मुंबई : मुंबईतील मनोरंजन उद्योगाचा सगळ्यात मोठा डोलारा सांभाळणार्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी खास ‘फ्रायडे मुव्हीज’ हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. चित्रपट व्यवसायातील विविध घटकांची ओळख व्हावी, तसेच जागतिक स्तरावरील दर्जेदार चित्रपटांकडे अभ्यासात्मक दृष्टीने पाहण्याची संधी मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा शुभारंभ गुरुवारी चित्रनगरीत ’लाइफ इज ब्युटीफूल’ हा १९९९ चा ऑस्कर पुरस्कारप्राप्त रॉबर्टो बेनिग्नी अभिनीत व दिग्दर्शित इटालियन चित्रपट दाखवून करण्यात आला. चित्रनगरीत मोठ्या प्रमाणावर चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण केले जाते. चित्रनगरीत कामकाज सांभाळणार्या अधिकारी आणि कर्मचारी वृंदाला जागतिक स्तरावरील उत्तमोत्तम चित्रपट पाहता यावेत आणि मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन हे माध्यम समजून घेण्याची संधी मिळावी, यासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ’फ्रायडे मुव्हीज’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चित्रपटाचा रसास्वाद कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले.