अंतर्मनाला गुंतवून ठेवणारी कथा : जारण

    06-Jun-2025   
Total Views |
अंतर्मनाला गुंतवून ठेवणारी कथा : जारण
‘जारण’ हा शब्द अनेकांसाठी तसा अपरिचित. पण, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, विशेषतः विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात हा शब्द एक वेगळी भीती, एक अंधश्रद्धेची सावली घेऊन येतो. लोकश्रद्धेनुसार ‘जारण’ हा एक अशा प्रकारचा शाप असतो, जो केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरही व्यक्तीला पोखरतो. या प्रकारच्या ‘जारण’ विधीमध्ये वेगळ्या वस्तूंचा, मंत्रांचा आणि विशिष्ट प्रकारच्या काळ्या ऊर्जा वापराचा समावेश असतो. ‘जारण’ या मराठी चित्रपटाने याच वास्तवावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे, फक्त भयपटाच्या चौकटीतून नव्हे, तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही.


चित्रपटाची सुरुवात अंगावर शहारे आणणार्या दृश्याने होते. एका बंद, अंधार्या खोलीत मंद प्रकाशात सुरू असलेलं ‘जारण.’ खोलीच्या मधोमध बसलेली एक अघोरी बाई गंगुटी. विस्कटलेले केस, कपाळावर मोठी लाल टिकली, डोळ्यांत एक विकृत चमक. तिच्या हातात एक विचित्र, अंगवळणी न पडणारी बाहुली... जणू ती जिवंत आहे की काय, असा भास होईल. ती बाई वेड्यासारखे मंत्र पुटपुटते आवाजात रौद्रता, हाडं हादरवणार्या सुरात ‘जारण’ करत असते आणि हे सगळं भयावह दृश्य एका कोपर्यातून पाहात असते, ती लहानगी राधा. डोळ्यांत असाहाय्यता, चेहर्यावर प्रश्नांची गर्दी... तिच्या बालमनावर कोरली जातात ती दृश्य, ते मंत्र आणि ती बाहुली. पुढे जेव्हा गावात समजतं की गंगुटी नावाची ती बाई काळी जादू करते, तेव्हा गावकरी संतप्त होतात. अंधश्रद्धा आणि भीती यांच्या संमिश्र भावनेने भरलेल्या त्या जमावाने गंगुटीला गावाबाहेर हाकलून देतात. पण, जाताना ती मागे एक वाय टाकते, "वाटोळं... वाटोळं होईल!” तिचा आवाज घुमतो, त्या क्षणापासून राधाच्या आयुष्याचं आकाश काळोखाने भरून जातं. ही आहे त्या चिमुरडीची खरी सुरुवात एका अशा प्रवासाची, जिथे प्रत्येक सावलीत काहीतरी लपलेलं वाटतं.

‘आऊट ऑफ द बॉस’ म्हणतात ते असंच काहीसं असतं. ‘जारण’ चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना पारंपरिक भयपटाच्या बाहेरचं एक वेगळं विश्व दाखवलं आणि याचं सर्व श्रेय जातं लेखक-दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते यांना. एका प्रसंगात राधा, तिची मुलगी सई आणि नवरा शेखर गाडीने जात असताना त्यांचा भयानक अपघात होतो. यात शेखरचा मृत्यू होतो आणि राधा कोलमडून जाते. तिच्या मनात सतत गंगुटीचा शाप घुमत राहतो. डॉ. कुलकर्णी यांच्याकडून मदत घेतली जाते, पण ती पुरेशी वाटत नाही. राधाच्या मनोवस्थेवर भूतकाळाची सावली गडद होत जाते आणि एक रात्री अचानक घराचं दार ठोठावलं जातं. ती दरवाज्याच्या भोकातून पाहाते आणि थक्क होते. समोर उभा असतो ’मृत’ शेखर! क्षणभर सगळं थांबलेलं भासतं. हा वास्तव आहे की मनाचा खेळ? प्रेक्षकही हादरतात आणि हेच आहे ‘जारण’चं खरं यश!

‘जारण’ चित्रपटात भयाचं जे दृश्यरूप उभं राहतं, त्यामागे छायाचित्रकार मिलिंद जोग यांचं कौशल्य मोलाचं ठरतं. त्यांनी प्रकाश आणि सावल्यांचा वापर इतया सूक्ष्मतेने केला आहे की, प्रत्येक फ्रेम अंगावर येते. ‘जंप स्केअर’ प्रसंगांमध्ये त्यांनी प्रकाशाचा जो खेळ साधला आहे, तो पारंपरिक भयपटांइतकाच प्रभावी वाटतो. कुठेही अचानक भुरकट दिसणारी सावली, तर कुठे केवळ एका हलया प्रकाशछटेने संपूर्ण वातावरण भयग्रस्त होतं. एक प्रसंग विशेष लक्षात राहतो, चित्रपटाच्या अखेरीस, गंगुटी राधावर पूर्णपणे हावी होते. त्या दृश्यात वापरलेला निळसर रात्रीचा टोन आणि त्यात मिसळलेला गडद लाल प्रकाश वातावरणात एक अस्वस्थ करणारी घनता निर्माण करतो. या रंगछटांमुळे अमृता सुभाषचा ताण, घुसमट आणि भीती अधिक जिवंत वाटते. तो क्षण केवळ अभिनयाने नव्हे, तर प्रकाशयोजनेनेही अंगावर शहारे आणतो.

