सामान्य निवडणुकांइतकेच महत्त्व अलीकडे पोटनिवडणुकांनाही प्राप्त झालेले दिसते. या पोटनिवडणुका म्हणजे, सत्ताधार्यांसाठी मतदारांचा आपल्यावरील विश्वास कायम आहे, हे सिद्ध करण्याची संधी, तर विरोधकांसाठी सत्ताधार्यांवर कुरघोडीचा हा राजकीय खेळ. असाच खेळ सध्या केरळ, पंजाब, गुजरात आणि प. बंगालमध्ये होणार्या पोटनिवडणुकांनिमित्ताने रंगलेला दिसतो. त्यानिमित्ताने...
केरळ, पंजाब, गुजरात आणि प. बंगालमध्ये होणार्या आगामी पोटनिवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्ष, ममता बनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. चार राज्यांमधील पाच विधानसभांच्या जागांसाठी पोटनिवडणुका घोषित झाल्या आहेत. या जागांसाठी दि. 19 जून 2025 रोजी मतदान होणार असून, दि. 23 जून 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. या पाचपैकी दोन जागा गुजरातमधील आणि केरळ, प. बंगाल आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक जागा आहेत. या पोटनिवडणुका लक्षात घेता, देशातील राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, याची कल्पना येईल. गुजरातमध्ये भाजपचे विरोधक तसे नगण्यच. त्यामुळे तेथील निवडणूक एकतर्फीच होण्याची चिन्हे आहेत, तर विधानसभांच्या निवडणुका केरळ आणि प. बंगालमध्ये पुढील वर्षी होणार आहेत. पंजाब आणि गुजरातमध्ये 2027 साली विधानसभा निवडणुका होत आहेत. केरळ राज्यात निलाम्बुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.
हा मतदारसंघ मल्लपुरम जिल्ह्यात आहे, तर तो वायनाड लोकसभा मतदारसंघात येतो. तीन लोकसभा निवडणुकांमध्ये या वायनाड लोकसभा मतदारसंघातून गांधी परिवारातील सदस्य विजयी झाला आहे. सध्या प्रियांका गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. मात्र, अपक्ष उमेदवार पी. व्ही. अन्वर यांनी निलाम्बुर विधानसभेची जागा डाव्या लोकशाही आघाडीच्या पाठिंब्यावर सलग दोन वेळा जिंकली आहे. पी. व्ही. अन्वर यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेस अन्वर यांना तिकीट देण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रवेशाने केरळच्या राजकारणात एका नव्या अध्यायास प्रारंभ होणार आहे. तृणमूल काँग्रेस या पोटनिवडणुकीत उतरणार असल्याने तेथील निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. डावी लोकशाही आघाडी, संयुक्त लोकशाही आघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीही निवडणूक रिंगणात असेल. राहुल गांधी यांना दोन्ही लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात प्रचंड मते मिळाली होती. त्यामुळे नव्या पक्षाचा झेंडा घेऊन ही निवडणूक लढविणे अन्वर यांना तितकेसे सोपे जाणार नाही.
पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आम आदमी पक्षाचे आमदार गुरप्रीतसिंह गोगी यांच्या निधनामुळे होत आहे. राज्यसभा सदस्य संजीव अरोरा यांना ‘आप’ने या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत संजीव अरोरा विजयी झाल्यास त्यांची राज्यसभेतील जी जागा रिक्त होईल ती ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल लढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या निवडणुकीत ‘आप’चा पराभव झाल्यास ‘आप’ला मोठा धक्का बसणार आहे.
गुजरातमध्ये विसावदार आणि कडी या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. गुजरातमध्ये काँग्रेस पुन्हा जम बसविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, त्या पक्षास अद्याप तसे करणे शक्य झाले नाही. तसेच, भाजपला प्रमुख विरोधक म्हणून आम आदमी पक्ष त्या राज्यात पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस पक्षाला 2014 आणि 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती. मात्र, 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकमात्र जागा मिळाली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने गुजरातमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार हे स्पष्टच आहे.
प. बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कालीगंज विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार नसिरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
तृणमूल काँग्रेस या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झालेला आहे. 2021 सालच्या विधानसभा निवडणुकीत कम्युनिस्ट आणि काँग्रेस पक्ष यांची आघाडी असूनही त्या आघाडीस आपले खातेही उघडता आले नव्हते. आधीच्या विधानसभेत काँग्रेसचे 44 आमदार होते. पण, 2021 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती! प. बंगालमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष कालीगंज मतदारसंघातील जागा जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. चार राज्यांमध्ये होत असलेल्या या पाच पोटनिवडणुकांच्या निकालाने राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याची कल्पना येईल!
