‘राज’धानीत महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र आमनेसामने...

    10-Mar-2024
Total Views | 81
Maharashtra Ranji Trophy


महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र आमनेसामने अशी वार्ता जर एखाद्याच्या कानी आली, तर त्याला नक्कीच गोंधळायला होईल. पण, ही वस्तुस्थिती असू शकते. काही खेळांत एकाच राज्यात एकाच क्रीडा प्रकाराच्या दोन वा दोनहून अधिक संघटना आढळतात. मग त्या गुण्यागोविंदात नांदत असतात की, एकमेकांवर कुरघोडी करत असतात, हा आता आपला विषय नाही. आता आपण जाणून घेणार आहोत खेळांचा राजा असलेल्या क्रिकेटच्या ‘रणजी करंडका’बाबत व त्याच्या या वेळच्या स्पर्धेतील अंतिम सामन्याबाबत.

रविवार, दि. १० मार्च २०२४ला चालू झालेला, पाच दिवसीय क्रिकेट महोत्सव आपल्याला क्रिकेटच्या परत त्या जुन्या ’राज’वैभवाचे स्मरण करून देत आहे. क्रिकेटची ’राज’धानी असलेली मुंबई. महाराष्ट्राच्या ’राज’धानीतील समुद्रकिनारी असलेल्या ऐतिहासिक क्रिकेटच्या राजेशाही क्रीडा संकुलातील वानखेडेवर एकाच राज्यातील मुंबई आणि विदर्भ असे दोन संघ आमनेसामने होत आहेत. फक्त क्रिकेटचा विचार करता महाराष्ट्रात महाराष्ट्र, मुंबई व विदर्भ अशा तीन क्रिकेट संघटना कार्यरत असलेल्या आपल्याला दिसतील. भारतीय क्रिकेटमध्ये महाराष्ट्र राज्यासारख्या गुजरात राज्यातही बडोदा आणि सौराष्ट्र अशा स्वायत्त संघटना आहेत.

मध्य प्रदेशावर विजय मिळवून, ’विदर्भ क्रिकेट संघटने’च्या सिव्हिल लाईन्स, नागपूर या घरच्या मैदानावर विदर्भाने तिसर्‍यांदा ’रणजी करंडक’ स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. हा विदर्भाचा संघ आता अंतिम सामन्यात मुंबईत मुंबईशी लढत देत आहे. मुंबई संघाने विक्रमी ४८व्यांदा ‘रणजी’च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. तब्बल ४१ वेळा ’रणजी करंडक’ जिंकण्याचा पराक्रम गाजवलेला, मुंबईचा संघ आता तामिळनाडूला हरवून, विदर्भाला हरवायला सज्ज आहे.

हा जो मुंबईचा संघ आहे, त्या मुंबईकडून खेळण्यासाठी, तीन जिल्ह्यांतले खेळाडू पात्र ठरतात. मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांत जन्मलेले खेळाडू मुंबईकडून खेळू शकतात. मुंबईचा विस्तार प्रचंड वाढलेला आहे. खारघरसारखे शहर मुंबईत गणले जात आहेत. तसे म्हटले तर खारघर रायगड जिल्ह्यात येते; पण व्यावहारिकदृष्टीने मुंबई जवळ पडत असल्याने, त्या भागातल्या खेळाडूंना रायगड किंवा मुंबई असा खेळण्याचा पर्याय उपलब्ध होतो. याच ’मुंबई क्रिकेट संघटने’च्या खेळाडूंनी आपल्या हातावर काळ्या फिती बांधल्या होत्या. त्यांचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ ’रणजी करंडका’च्या साखळी सामन्यादरम्यान हातावर काळ्या फिती बांधल्या होत्या.

