भारतीय समाजातील मूलभूत मूल्यांची पुनर्स्थापना, संस्कृतीचे संवर्धन आणि नव्या पिढीला जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यासाठी सांस्कृतिक पुनर्जागरणाचे एक व्यापक आंदोलन म्हणजे ‘पंच-परिवर्तन.’ पण, ही संकल्पना केवळ उपक्रम न राहता, सामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रेरणादायी चळवळ ठरावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्यावतीने, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, राज्यभरातील 1 हजार, 097 ‘औद्योगिक प्रशिक्षण संस्थां’मध्ये (आयटीआय) ‘पंच-परिवर्तन’ या संकल्पनेवर आधारित विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ‘पंच-परिवर्तन’ संकल्पनेचे चिंतन करणारा हा लेख...
विकसित भारत’च्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी ‘पंच-परिवर्तन’ हा एक महत्त्वाकांक्षी आणि व्यापक उपक्रम म्हणून पुढे येत आहे. या उपक्रमाचा उद्देश समाजातील मूलभूत मूल्यांची पुनर्स्थापना करणे, संस्कृतीचे संवर्धन करणे आणि नव्या पिढीला जबाबदार नागरिक म्हणून घडवणे हा आहे. हा उपक्रम केवळ काही कार्यक्रमांसाठी मर्यादित नसून, भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे एक व्यापक आंदोलनदेखील आहे. हीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्यावतीने, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राज्यभरातील 1 हजार, 097 ‘औद्योगिक प्रशिक्षण संस्थां’मध्ये (आयटीआय) ‘पंच-परिवर्तन’ या संकल्पनेवर आधारित विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे, युवकांमध्ये राष्ट्राभिमान, सामाजिक भान, पर्यावरणविषयक सजगता आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीची जाणीव निर्माण करणे होय.
‘पंच-परिवर्तन’ या संकल्पनेचे पाच आधारस्तंभ म्हणजे, नागरिक कर्तव्य व शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचार व संकल्पना, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण. हे सर्व स्तंभ एकमेकांना पूरक असून एकत्रितपणे ते समाजात सशक्त बदल घडवण्याचे सामर्थ्य बाळगतात. ‘पंच-परिवर्तन’ संकल्पनेचा मूळ गाभा पाच महत्त्वाच्या स्तंभांवर आधारित आहे. सामाजिक समरसता समाज एकसंघ करेल. कुटुंब प्रबोधन कौटुंबिक जागृतीचे कार्य करेल. पर्यावरण संरक्षणदेखील महत्त्वाचे आहे. स्वाधारित जीवनशैली आणि नागरिक कर्तव्यबोध आपल्याला कर्तव्यांची जाणीव करून देते. यातील प्रत्येक घटक हा स्वतंत्र असूनही परस्परपूरक आहे आणि यांचा एकत्रित परिणाम म्हणजे, राष्ट्रासाठी एक सशक्त सामाजिक अधिष्ठान तयार करणे हा आहे.
