64 घरांचे विश्व आणि युवा शिक्षकाची अनुभवयात्रा!

    19-Jul-2025
Total Views | 27
 
kaustubh-vaidya
 
 
“बुद्धिबळ हा केवळ एक खेळ नसून, जीवनशैली घडवणारा प्रवास आहे,” असं मत कौस्तुभ वैद्य व्यक्त करतात. बुद्धिबळ प्रशिक्षक आणि मानशास्त्रज्ञ अशा दोन्ही भूमिकांमधून बुद्धिबळाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन विकसित झाला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण देणारे कौस्तुभ वैद्य ‘मनाश्रय’च्या माध्यमातून मानसिक आरोग्यसेवासुद्धा प्रदान करतात. उद्या, दि. 20 जुलै रोजीच्या ‘जागतिक बुद्धिबळ दिना’निमित्ताने त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद...
 
तुमचा बुद्धिबळ शिकवण्याचा प्रवास कसा सुरू झाला व कधीपासून?
 
बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून माझा प्रवास 2014 सालापासून सुरू झाला. मी महाविद्यालयात असताना आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत माझ्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्वसुद्धा केलं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आमच्या परिसरात मी काही मुलांना बुद्धिबळ शिकवलं. सुटीच्या दिवसांत सहज म्हणून सुरू केलेल्या उपक्रमामुळे मी आनंदी होतो. तेव्हाच मला लक्षात आलं की, आपल्याकडे असलेलं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, ही प्रक्रिया किती समाधान देणारी असते. हळूहळू माझ्या शिकवणीची बातमी पसरली आणि पालकांनी मला संपर्क केला. ’कोविड’च्या काळात खर्‍या अर्थाने माझ्या या शिकवणीला दिशा मिळाली. ऑनलाईन कोचिंगच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांशी मी जोडलो गेलो. ऑनलाईन अध्यापनामुळे केवळ भारतच नव्हे, तर 25-30 इतर देशांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले. तेव्हापासून आजतागायत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही वयोगटातील 1 हजार, 500 हून अधिक विद्यार्थ्यांना शिकवले आहे.
 
बुद्धिबळ आपण कुठल्या वयोगटातल्या मुलांना शिकवता व तोच वयोगट आपण का निवडला?
 
मी स्वतःला कुठल्याही वयोगटापुरते मर्यादित ठेवलेले नाही. साधारण चार वर्षांपासूनच्या मुलांना मी शिकवतो. लहान मुलांमध्ये नैसर्गिक कुतूहल आणि मानसिक लवचिकता असते, ज्यामुळे त्यांना बुद्धिबळासारख्या संरचित खेळाची ओळख करून देण्याची ही एक उत्तम वेळ आहे. पण, त्यापलीकडे मी किशोरवयीन, प्रौढ, मध्यमवयीन शिकणारे आणि अगदी ज्येष्ठ नागरिकांनाही शिकवले आहे. स्मृतिभ्रंश असलेल्या व्यक्तींचे मन सक्रिय ठेवण्यासाठीसुद्धा बुद्धिबळ मदत करते, असं एक मानशास्त्रज्ञ म्हणून अनुभव आला आहे.
 
मुलांना बुद्धिबळाच्या शिकवणुकीला पाठवताना पालकांच्या नेमक्या काय अपेक्षा असतात? त्यांचा यामागे काय विचार असतो?
आजकालचे पालक मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जागरुक असतात. बुद्धिबळाकडे ते केवळ एक खेळ म्हणून ते न बघता, जीवनातील कौशल्य विकसित करण्याचे साधन म्हणून बघतात. एकाग्रता, संयम, धोरणात्मक विचार करणे तसेच भावनिक नियमन या गोष्टींच्या पूर्ततेसाठी बुद्धिबळाला महत्त्व दिले जातं. बरेच पालक बुद्धिबळ हा मुलांचा ’स्क्रीन टाईम’ कमी करण्याचा आणि मुलांना शिस्त लावण्याचा मार्ग म्हणून बघतात. बुद्धिबळ शैक्षणिक कामगिरी सुधारू शकते, विशेषतः गणित आणि तार्किक तर्कशास्त्रात, अशी जाणीव आता लोकांमध्ये वाढत आहे.
 
‘क्रिटिकल थिंकिंग’ किंवा आपण ज्याला ‘चिकित्सात्मक विचार’ म्हणतो, या गोष्टीला अलीकडच्या काळात महत्त्व प्राप्त झाले आहे; त्याचा आणि बुद्धिबळाचा नेमका काय संबंध आहे?
 
