धारावी सर्वेक्षण अचूक, पारदर्शक अन् कार्यक्षमपणे होणार

भारतातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये प्रथमच आधुनिक तंत्रज्ञान

    04-Dec-2024
Total Views |
Dharavi survey

मुंबई : भारतातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये पहिल्यांदाच ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’त झोपडपट्टीचे सर्वेक्षण व नोंदणी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराचा उद्देश हा प्रकल्पाची अंमलबजावणी अचूक, पारदर्शक आणि कार्यक्षमपणे होणे यासाठी आहे. साधारणतः झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांचे सर्वेक्षण हे टोटल स्टेशन सर्व्हे आणि दस्तऐवजांची पडताळणी यांसारख्या पद्धतींवर अवलंबून होते.

‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’त ड्रोन, लाईट डिटेक्शन अ‍ॅण्ड रेंजिंग (लिडार) तंत्रज्ञान आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करून माहिती डिजिटल पद्धतीने गोळा करण्यात येतो. नंतर या माहितीचे विश्लेषण केले जाते. यामुळे धारावीचे डिजिटल ट्विन प्रारूप तयार होत आहे. म्हणजेच, धारावीचे आभासी प्रतिरुप, जे माहितीचे सखोल विश्लेषण करण्यासाठी व निर्णय प्रक्रिया सुयोग्य करण्यासाठी उपयोगी पडणार आहे, अशी माहिती ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प’ आणि ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा’शी संबंधित अधिकार्‍याने दिली.

रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान

‘लिडार’ हे रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारलेले आहे. जे वेगाने भूस्थानिक डेटा गोळा करण्यासाठी ओळखले जाते. यात लेसर लाईटद्वारे अंतर मोजले जाते आणि भूभाग, इमारती आणि वस्तूंचे अचूक थ्रीडी प्रतिरुप तयार करण्यात येते. धारावीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये फिरण्यासाठी सध्या पोर्टेबल लिडार प्रणाली वापरली जात आहे. ड्रोनद्वारे आकाशातून दृश्ये टिपली जात आहेत. ज्यामुळे धारावीचे नकाशे तयार करणे आणि नियोजन करणे सोपे होते.

डेटा गोळा करण्यासाठी मोबाईल अ‍ॅप्स

घरोघरी जाऊन डेटा गोळा करण्यासाठी मोबाईल अ‍ॅप्सचा वापर केला जात आहे. या अ‍ॅप्समुळे माहितीची अचूकता वाढत असून त्रुटी राहणे किंवा डेटा गमावण्याची शक्यता कमी झाली आहे. डिजिटल ट्विन म्हणजे धारावीचे आभासी प्रतिरुप असून ते या प्रकल्पातील विविध टप्प्यांवर डेटा गोळा करून त्याच्या विश्लेषणाची प्रक्रिया सोपी करत आहे.

डिजिटल मॉडेल प्रभावी ठरणार

रहिवाशांची निवासी पात्रता ठरवताना आणि वाद मिटवण्यासाठी हे डिजिटल मॉडेल प्रभावी ठरणार आहे. मात्र, ही आधुनिक सर्वेक्षणाची प्रक्रिया आव्हानात्मक आहे. कारण, धारावीतील काही रहिवाशांना फसवणूक किंवा डेटा दुरुपयोगाची भीती वाटत असल्याने टीमकडून व्यापक माहिती, शिक्षण आणि संवाद कार्यक्रम सध्या राबवले जात आहेत. यामध्ये रहिवाशांसोबत बैठका घेणे, पत्रके वाटणे, कॉल सेंटरद्वारे माहिती देणे, रहिवाशांना सर्व्हे प्रक्रियेची सविस्तर माहिती देणे, याचा समावेश आहे. ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठीचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

फील्ड सुपरवायझरची मदत

फील्ड सुपरवायझर्स धारावीतील रहिवाशांना योग्य कागदपत्रे पोहोचवण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. सर्व कागदपत्रे सादर झाल्यानंतर, रहिवाशांना अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीसह एक पावती दिली जाते आणि पुढील टप्प्यांचीदेखील माहिती दिली जाते. ज्या रहिवाशांकडे त्यावेळी कागदपत्रे उपलब्ध नसतात, त्यांना ती जमा करण्यासाठीचे मार्गदर्शन केले जाते. ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प’ हा भारतातील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणारा धारावी हा पहिला पुनर्वसन प्रकल्प आहे. या पद्धतीमुळे प्रकल्प अधिक कार्यक्षम, अचूक आणि पारदर्शक होत असून भविष्यातील पुनर्वसन प्रकल्पांसाठी एक नवीन दिशा देण्याचे या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121