ईदच्या नमाजास लष्कराने अनुमती नाकारली!
कोलकाता शहरातील ‘रेड रोड’ नावाने ओळखल्या जात असलेल्या रस्त्यावर ईद-उल-झुहा नमाज पढण्यास लष्कराने अनुमती नाकारली आहे. सदर भाग हा लष्करी कामासाठी वापरायचा असल्याने नमाजास अनुमती देण्यात येत नसल्याचे लष्कराने खिलाफत समिती आणि कोलकाता पोलिसांना कळविले आहे. ईदनिमित्त मुंबई, कोलकाता अशा मोठमोठ्या शहरात रस्त्यांवर नमाज पढला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते. पण, सार्वजनिक वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवर नमाज पढणे बंद झाल्याचे दिसून येत नाही. कोलकाता येथील फोर्ट विल्यममध्ये लष्कराच्या इस्टर्न कमांडचे मुख्यालय आहे. या मुख्यालयाच्या परिसरातील रस्त्यावर आतापर्यंत नमाज पढला जात होता. पण, यंदाच्या वर्षी त्यास ‘लष्करी कारण’ पुढे करून अनुमती नाकारण्यात आली आहे. कोलकाता येथील लष्करी मुख्यालयाने अनुमती नाकारणारे पत्र कोलकाता पोलीस आणि ‘कोलकाता खिलाफत समिती’ला पाठविले आहे. सदर परिसर हा लष्करी कारणांसाठी वापरायचा असल्याने येत्या दि. 7 जून किंवा दि. 8 जून 2025 या दिवशी त्या भागांत नमाज पढण्यास अनुमती देण्यात येत नसल्याचे लष्कराने कळविले आहे. ‘कोलकाता खिलाफत समिती’ने दि. 10 मे रोजी लष्कराकडे परवानगीसाठी पत्र पाठविले होते. नेताजींच्या पुतळ्यापासून फोर्ट विल्यमच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारापर्यंतच्या भागात नमाज पढण्यासाठी अनुमती मागितली होती. ‘कोलकाता खिलाफत समिती’चे सदस्य आणि राज्याचे मंत्री जावेद अहमद खान यांनी लष्कराकडून परवानगी नाकारणारे पत्र मिळाले असल्याचे स्पष्ट केले. कोलकाता येथील रेड रोडवर आयोजित ईदच्या नमाजात विविध राजकीय नेते सहभागी होत असतात. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी याही या नमाजात सहभागी होत आल्या आहेत. अनुमती नाकारण्यात आल्याचे लक्षात घेऊन ‘खिलाफत समिती’चे सदस्य काय निर्णय घेतात ते दिसून येईलच. पण, लष्कराने परवानगी नाकारली असताना त्या भागात नमाज पढण्याचा अट्टहास ‘खिलाफत समिती’ करणार नाही अशी अपेक्षा!
हवाई यात्रेचे स्वप्न साकार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील सतना आणि दतिया येथील विमानतळांचे दि. 31 मे रोजी उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी यांनी “हवाई चप्पल घालणार्या नागरिकांना हवाई प्रवास करणे शक्य झाले पाहिजे,” असे म्हटले होते. या विमानतळांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने आणि अहिल्यादेवी 300व्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून या विमानतळावरून झेपावलेल्या पहिल्या विमानातून प्रवास करण्याचे वनवासी महिलांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले! सतना जिल्ह्यातील सात वनवासी महिलांना सतना ते रेवापर्यंतचा विमान प्रवास करण्याची संधी मिळाली, तर दातिया विमानतळावरून सात वनवासी महिलांना खजुराहोपर्यंतचा विमान करण्याची संधी मिळाली. या निमित्ताने हवाई चप्पल घालणार्या सामान्य नागरिकांचे हवाई प्रवास करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले! सतना आणि दतिया येथून उड्डाण केलेल्या विमानाच्या वैमानिकही महिला होत्या. त्यानिमित्ताने महिला सक्षमीकरणाचा संदेश आपोआपच सर्वत्र प्रसारित झाला. विमान प्रवास करणार्या वनवासी महिलांना विमान प्रवासाची उत्सुकता होती. विमानात प्रवेश करण्याआधी त्या महिलांनी नमस्कार करून आत पाऊल टाकले. आपण विमानाने प्रवास करू असे आपणास कधीच वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया एका वनवासी महिलेने व्यक्त केली. आपल्या मुलाने एक दिवस आधी त्याची कल्पना दिली आणि प्रत्यक्ष प्रवास करण्याची संधी मिळाली, असे त्या महिलेने म्हटले आहे. यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकही विमानाने प्रवास करू शकतो याचे दर्शन देशवासीयांना झाले!