भटके-विमुक्तांसाठी कार्य सुरु केल्यानंतर पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्यासोबत प्रारंभीपासून असलेले त्यांचे सहकारी म्हणजे महादेवराव गायकवाड. गिरीशजी आणि महादेवराव या दोघांचेही भटके-विमुक्तांच्या विकासात मोलाचे योगदान आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महादेवराव गायकवाड यांनी गिरीश प्रभुणे यांच्या सहवासातील काही संघर्षमय तर काही गमतीशीर आठवणींना पत्रातून दिलेला उजाळा...
परमस्नेही गिरीशजी,
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपले अंतःकरणपूर्वक अभिनंदन! यानिमित्ताने हे अभिनंदनपत्र लिहीत असताना मनात अनेक भावतरंगांनी कल्लोळ केला आहे. एक मात्र निश्चित की, ज्यांच्याबद्दल अत्यंत अभिमान वाटावा, असा एक समाजसमर्पित कार्यकर्ता, ज्याची समाजाने व शासनाने सन्मानाने दखल घेतली व गौरविलेही, ज्याच्या कार्याची विदेशस्थ सामाजिक विचारकांनीही नोंद घेतली, असा उत्तुंग क्षमतेचा एक मित्र माझ्यासारख्या कफल्लकाच्या संग्रही आहे, याचाच सुखानुभव मी सध्या घेतो आहे.
गिरीशजी, आपण 1990-91 साली संघ विचारातूनच भटके-विमुक्तांच्या संदर्भातील कार्यास प्रारंभ केला होता. तत्पूर्वी मी लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके, आसाराम जाधव गुरुजी, मोती-राठोड इत्यादी जुन्या मान्यवर अशा कार्यकर्त्यांसोबत भटके-विमुक्त संघटनेचे कार्य केले होतेच. कदाचित या पूर्वानुभवामुळे आपल्या नव्याने उभारलेल्या रचनेत, ज्येष्ठ संघकार्यकर्त्यांनी ‘प्रांत-निमंत्रक’पदाचे दायित्व माझ्यावर सोपविले असावे.
जुन्या मान्यवरांच्या संघटनेत भटक्या-विमुक्तांचे प्रश्न समजून घेणे व त्या विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी पोलीस खाते, शासकीय अधिकारी, प्रस्थापित समाज, नेतेमंडळी, शासकीय व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी (न्यायासाठी) तीव्र संघर्ष करणे व प्रसंगी मोर्चे काढणे, धरणे देणे, जाहीर सभेतून ‘भडक’ अशी वक्तव्ये करणे, उग्र आंदोलने उभारणे इत्यादी मार्क्सवादी ढंगाचे मार्ग अवलंबिणे, हेच काम प्रामुख्याने होत असे. यामुळे वर उल्लेखिलेले सर्व समाजघटक हे भटक्या व विमुक्तजनांचे ‘विरोधकच’ आहेत, ते सर्व जणू या चळवळीच्या ‘शत्रूस्थानीच’ आहेत, असाच संदेश सर्व समाजामध्ये जात होता. त्यामुळे भटक्या-विमुक्त समाजबांधवांच्या मूलभूत सुधारणांचा, त्यांच्या उत्कर्षाचा मार्ग अधिकच धूसर होत असे. मात्र दबलेल्या, पिडलेल्या या भटक्या-विमुक्त समाजात आत्मविश्वास जागविण्यासाठी व स्वत्वाच्या निर्मितीसाठी धक्के देऊन त्यांना जागे करणे जरी गरजेचे होते. तरीही या जागृतीबरोबरच त्या स्थितीतून आणखी पुढे जाण्याची गरज होतीच!
गिरीशजी, संघरचनेतून भटके-विमुक्त हे कार्य उभारताना सर्व समाजाला सोबत घेऊन व शक्यतो अविरोधेत काम व्हावे व अपवादात्मक स्थितीत संघर्ष घडला, तरी पुन्हा चर्चेतूनच असे प्रश्न सोडवावेत, ही भूमिका स्वीकारली गेली. भटक्या-विमुक्तांच्या अंधश्रद्धा, त्यांच्यातील व्यसने, त्यांचे आपापसामधील संघर्ष, या विषयांवरही चिंतन व प्रबोधन सुरू केले. एकीकडे, भटक्या-विमुक्त जनांचे प्रश्न हे राष्ट्रीय प्रश्न आहेत व ते सर्व समाजानेच सोडवायला हवेत, या विचारास प्रस्थापित जनसमूहाचाही पाठिंबा मिळायला लागला, तर दुसरीकडे, ‘आम्हाला या देशाचे नागरिक म्हणायला लाज वाटते,’ या प्रक्षोभक व विद्रोही विचारांना तिलांजली देऊन ‘आम्हीही हिंदूच आहोत, ही भारतमाता आमचीही आईच आहे,’ या भावनेपर्यंत हा वंचित, दुर्लक्षित व दुरावलेला असा भटका-विमुक्त समाज येऊन पोहोचला. गिरीशजी, या सुंदर अशा सामाजिक बदलाच्या वाटचालीला ‘भटक्या-विमुक्त परिषदे’च्या माध्यमातून तुम्ही आगळेवेगळे व समयोचित रूप दिले व पूर्वकाळात भटकलेल्या, भटक्या-विमुक्तांच्या या चळवळीला आपल्या परिश्रमातून राष्ट्रीय प्रवाहापुढे खेचण्याचा आपण केलेला आटापिटा खरंच विलोभनीय! काम वाढत गेले. तसेच प्रवासही वाढत गेले. मग ते प्रवास कधी पायी, तर कधी ‘एसटी’ महामंडळाच्या बसने, तर कधी एखाद्या दुचाकीने होत असत. गंमत म्हणून सांगतो, आजही माझ्या घराच्या एका कोपर्यात ‘भविवि’च्या कार्यासाठी आपणाला घेऊन फिरणारी माझी एम. 80 दुचाकी जीर्ण होऊन बसली आहे. आपली वाटत पाहत!