बुद्धिबळ या खेळाला ‘मनाचा व्यायाम’ असंसुद्धा म्हटलं गेलं आहे. बुद्धिबळ खेळताना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला विचार करावा लागतो. तुमची प्रत्येक चाल, अत्यंत विचारपूर्वक तुम्हाला खेळावी लागते. यामुळे अर्थातच मेंदूलासुद्धा चालना मिळते आणि ‘क्रिटिकल थिंकिंग’ची सवय आपल्याला लागते. आजच्या वेगवान जगामध्ये, बुद्धिबळ या खेळाची मागणी हीच असते की आपल्या मनाला शांत ठेवून स्थिर ठेवून निर्णय घेणे. एखादी कृती करण्यापूर्वी मन स्थिर ठेवून जाणीवपूर्वक विचार करण्याची सवय लागणे अत्यंत महत्त्वाचं आहे.
 
बुद्धिबळ शिकल्यानंतर मुलांमध्ये होणार्‍या बदलांविषयी काय सांगाल?
 
बुद्धिबळ प्रशिक्षक आणि मानसशास्त्रज्ञ या नात्याने मला विद्यार्थ्यांमध्ये घडलेलं आमूलाग्र परिवर्तन बघण्याची, अनुभवण्याची संधी मिळाली. बुद्धिबळ शिकण्यापूर्वी अनेक मुलांना लक्ष देण्याची क्षमता, आवेग किंवा संरचित विचारसरणीचा अभाव यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. काही महिन्यांच्या नियमित प्रशिक्षणानंतर, मला त्यांच्या संयमात, भावनिक नियमनात आणि भविष्यातील नियोजन करण्याच्या क्षमतेत सुधारणा दिसून येते. बुद्धिबळ निर्णय घेण्यासाठी एक सुरक्षित आणि संरचित वातावरण प्रदान करते. यामुळे मुलांना अधिक चिंतनशील होण्यास मदत होते. शिवाय बुद्धिबळातील लहान विजयांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वासावर मोठा परिणाम होऊ शकतो. मी एकेकाळी लाजाळू आणि संकोची असलेले विद्यार्थी वर्गात आणि बाहेरही आत्मविश्वासू, विश्लेषणात्मक विचारवंत बनताना पाहिले आहेत.
 
डी. गुकेश यांच्या खेळामुळे, बुद्धिबळाच्या भोवती प्रसिद्धीचे वलय निर्माण झालं; त्या अनुषंगाने बुद्धिबळ शिकणार्‍यांचा कल वाढला का?
 
इतक्या लहान वयात डोम्मराजू गुकेश यांना मिळालेलं यश कौतुकास्पद आहेच. या सर्वांत तरुण विश्वविजेत्यामुळे संपूर्ण भारतात बुद्धिबळात रस निर्माण झाला आहे. केवळ रंजनासाठीचा म्हणून खेळला जाणारा हा खेळ नसून याकडे करिअर म्हणूनसुद्घा आता मुलं बघू लागली आहेत. अनेक पालकांना असं वाटतं की, त्यांच्या पाल्याने गुकेशसारख्या प्रतिभावान खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवावे. गुकेशसारख्या खेळाडूंनी बुद्धिबळात आणलेल्या दृश्यमानतेमुळे त्याची लोकप्रियता आणि प्रतिष्ठा निश्चितच वाढली आहे.
 
एक शिक्षक म्हणून बुद्धिबळ शिकवताना समाधानाचा क्षण कुठला असतो?
 
माझ्यासाठी सर्वांत समाधानकारक क्षण तो असतो, जेव्हा मी विद्यार्थ्यांमध्ये खर्‍या अर्थाने विकास होताना बघतो. एक मानशास्त्रज्ञ म्हणून मुलांमध्ये होणारे सूक्ष्म बदल मला दिसतात. कालांतराने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, लवचिकता आणि भावनिक परिपक्वता विकसित होते. विद्यार्थ्याची धोरणात्मक विचार करण्याची शक्ती विकसित होते. यानंतर विद्यार्थी ज्यावेळेस हीच विचारसरणी आपल्या जीवनामध्ये अमलात आणतो, तेव्हा खर्‍या अर्थाने सकारात्मक बदल घडायाला सुरुवात होते. तो विद्यार्थी ताणतणावाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याच्या समस्यांवर अधिक शांतपणे विचार करतो व त्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक शिस्तप्रिय होतो. माझे विद्यार्थी स्पर्धा जिंकतात किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करतात, तेव्हादेखील ही एक समाधानकारक भावना असते. परंतु, यापेक्षासुद्धा समाधान त्याक्षणी वाटते, जेव्हा पालक सांगतात की, तुमच्या या प्रशिक्षणामुळे आमच्या पाल्यामध्ये आम्हाला बदल दिसून आला. अशा या क्षणांमुळेच मला लक्षात येतं की मी हे क्षेत्र का निवडलं आणि मुलांनीसुद्धा बुद्धिबळाकडे का वळलं पाहिजे.
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121