मुंबई : मुंबई लोकलच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान सोमवार, ९ जून रोजी सकाळी ८:४५ च्या आसपास ट्रेनचा भीषण अपघात झाला. यामध्ये चालत्या ट्रेनमधून बाहेर पडून चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन ट्रेनमधील प्रवाशांची टक्कर होऊन झाला आहे.
मध्य रेल्वेच्या प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, "मुंब्रा ते दिवा येथे विरुद्ध दिशेने पास होणाऱ्या दोन ट्रेनमधील ट्रेनच्या फूटबोर्डवर उभ्या असलेल्या प्रवासी एकमेकांना घासले गेल्याने हा अपघात झाला." रेल्वे पोलिसांनी या अपघाताबाबत बोलताना सांगितले की, "या अपघातात एकूण १० जण ट्रेनमधून पडले, त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, जखमी झालेल्या सहा प्रवाशांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून तो आयसीयूमध्ये आहे."
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी मृतांच्या संख्येवर भाष्य करण्याचे टाळले. परंतू, जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये तसेच ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातातील शेजारील दोन रेल्वे गाड्यांमधील अंदाजे अंतर किती होते? या प्रश्नावर नीला यांनी स्पष्ट केले की, "सामान्यतः दोन रेल्वे गाड्यांमधील अंतर हे १.५ मीटर ते २ मीटर एवढे असते. परंतू, वळणांवर थोडासा कल असल्याने हे अपघाताचे एक संभाव्य कारण देखील ठरू शकते," असे ते म्हणाले. या अपघाताने, पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बॅग ठरली काळ!
स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ ते ९.३० च्या आसपास कसारा ते सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी ट्रेनच्या फूटबोर्डवरुन लटकून प्रवास करत होते. दररोज या लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. यामुळे या लोकलमधील प्रवाशांना दररोज दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो. दरम्यान, कसारा-सीएसएमटी ट्रेनमधील एका प्रवाशाची बॅग ही खेचली गेली आणि तो प्रवासी खाली फेकला गेला. यादरम्यान आजूबाजूला लटकलेले प्रवासीही या अपघाताचा बळी ठरले.