‘जारण’ या चित्रपटाचं हृदय बनून समोर येते, ती राधाची भूमिका आणि ती साकारते अमृता सुभाष. तिचा अभिनय हे केवळ पात्र साकारणं नाही, तर ते पात्र तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग झाल्यासारखं वाटतं. जेव्हा राधा पुन्हा पुन्हा तिच्या भूतकाळाच्या आठवणीत हरवते, तेव्हा तिचा चेहरा एकदम कोसळल्यासारखा भासतो. राधा आपल्याचं जगात रममाण असते, पण ती ज्या जगात जगते, ते खरंच वास्तव आहे की गंगुटीने निर्माण केलेलं एक मायाजाल, हे प्रेक्षकांनाही गोंधळात टाकतं. हेच द्वंद्व अमृताने इतया प्रगल्भतेने मांडलेला. तिच्या शरीरभाषेपासून ते हलया हावभावांपर्यंत, राधा कशी बोलेल, कशी वागेल, तिचं अंतर्मन कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, याचा अभ्यास अमृताने अत्यंत सूक्ष्मपणे केला आहे. दुसरीकडे चित्रपटात गूढतेला आणि भीतीला वास्तवाचं स्वरूप देणारं एक जबरदस्त पात्र म्हणजे गंगुटी आणि ती साकारली आहे, अनिता दाते यांनी. अनिताचं काम इतकं नैसर्गिक आहे की, ती पडद्यावर दिसताच वातावरणात एक गारठा निर्माण होतो. तिची ती टक लावून पाहणारी नजर, बोलण्यातला मापातला पण तीव्र रोख आणि चेहर्यावर सतत असणारं एक गूढ शांत हे सगळं पाहताना असं वाटतं की, गंगुटी आपल्या नकळत श्वासांमध्ये भिनत आहे. या दोघींचा अभिनय म्हणजे ‘जारण’ या चित्रपटाच्या आत्म्याला मिळालेलं खर्या अर्थाने जिवंतपणाचं रूप.

‘जारण’ चित्रपट सुरू होतो, तेव्हा आपल्याला वाटतं आपण एका साध्या जादूटोणा, भूताखेताच्या भयपटात शिरतोय. पण, मध्यांतरानंतर विशेषतः शेवटच्या काही दृश्यांमध्ये कथानक पूर्णपणे वळण घेतं. आपल्याला जाणीव होते की, इथे भीती ही फक्त बाहेरून येणारी नसून, ती माणसाच्या मनाच्या खोल कप्प्यांतून उगम पावलेली आहे. डॉ. कुलकर्णी जे राधाला लहानपणापासून ओळखतात, त्यांच्याकडे तिच्या सगळ्या वेदनांची, भ्रमांची चावी असते. पण, जेव्हा प्रेक्षकांना समजतं की, राधा ज्या गोष्टी पाहते, अनुभवते, त्या वास्तव नाहीत, तेव्हा मनात एक स्फोट होतो. सगळं चित्रपट ‘जारण’च्या धाग्यांप्रमाणे विणलेलं असतं. राधाचं शेखरवर अचानक हल्ला करणं हे सर्व पाहून आपणही गोंधळून जातो. पण, जेव्हा डॉ. कुलकर्णी येतात, राधाला इंजेशन देतात आणि ती शांत होते, तेव्हा खरी उलगड सुरू होते. राधा मोठ्याने ओरडते, "सई....” राधाचं सईच्या नावानं ओरडण्यामागचं नेमकं कारण काय? सई खरंच होती की तीदेखील राधाची कल्पनाच होती? शेखरचं परत येणं हे सत्य आहे की, त्याचा अपघाती मृत्यू हेचं वास्तव? की ते ही राधाच्या मनाने रंगवलेलं एक स्वप्न होतं? आणि राहिला शेवटचा प्रश्न जो आता तुमच्याही मनात घोंघावतोय, गंगुटीचं काय? तेदेखील एक काल्पनिक पात्रं होतं की... या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘जारण’ पाहिल्याशिवाय मिळणार नाहीत.


लेखक, दिग्दर्शक : हृषिकेश गुप्ते.
कलाकार : अमृता सुभाष, अनिता दाते-केळकर, किशोर कदम, राजन भिसे, सीमा देशमुख,

अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.