भारतीय लोकशाहीचा खरा गाभा फक्त अधिकारांमध्ये नाही, तर जबाबदार्यांच्या जाणीवेत आहे. मतदान करणे, कर भरणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, कायद्याचे पालन करणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे या गोष्टींमध्ये नागरिकांनी सक्रिय भूमिका निभावली पाहिजे. या माध्यमातून जबाबदार नागरिक घडतील आणि शासन यंत्रणेशी सुसंवाद साधला जाईल. त्याचप्रमाणे, भारतीय संस्कृतीत ‘कुटुंब’ ही एक मूलभूत संस्था आहे. परंतु, बदलत्या जीवनशैली, वाढते ताणतणाव आणि पाश्चात्त्यीकरणाच्या प्रभावामुळे कुटुंबातील संबंध कमकुवत होत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून भारतीय मूल्ये, पारंपरिक संस्कार, आदर्श जीवनशैली यांचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस आहे. पालकत्वाचे भान, वृद्धांचा सन्मान, मुलांमध्ये संस्काराचे बीज आणि कुटुंबातील संवाद वाढवणे हे या प्रबोधनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
‘स्वदेशी’ अभियान केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता जीवनशैलीचा एक भाग व्हावे. स्थानिक संसाधनांचा वापर, पारंपरिक कौशल्यांचे पुनरुज्जीवन, लघु उद्योगांना प्रोत्साहन आणि आत्मनिर्भरतेचा आग्रह यामार्फत भारतीय अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक ओळख यांना बळकटी दिली जाते. ही संकल्पना ‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘मेक इन इंडिया’ यांसारख्या केंद्र सरकारच्या धोरणांशी सुसंगत आहे.‘सामाजिक समरसता’ हा ‘पंच-परिवर्तना’तील अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात जाती, धर्म, भाषा, लिंग आणि वंश यांवर आधारित भेदभाव काही ठिकाणी जाणवतो. परंतु, समाजात बंधुता, स्नेह, समजूतदारपणा आणि सहकार्य यांची भावना रुजवून समरसतेच्या आधारे एक संमि, पण सुसंस्कृत राष्ट्र निर्माण करता येऊ शकते. ‘सामाजिक समरसता’ केवळ ऐक्याची भावना निर्माण करत नाही, तर ती देशाच्या सामाजिक आरोग्याचे व सांस्कृतिक प्रगतीचे मूलभूत अधिष्ठान आहे. पर्यावरणाचा होणारा र्हास, हवामान बदल, पाण्याचे दुर्भीक्ष आणि प्रदूषण यांमुळे संपूर्ण मानव जातीसमोर एक गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. ‘पंच-परिवर्तन’ योजनेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण, जलसंवर्धन, कचरामुक्त मोहीम, प्लास्टिकमुक्त जीवनशैली यांसारख्या विविध जनजागृती उपक्रमांचा समावेश आहे. यामध्ये स्थानिक सहभाग, विद्यार्थ्यांचे योगदान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणविषयक जनजागृती केली जाते.
‘पंच-परिवर्तन’ संकल्पना प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी विविध स्तरांवर उपक्रम राबवले जात आहेत. त्यातील एक महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणजे, महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्यावतीने आयोजित केलेली व्याख्यानमाला आहे. राज्यातील 1 हजार, 097 ‘औद्योगिक प्रशिक्षण संस्थां’मध्ये (आयटीआय) ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण सजगता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. ‘पंच-परिवर्तन’ संकल्पनेवर आधारित पाचही विषयांवर एकाचवेळी व्याख्याने दिली जाणार आहेत. या संपूर्ण उपक्रमामध्ये एकात्मता, पारंपरिकतेचा सन्मान आणि आधुनिकतेचा विवेकी स्वीकार यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. ‘पंच-परिवर्तन’ ही संकल्पना फक्त वाजवी उपक्रम न राहता, सामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रेरणादायी चळवळ ठरणार आहे. भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दृष्टीने हा निश्चितच एक निर्णायक उपक्रम ठरणार आहे.
भारत आज एका नव्या जागृतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे सामाजिक समरसतेतून ऐक्य, कुटुंब प्रबोधनातून मूल्यसंस्कार, पर्यावरण संरक्षणातून जागरूकता, स्वाधारित जीवनशैलीतून आत्मनिर्भरता आणि नागरिक कर्तव्यबोधातून जबाबदारीची भावना हीच नवभारताची ओळख ठरणार आहे. युवक हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्यात राष्ट्रभक्ती, सजग नागरिकत्व आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना रुजवणे हेच या उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी प्रेरणा घेऊन, ‘पंच-परिवर्तना’ची ही वाटचाल, नवभारताच्या उभारणीसाठी एक तेजस्वी दीपस्तंभ ठरेल. या ‘पंच-परिवर्तनां’च्या प्रकाशात चालत एक सशक्त, संस्कारित आणि स्वाभिमानी भारतीय युवा पिढी घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प करूया!
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
मंगलप्रभात लोढा
(लेखक महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत.)