत गेला, याची मुळं नेमकी कशात आहेत, यासाठीही या चित्रप्रदर्शनाला कलारसिकांनी आवर्जून भेट द्यायला हवी.