महिला सहकारी संस्थांना विकासकामांचे वाटप करण्याबाबत विचाराधीन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    08-Jul-2025   
Total Views | 13

मुंबई : यापुढे १० लाख किमतीपर्यंतच्या विकासाच्या कामांचे महिला सहकारी संस्थांना वाटप करण्याचा शासनाचा विचार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ८ जुलै रोजी विधानसभेत सांगितले.

राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्णयानुसार १० लाख किमतीपर्यंतच्या विकासाच्या कामांचे वाटप मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि पात्र नोंदणीकृत नियमित कंत्राटदार यांना करण्यात येते. महिला सहकारी संस्थांची नोंदणी करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. यापुढे अशा कामांचे वाटप महिला सहकारी संस्थांना करण्याचा शासनाचा विचार असल्याचे ते म्हणाले.

सदस्य प्रकाश सोळंके यांनी माजलगावयेथील पाटबंधारे विभागातील कामांच्या वाटपाबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेदरम्यान सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत सहभाग घेतला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "विकासाची कामे वाटप करण्याबाबत अधिक पारदर्शकपणा आणण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती गठित करण्यात येईल. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार कामांच्या वाटपात सुसूत्रता, पारदर्शकता आणण्यात येईल."

१५ दिवसाच्या आत कामाच्या वाटपाचा अहवाल सादर होणार

यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, "माजलगाव पाटबंधारे विभागाकडे ६ मध्यम, ५३ लघु आणि ७ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असे एकूण ६६ प्रकल्प आहेत. या माध्यमातून ८७ हजार ९९३ सिंचन क्षेत्राच्या व्यवस्थापनाचे काम या विभागामार्फत सांभाळले जाते. या विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी १० लक्षपेक्षा कमी किमतीच्या अत्यावश्यक एकूण १४८ कामांची प्रापनसूची मंजूर करण्यात आली. कामांच्या वाटपाचा चौकशी अहवाल १५ दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना देण्यात येतील. अहवालानंतर उचित कार्यवाही करण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.



अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121