सुशील शिंदे यांच्या जीवनात एक काळ असा होता, जेव्हा शिक्षण, सुरक्षितता आणि भविष्याची दिशा या सगळ्या गोष्टी अंधारात हरवलेल्या होत्या. त्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हात मिळाला, तो ‘गुरुकुलम्’ या संस्थेचा आणि गिरीश प्रभुणे काकांचा! प्रभुणे काकांनी उभा केलेला ‘गुरुकुलम्’ प्रकल्प केवळ एक शाळा नाही, तर माणुसकीचं घर, संस्कारांची शाळा आणि आत्मविश्वास देणारं स्थान आहे. विशेषतः भटक्या-विमुक्त समाजातील आणि पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी ही चळवळ उभी केली.
‘गुरुकुलम्’मध्ये मुलांसाठी राहणं-खाणं, कपडे, आरोग्य अशा सर्व गरजांची सोय केली जाते. परंतु, सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे त्यांना घरासारखं, आपुलकीचं, सुरक्षिततेचं आणि प्रेमाचं वातावरण दिलं जातं. सुशील शिंदे आणि त्यांच्या भावंडांनी हे सगळं स्वतः अनुभवलं. लहान वयात आई-वडिलांपासून दूर असतानाही कधीच परकेपणाची त्यांना जाणीव झाली नाही. प्रभुणे काका प्रत्येक मुलाला आपल्या मुलासारखीच माया देतात, त्यांच्या गरजा समजून घेतात आणि त्यांना समजून घेतात. ‘गुरुकुलम्’ची शिकवणी ही केवळ पाठ्यपुस्तकापुरती नाही. येथे 22 उपयुक्त विषय शिकवले जातात, ज्यांत हस्तकला, शेती, स्वयंपाक, व्यवहारज्ञान, लघुउद्योग अशा गोष्टींचा समावेश आहे. या उपक्रमामुळे मुलं आत्मनिर्भर होतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि जगण्याचं खरंखुरं शिक्षण मिळतं. शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळवणं नव्हे, तर जीवन जगायला शिकवणं, ही गिरीश प्रभुणे काकांची शिकवण ‘गुरुकुलम्’मधून मुलांपर्यंत पोहोचते.
या सर्व गोष्टींमुळेच सुशील शिंदे यांच्याही आयुष्यात हा बदल घडला. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचं, या संभ्रमात असताना प्रभुणे काकांनी त्यांना ‘हॉटेल मॅनेजमेंट’ची दिशा दाखवली. फक्त सल्ला देऊन थांबले नाहीत, तर शिक्षणाची संपूर्ण जबाबदारीदेखील उचलली. महाविद्यालयाचे शुल्क, राहणं-जेवण, शैक्षणिक साहित्य-सर्व गरजांची पूर्तता केली. या आधारामुळे सुशीलने ‘हॉटेल मॅनेजमेंट’ पूर्ण केलं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळवली. आज तो आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणाने आणि कष्टपूर्वक आपलं काम करत आहे. त्याच्या यशाचं खरं श्रेय ‘गुरुकुलम्’च्या संस्कारांना आणि गिरीश प्रभुणे काकांच्या मार्गदर्शनाला आहे. सुशील शिंदे हे ‘गुरुकुलम्’च्या यशाची एक जिवंत साक्ष आहेत. त्यांच्या यशामागे त्यांच्या मेहनतीसोबतच ‘गुरुकुलम्’ने दिलेला आधार, संस्कार आणि माया आहे.
‘गुरुकुलम्’ म्हणजे शिक्षणाचं, संस्काराचं आणि स्वावलंबनाचं एक जिवंत उदाहरण. गिरीश प्रभुणे काकांच्या दूरदृष्टीतून आणि माणुसकीच्या ओढीने सुरू झालेली ही चळवळ भटक्या-विमुक्त समाजातील, विशेषतः पारधी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनमोल योगदान देते. सुशील शिंदे यांच्यासारखे विद्यार्थी आजही समाजात या अनुभवाची जाणीव ठेवून काम करत आहेत. शिक्षणाचं महत्त्व पोहोचवणं, इतरांना योग्य दिशा देणं आणि स्वावलंबनाचं बीज पेरणं हेच आता त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. सुशील शिंदे कृतज्ञतेने म्हणतात की, “मी जो काही आहे, तो ‘गुरुकुलम्’मुळे आणि गिरीश प्रभुणे काकांमुळेच” आणि हीच भावना पुढे नेण्याचं व्रत सुशील यांनी स्वीकारले आहे.
- सुशील शिंदे