गिरीशजी, आपल्या सहजतेने घडणार्या वर्तनामधून कार्यकर्त्यासाठी आपण काही मानदंडही समोर ठेवलेत. थंडीचे दिवस होते ते. सांगवी (ता. तुळजापूर) येथे एका पारधी परिवाराला भेट देण्यासाठी आपण गेलो होतो. पाणथळ भागामुळे गारवा अधिक जाणवत होता. तिथे एक पारधी महिला (देवका शिंदे जी नंतर कार्यकर्ती म्हणून पुढे आली होती) शाल पांघरून उभी होती. माझी समस्या हेरून तिने आपली शाल मला दिली. मी ती पांघरलीही होती. थोड्या वेळाने ती परिवार भेट संपवून आम्ही आमच्या एम. 80 दुचाकीवर परत जायला निघालो. निघताना ती शाल परत देताना, जणू काही मी त्या महिलेचा सत्कार करतो आहे, अशा थाटात तिच्या अंगावर घातली. गिरीशजी, आपण ते पाहिले. तिथे तुम्ही काही बोलला नाहीत. पण, नंतर एका प्रसंगात कडक शब्दांतच फटकारलेत मला. ‘कुणा बाईच्या अंगावर शाल घालण्याइतके थिल्लर नसावे आपण!’ या सात्विक संतापापुढे मौन धारण करणेच पसंत केले आम्ही! तुमचा तो विशिष्ट उच्चारातला ‘थिल्लर’ हा शब्द, अनेक दिवस कानांत घुमत होता.
गिरीशजी, आतापर्यंत या पत्रात उलगडलेल्या काही घटनांवरून भटके-विमुक्त विभागाचे काम हे खूपच गंभीरपणे करायचे काम असावे, कार्यकर्त्याची यात घुसमट होत असावी, असा समज होण्याचीही शक्यता आहे. तुमच्या अनुभवाचे किस्से व तुमचे विनोद श्रवण करणे, ही एक पर्वणी! असे मोकळ्या वेळेत आम्हा कार्यकर्त्यांची मधाळ भाषेत केलेली समीक्षा टीका हीसुद्धा सुखावून जायची. निवांत क्षणी अधिकच्या स्नेहामुळे असेल कदाचित. तुमच्याकडून माझे संबोधन ‘महादेवराव’ असे न होता ‘मास्तर’ असे झालेले असे. ‘या मास्तराचे काही खरे नाही,’ असे अधूनमधून उद्गार कानी पडत. अगदी माझ्या अधिक खाण्या-पिण्याच्या सवयीवरूनही आपण केलेली टिप्पणी ही मनावर स्नेहाचे शिंपण करी!
ध्येयवादी कार्यकर्त्यासह काही एक कार्य करताना त्यांचा सहवासच आपुलकीचा, विनोदाचा असा विलक्षण अनुभव घेत असताना, या जगण्यात काय बहार येते, हे आम्ही अनुभवले आहे. गिरीशजी, ही आनंददायी लघु स्मरणशिल्पे अधूनमधून का असेना, अशाच सुखांची शिंपण अखेरपर्यंत करत राहणार आहेत, हे मात्र नक्की.
गिरीशजींच्या राहणीमानात वेशभूषेमध्ये कमालीचा साधेपणा होता. साधा रफ कापडाचा इस्त्री वगैरे न केलेला असा, त्याखाली ढिली पॅन्ट, पायात साधारण चप्पल इत्यादींमधून साधेपणाचेच दर्शन व्हायचे. रविंद्रनाथ टागोरांसारखी मुक्त वाढलेली दाढी व चेहर्यावरचे शांत व गंभीर भाव बघून समोरच्यावर त्या सात्विकतेचा सोज्वळतेचा प्रभाव पडतच असे. आपली भाषा ही शुद्ध पुणेरी शैलीतली उच्चारण शैली, तरीही ती बोजड न वाटणारी.
या व आणखी अशाच अनेक सुखावह कष्टपद व काही विनोदी ही घटना आता हळूहळू स्मृतिपटलावर येत आहेत; तरी आतापुरते तरी थांबायलाच हवे. ही अशी कष्टपद कामे करताना, ‘स्वतःची वैयक्तिक चिंता कधी वाटणार, मी चिंता करितो विश्वाची,’ या संत उक्तीनुसार स्वतःच्या मुला-लेकरांना व स्वतःच्या धर्मपत्नीलाही एका विशिष्ट अंतरावर ठेवून अगदी व्रतस्थपणे आपण हा विशाल संसार उभा केलात.
वहिनींची जेव्हा भेट होईल, तेव्हा त्यांनाही आमचा नमस्कार पोहोचवा. गुरुकुलातील सर्व कार्यकर्त्यांनाही नमस्कार व छोट्या सर्वांना शुभेच्छा देऊन अखेरीस हे अंगीकारलेले कार्य अधिक जोमाने करता यावे, यासाठी या पंच्याहत्तरीपारच्या निमित्ताने आपणास उदंड आयुष्य आणि बळ द्यावे, असे विश्वनियंत्याकडे मागणी करून मी थांबतो!
- महादेवराव गायकवाड