कोट्टारी कनकैया नायडू अर्थात सीके नायडू हे विदर्भातील एक क्रिकेटरत्न होते. तिकडचेच तत्कालीन ’भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’चे अध्यक्ष असलेले एन के पी साळवे, शशांक मनोहर यांच्या सारख्यांची नावे वैदर्भीय व भारतीय क्रिकेटजगतात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विदर्भातील अनेक क्रिकेटपटू ज्या प्रदेशातून भारताला मिळाले होते, त्या विदर्भातल्या ११ जिल्ह्यांचे क्रिकेटपटू विदर्म संघटनेच्या अधिपत्याखालच्या संघाकडून खेळू शकतात.

१९३२ मध्ये ’सेंट्रल इंडिया क्रिकेट असोसिएशन’ स्थापन झाले होते. त्यातून पुढे ’होळकर क्रिकेट असोसिएशन’ निर्माण झाले. होळकर संस्थानाचा क्रिकेटला मोठा पाठिंबा होता. स्वातंत्र्यानंतर संस्थाने भारतात विलीन झाली, त्यात ’होळकर असोसिएशन’ऐवजी ’मध्य भारत संघटना’ निर्माण झाली. विदर्भाचा भाग त्यात येत असे. पण, याच काळात मध्य प्रदेश असे स्वतंत्र राज्य निर्माण झाले. तेव्हाच विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाले. ’विदर्भ क्रिकेट संघटने’ची स्थापना १९३४ मध्ये नागपूर येथे झाली होती. १९४८ मध्ये ‘सेंट्रल प्रोव्हिन्सेस अ‍ॅण्ड बेरार क्रिकेट असोसिएशन’ हे नाव बदलून, त्याचे ’मध्य भारत क्रिकेट असोसिएशन’ असे करण्यात आले. नंतर १९५६ मध्ये मध्य प्रदेश राज्याची स्थापना झाल्यानंतर, १९५७ मध्ये ‘मध्य भारत क्रिकेट असोसिएशन’चे नाव बदलून, ‘विदर्भ क्रिकेट असोसिएशन’ असे करण्यात आले. ‘मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन’ अस्तित्वात आले. विदर्भ भागातील खेळाडूंसाठी ’विदर्भ क्रिकेट असोसिएशन’ची स्थापना झाली.

असा हा महाराष्ट्र राज्यातल्या क्रिकेट संघटनांचा जन्म झाला. मुंबई, विदर्भ वगळता उर्वरित जवळपास २२ जिल्ह्यांतील क्रिकेटपटू महाराष्ट्र संघाकडून क्रिकेटमध्ये उतरू शकतात. अशा तीन संघटनांचाही समावेश असलेल्या, ’रणजी करंडका’च्या स्पर्धेचा अंतिम सामना क्रिकेटच्या राजधानीत चालू आहे. आपले क्रिकेटच्या इतिहासात डोकावणे म्हणजे या खेळांचा राजा असलेल्या, क्रिकेटच्या या चालू असलेल्या, ’रणजी करंडक’च्या राजाला जाणून घेणे.

’द क्रिकेट चॅम्पियनशिप ऑफ इंडिया’ अशा नावाची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात यावी, असा एक प्रस्ताव १९३४ साली शिमला येथील ’भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’च्या अधिवेशनात तत्कालीन संस्थापक ए. एस. डीमेलो यांनी मांडून, त्याला संमती मिळवली होती. तथापि, त्यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे, पतियाळाचे महाराज भूपेंद्र सिंह यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व घेतले.
स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक राजेरजवाडे भारतात अनेक खेळांना राजाश्रय देत असत. क्रिकेटच्या जोडीनेच हॉकी खेळणारी, राजघराण्यातली मंडळीही होती. हॉकीत पहिले सुवर्णपदक मिळवणार्‍या, मेजर ध्यानचंद यांच्या संघाचा कर्णधार असलेला, जनजाती समाजाचा नेता असलेल्या जयपाल सिंग मुंडा एक धनिक होता.

