केवळ भाषांतर नाही तर भावानुवाद! - सुनेत्रा जोग

    16-Mar-2024   
Total Views |
Talk WIth Sunetra Jog


 
कोकणी भाषेसाठी सुनेत्रा जोग यांना त्यांच्या ’अस्ताव्यस्त बायलो’ या पुस्तकासाठी पुरस्कार प्राप्त झाला. ‘साहित्य अकादमी’चे २०२३ सालचे अनुवादासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यात गोव्यातील स्थानिक भाषेत लिहिलेले पुस्तक म्हणून त्यांची निवड झाले. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.


कोकणी भाषेतील ’अस्ताव्यस्त बायलो’ या पुस्तकाला अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक अभिनंदन. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काय भावना होत्या?

खरं तर हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मी याविषयी माझ्या मुलांना लगोलग कळवलं आणि फोनच बंद करून ठेवला. मला कुणाशी बोलायची इच्छाच नव्हती. अर्थात, पुरस्काराने अगदी उल्हासित वगैरे झाले नाही, तरी आनंद वाटलाच. परंतु, वरकरणी मी शांत होते. गेल्याच वर्षी माझे पती निवर्तले. यापूर्वी त्यांना दोन वेळा ’साहित्य अकादमी’चे पुरस्कार मिळाले आहेत. एक 2013 सालचा आणि नंतर 2017 सालचा. त्यावेळी मी त्यांच्यासोबत पुरस्कार स्वीकारायला गेले होते. कौतुकाने हसत, त्यांना मी म्हटलं, “एक दिवस मीही येईन, इथे हाच पुरस्कार स्वीकारायला.” आमचं ते संभाषण मला आठवलं आणि मी तो संपूर्ण दिवस माझा फोन बंद ठेवला होता. त्यानंतर मात्र अभिनंदनाचे फोन आले. खूप कौतुकही झाले आणि मलाही साहजिकच छान वाटले.
 

हे मूळ पुस्तक वाचताना असं काय सापडलं की, तुम्हाला ते कोकणी भाषेत अनुवादित करावेसे वाटले? पुस्तकाची थोडक्यात रूपरेषा काय होती?

यापूर्वी मी अनेक पुस्तकांचा कोकणी भाषेत अनुवाद केला आहे. त्या धर्तीवर ‘साहित्य अकादमी’नेच हे पुस्तक मला अनुवादासाठी दिले होते. यात एक ब्राह्मण कुटुंब आहे. कुटुंबात आई, लेक, तिची सून आणि मुलगी अशा चार वेगवेगळ्या पिढीतील; पण तरीही एकाच घरातील स्त्रिया. त्यांच्या कथा आणि व्यथा मांडायचा हा प्रयत्न आहे. एक काळ होता, जेव्हा स्त्री चूल आणि मूल इथंपर्यंतच मर्यादित होती. पुढे तिने उंबरठा ओलांडला. पण, तरीही तिला मर्यादा होत्या. आज ती स्वैर संचार करतेय; पण त्यातही स्त्रीची काही तरी कहाणी असतेच. ही तिची एकमेकींमध्ये गुंफलेली गोष्ट आणि त्यांचं हेचं नातं या पुस्तकातून उलगडलं आहे. म्हणूनच या पुस्तकाचं कोकणीतलं नाव ‘अस्ताव्यस्त बायलो.’


मूळ लिखाणाएवढाच अनुवादही महत्त्वाचा. तेव्हा अनुवाद करताना नेमकी काय आव्हानं समोर होती?

खरं तर मला अनुवाद करताना फारशा अडचणी येत नाहीत. बरेचदा संस्कृती भिन्न असली की, शब्दांना पर्यायी शब्द उपलब्ध होत नाहीत. पण, हे पुस्तक ज्या कुटुंबाची गोष्ट सांगते, ते इथेच कर्नाटकातील मंगळुरू जवळच्या एका गावातल्या संस्कृतीभोवती गुंफलेलं आहे. गोवा-कर्नाटक काही फार दूर नाही, तेव्हा अनुवाद करताना तशी अडचण आली नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, आपण केवळ भाषांतर करत नाही, तर भावानुवाद करतो. एखादी गोष्ट जशीच्या तशी न लिहिता, इथल्या लोकांना समजेल, अशा शब्दात लिहितो आणि तेच तर खरं आव्हान असतं!


लिखित पुस्तकांचे काय भवितव्य आहे, असे आजच्या तरूण पिढीकडे पाहताना तुम्हाला वाटतं?

कोकणी भाषेत फारशी पुस्तके अनुवादित झाली नव्हती. सुधा मूर्ती यांचं पहिलं पुस्तक मी कोकणीत अनुवादित केलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर इथल्या भागात ते वाचलं गेलं. आतादेखील मूर्तींबाबत काहीही बातमी वृत्तपत्रांतून किंवा मोबाईलवर पाहिली तरी या पुस्तकाचे वाचक ते सर्व येऊन मला सांगतात. मूर्ती माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रीण आहेत, असे त्यांना वाटते. हे सांगण्याचा मुद्दा एवढाच की, पुस्तकांना अजूनही मागणी आहे. आता तरूण पिढीकडे येते. तरूण पिढी फारशी वाचत नाही मान्य; पण असे जाहीर वक्तव्य आपल्याला करता येणार नाही. तसेच अनुवादाविषयी बोलायचं झालं तर, ज्या भाषेतलं आपल्याला दिसत नाही, समजत नाही; पण तरीही कुतूहल आहे, अशा भाषेतली गोष्ट जाणून घेण्यासाठी आपण आपल्या भाषाबांधवांना डोळे देत असतो. हे मला महत्त्वाचं वाटतं!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.