मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरीतील सावर्डे येथे बुधवारी कोंबडीच्या कुऱ्हाड्यात अडकलेल्या बिबट्याचे बचाव कार्य वन विभागाने पार पाडले. रत्नागिरी वनपरिक्षेत्रात बिबट्या बचावाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून मानवी वस्तीमधून बिबट्या बचावाच्या किमान तीन घटना आठवड्याला घडत आहेत.
बुधवारी सकाळी सावर्डेमधील मौजे पुर्ये येथील कृष्णा विठ्ठल पाडावे यांच्या घराशेजारी कोंबडीच्या कुऱ्हाड्यात बिबट्या अडकला होता. बंदिस्त खोलीमध्ये बिबट्या अडकला असल्याचे, पोलीस पाटील नयन दळवी यांनी वन विभागाला कळवले. त्यानुसार वनकर्मचाऱ्यांनी रेस्क्यू टीमसह घटना स्थळी दाखल होऊन पाहणी केली. पाहणीअंती छोट्या कुऱ्हाड्यात बिबट्या अडकल्याचे दिसून आले. बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यासाठीचे नियोजन करून पिंजरा लावण्यात आला. बंदिस्त कुऱ्हाड्याच्या खिडकीला पिंजरा लावून तो भाग बंद करण्यात आला. त्यानंतर पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूने खिडकीच्या पट्ट्या तोडण्यात आल्या. पट्ट्या तुटता क्षणीच बिबट्या खिडकीमधून पिंजऱ्यामध्ये येऊन बंदिस्त झाला. त्यानंतर जेरबंद बिबट्या देवरुख येथे आणून पशुवैद्यकांकडून त्याची तपासणी करण्यात आली. बिबट्या नर जातीचा अंदाजे पाच वर्षांचा असल्याचे समजले.
बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रेस्क्यू ऑपरेशनसाठी वनपाल संगमेश्वर तौफिक मुल्ला, वनरक्षक आकाश कडुकर ,अरुण माळी, सहयोग कराडे, विष्णू मांडवकर, सरपंच पुर्ये तर्फे सावर्डे, पोलीस पाटील नयन दळवी, प्रभाकर दळवी, सुभाष चव्हाण, संतोष दळवी आणि इतर ग्रामस्थांनी मदत केली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास वनविभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन रत्नागिरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांनी केले आहे.