तो क्रिकेटपटूही होता. त्याच्या बरोबर तसेच त्या आधीच्या काळापासून त्याकाळी खेळणारे, नवाब पतौडीसारखी राजघराण्यातील मंडळी क्रिकेट खेळत असत. ही सगळी राजघराण्यातील मंडळी इंग्लंडमध्ये ससेक्स, केंब्रिज विद्यापीठ, इंग्लंड अशा संघाकडून खेळत शिक्षण घेत असत. तसेच दि. १० सप्टेंबर १८७२ ते २ एप्रिल १९३३ या काळातला राजा तेव्हा रणजी या नावाने प्रसिद्ध होता. नवानगरचे (आताचे जामनगर) महाराज रणजित सिंह उर्फ रणजित सिंह विभाजी जडेजा उर्फ रणजी उर्फ स्मिथ अशा नावाने प्रसिद्ध असलेले, हे राजे क्रिकेटवीरही होते.

इंग्लंडचे शिक्षण संपवून, मायदेशी परतल्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्व करावे, अशी विनंती रणजित सिंहांना करण्यात आली होती. पण, त्यांनी नम्रपणे त्याला नकार दिला. आर्थिक आघाडीची जबाबदारी घेताना राजघराण्यातील पाठिंबा व क्रिकेटप्रेमी मंडळींनी या स्पर्धेला सर रणजित सिंह यांचे नाव द्यावे, अशी विनंती केली होती. नंतर ’क्रिकेट नियामक मंडळा’ने त्यांच्या योगदानाची दखल घेत, स्पर्धेला ‘रणजी’ हे नाव एकमताने दिले.

भारतीय क्रिकेट म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते, ती ’व्हाईट बॉल’ने क्रिकेट खेळून, मालामाल होणार्‍या क्रिकेटपटूंची भलीमोठी नामावली. इतर देशांच्या तुलनेत भारतीय खेळाडूंचे क्रिकेट खेळण्याचे प्रमाण अधिक आहे. पूर्वीच्या काळात म्हणजे सुनील गावसकर, बिशनसिंग बेदी अशांच्या काळात व त्याही आधीच्या काळात ’रेड बॉल’ला प्राधान्य असे. तो लाल चेंडू खेळणारा, सगळ्यांचा राजा होता, क्रीडाप्रेमींच्या गळ्यातला ताईत होता. अगदी कपिल देवपर्यंतचे क्रिकेटचे राजे वेगळे होते. वर्षभरात साधारणतः मायदेशात दोनेक मालिका असायच्या. सगळेच क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेट खेळायचे. भर पावसातदेखील क्रिकेट खेळण्यात खंड नको म्हणून मुंबईच्या ’कांगा लीग’चे सामने खेळवले जात असत. खेळाडू आणि प्रेक्षक असे दोघेही क्रिकेटचा मनमुराद आनंद उपभोगायचे.

नंतर-नंतरचे चित्र पालटू लागले. आता तर ‘आयपीएल’मुळे क्रिकेटचे सादरीकरण झटपट निकाल अशा सदरात मोडू लागले. या लेखाच्या निमित्ताने मला आठवण येते, ती रवींद्र जडेजाची. १९ वर्षांखालील पुरूष क्रिकेटचा ’विश्वचषक’ ऑस्ट्रेलियाने आपल्याकडून हिसकावून नेला, हे आपण बघितले. क्रिकेटपटू घडण्याचे हेच वय असते की, जे भारतीय क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यात चमक दाखवायचे वय असते. या आधीच्या युवकांमधल्या भारतीय क्रिकेट संघात मुंबईच्या रोहित शर्मासोबत ’आयपीएल’ खेळत प्रसिद्ध झालेला, जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असलेला, रवींद्र जडेजा हा सौराष्ट्रातील जामनगरचा. हेच ते गाव की, ज्या गावातही क्रिकेट परंपरा अचाट आहे. कारण, पारंपरिक क्रिकेट म्हटले म्हणजे आपल्याला आठवतात, त्या ’रणजी करंडक’ स्पर्धा आणि त्याचे जनक रणजित सिंह आणि जोडीने दुलिप सिंह. हे महान माजी क्रिकेटपटू याच जामनगरचे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसिद्ध कसोटी क्रिकेटपटू आणि फलंदाज असलेल्या के. एस. रणजित सिंह हे इंग्लंडच्या संघाकडून कसोटी क्रिकेट खेळत असत. त्यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ‘रणजी क्रिकेट करंडक’ स्पर्धा घेतल्या जातात. नोव्हेंबर १९३४ रोजी या स्पर्धेचा पहिला सामना मद्रास व म्हैसूर या संघांमध्ये चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. रणजित सिंह यांचे दि. २ एप्रिल १९३३ रोजी जामनगर येथे वयाच्या साठीत निधन झाले. तेव्हा सुमारे दोन वर्षांनंतर पतियाळाच्या महाराजा भूपिंदर सिंग यांनी क्रिकेटमधील योगदान लक्षात घेऊन, १९३५ मध्ये त्यांच्या नावाने ’रणजी करंडक’ स्पर्धा सुरू केल्या. रणजित सिंहचा पुतण्या दलिप सिंहही इंग्लंडकडून क्रिकेट खेळला. त्यांच्या नावाने नंतर भारतात ‘दलिप ट्रॉफी’ सुरू करण्यात आली.

