लग्न जुळण्याआधीच ‘उबाठ’चे गुडघ्याला बाशिंग

- दोनदा फसलो, तिसऱ्यांदा फसणार नाही; ‘उबाठा’शी युतीबाबत मनसेची प्रतिक्रिया

    24-May-2025
Total Views | 47
लग्न जुळण्याआधीच ‘उबाठ’चे गुडघ्याला बाशिंग

मुंबई, मुंबई पालिका निवडणुकीत ‘मनसे’सोबत युती करण्यासाठी ‘उबाठा’ गट गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असताना, मनसेने मात्र त्यांना केराची टोपली दाखवली आहे. “याआधी दोनवेळा फसलो, आता तिसऱ्यांदा फसणार नाही”, अशी सूचक प्रतिक्रिया मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

२०१७ च्या पालिका निवडणुकीत अखंड शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या. त्यावेळी मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फोडून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी गद्दारी. शिवसेना अखंड असेपर्यंत उद्धव ठाकरेंकडे ९२ नगरसेवकांचे बळ होते. त्यापैकी ५४ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाय अनेकजण योग्य संधीची वाट पाहत आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेतील २५ वर्षांची मक्तेदारी मोडीत निघण्याच्या भीतीने उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना साद घालण्यास सुरुवात केली आहे.

“मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे”, असे विधान खा. संजय राऊत यांनी नुकतीच मांडली. त्यानंतर उबाठा आणि मनसे युतीबाबत ऊलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्याला आता मनसेने उत्तर दिले आहे. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले, “२०१४ ची विधानसभा निवडणूक आणि २०१७ महापालिका निवडणुकीदरम्यान युतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यावेळी फक्त चर्चा सुरू ठेवल्या आणि आमचा विश्वासघात केला. आम्ही दोनवेळा फसलो, आता तिसऱ्यांदा फसणार नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘उबाठा’सोबत कोणताही संवाद नाही – संदीप देशपांडे

“मुळात युती करायची असेल, तर चार पावले पुढे यावी लागतील. मी मनसेकडून अगदी स्पष्ट सांगतो की, उबाठासोबत आमचा अजून कोणत्याही प्रकारचा संवाद झालेला नाही. आम्ही युतीबाबत ऐकतो आहोत, ते फक्त संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेमधूनच. ज्यावेळी आम्हाला युती करायची होती, त्यावेळी आम्ही आधी माणूस पाठवला होता. आम्ही काहीच लपवत नाही. आमचे पडद्यामागून किंवा पडद्याच्या पुढून कोणतेही संबंध नाहीत”, अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केली.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121