सध्या रणजी करंडकाचा अंतिम सामना बहरत आहे. रणजी स्पर्धेत राऊंड-रॉबिन सामने चार दिवसांचे असतात; तर बाद फेरीचे (नॉक-आऊट) सामने पाच दिवस खेळवले जातात. ’रणजी करंडक’ नॉक-आउट सामन्यात कोणताही स्पष्ट निकाल न लागल्यास, पहिल्या डावानंतर आघाडी घेणार्‍या संघास विजेता म्हणून घोषित केले जाते. अशा ’रणजी’त ३८ संघ खेळतात. ’रणजी’ स्पर्धेच्या विजेत्या संघाची हंगामाअखेर शेष भारत संघाशी लढत होते. विजेत्या संघाला ’इराणी चषक’ प्रदान करण्यात येतो, तर आता आपण वाट बघत आहोत. महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र लढतीच्या निकालाची. मग त्यात मुंबई जिंकले काय किंवा विदर्भ! शेवटी शेष भारत संघातही काही महाराष्ट्रचे खेळाडू असतलीच की! मग तोदेखील महाराष्ट्राचा दबदबा असलेला सामना बघायला कोणाला बरे आवडणार नाही?

भारतात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ’रणजी ट्रॉफी’, ‘दुलिप ट्रॉफी’, ‘इराणी ट्रॉफी’ या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. तसेच ’विजय हजारे ट्रॉफी’, ’सय्यद मुश्ताक अली’, ’सी. के. नायडू ट्रॉफी’, ’विनू मंकड ट्रॉफी’, ’कूचबिहार ट्रॉफी’, ’विनू मांकड ट्रॉफी’, ’रोहिंग्टन बारिया’, ’विझी करंडक’ अशा एक ना अनेक क्रिकेटच्या स्पर्धा चालतच असतात. वयोगटांनुसार, शालेय, महाविद्यालयीन, राज्य स्तरीय, राष्ट्रीय स्तरांवर स्त्री आणि पुरुषांच्या स्वतंत्र स्पर्धात क्रिकेटपटू आपले कसब दाखवतच असतात. आजही भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या यशात या अशा देशांतर्गत क्रिकेटचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळल्यामुळे, नवोदित खेळाडूंना त्यांची कौशल्ये वाढवता येतात आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी स्वतःला तयार करता येते.

या स्पर्धेकडे नजर ठेवत, निवड समितीला देशभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करणे सोपे जाते. युवा खेळाडू विविध परिस्थितींचा सामना करण्यास पुरेशा प्रमाणात तयार आहेत का, याची खात्री करणेही निवड समितीला यामुळे शक्य होते. असा हा खेळांचा राजा असलेला राजा आता आणखीन कोणता क्रिकेटपटू क्रिकेटप्रेमीवर अधिराज्य गाजवणार आहे, ते आता आपल्याला लवकरच वेळोवेळी कळेलच. त्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमींना व क्रिकेटपटूंना शुभेच्छा!


श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121