भारतीय क्रीडापटूंची बकेट लिस्ट...

    07-Jan-2024
Total Views | 143
Article on Indian Sports Players Bucket Lists

आपण आपल्या वैयक्तिक जीवनात भिंतीवर जशी दिनदर्शिका अडकवतो, मासिक, वार्षिक प्लॅनर भरायला सुरुवात करत, त्यात दैनंदिन कार्यांची नोंद करुन ठेवतो, तद्वत क्रीडापटू, क्रीडा संघटनाही अशाच प्रकारे नियोजन आणि व्यवस्थापन करत असतात. त्यानिमित्ताने २०२४ या वर्षीची भारतीय क्रीडापटूंच्या ‘बकेट लिस्ट’वर टाकलेली एक नजर...
 
हिंदू पंचांगातील मार्गशीर्ष कृष्ण पक्षाच्या पंचमीच्या तिथीला अर्थात सोमवारच्या १ तारखेला ख्रिस्ताब्द २०२४चा प्रारंभ झाला. आपण सगळ्यांनी त्याचे स्वागतही केले. हे नवे वर्ष विविध संधींची नवी पहाट घेऊन आले आहे. जे गेल्यावर्षात घडू शकले नाही, ते या वर्षात कसे यशस्वी करायचे, हे ठरवण्यासाठी आपली ’बकेट लिस्ट’ अनेकांनी बनवली असेल, तर काही आठवून आठवून त्यात भर घालत असतील. अनेकांनी नवे संकल्प केले असतील, तर ते कसे कसे आचरणात आणायचे, याची मांडणी ते करत असतील, तर काहींची तयारीही झाली असेल. अशा या नववर्षाच्या स्वागताच्या धामधुमीतून सावरत सगळ्यांनी आपल्या दिनदर्शिकांनुसार नवीन वर्षातील कामांची रुपरेषा बघत, त्यांच्या कामांची आखणीदेखील तयार केली असेल, तर काहींची आता पक्की झालीच असेल आणि त्यानुसार एक एक कार्य अंमलात आणायला सुरुवातही होत असेल.

सार्वजनिक दिनदर्शिका...

एवढेच नव्हे, तर विमान कंपन्या, बँका, रेल्वे, राज्य सरकारे, राष्ट्रीय सरकारदेखील आपल्या दिनदर्शिका, प्लॅनर बनवत असतात. हे नवे वर्ष विविध संधींची नवी पहाट घेऊन आलेली आहे. संपूर्ण जग आज भारताकडे मोठ्या आशेच्या भावनेने पाहत आहे, भारताने जगाचे नेतृत्व केलेले जगाला पाहायचे आहे, तर अशा भारताला विविध क्षेत्रात आपण सारे कसे बघणार ते आता आपण येथे पाहू.

आपल्या राष्ट्राचे क्रीडा, युवक कल्याण आणि सूचना प्रसारणमंत्री अनुराग ठाकुर यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी भारत सरकारची अधिकृत दिनदर्शिका देखील जाहीर केली आहे. २०२४ महिन्याच्या संकल्पनेत प्रत्येक महिना गेल्या नऊ वर्षांत भारत सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेच्या माध्यमातून महिला, युवा, मध्यम वर्ग, शेतकरी आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या चेहर्‍यावर खुललेल्या आनंदाच्या स्मितहास्याचे दर्शन घडवत आहे.

यजमान भारत...

भारतीय क्रीडाप्रेमींच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर २०२४ हे वर्ष रोमांचक अनुभव देणारे असेल. हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, अ‍ॅथलेटिक्सपासून ते अगदी मोटरस्पोर्ट्सपर्यंत अनेक क्रीडाप्रकारांत भारत या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद भूषविणार आहे. २०२४ पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये सहभाग घेणार्‍यांना पात्रता स्पर्धेत आपले नशीब आजमायचे आहे.

महिला तिकिटाच्या रांगेत..

भारतीय हॉकीच्या दृष्टीने २०२४चा शुभारंभ शनिवार, दि. १३ जानेवारीला रांची येथे ऑलिंम्पिक पात्रता स्पर्धेने होत आहे. भारतीय महिला हॉकीपटूंनी या स्पर्धेत विजय संपादन केल्यास पॅरिसचे तिकीट मिळणार आहे. पुरुषांनी २०२३च्या चीन येथील हांगझोऊ या ठिकाणी झालेल्या आशियाई स्पर्धेतच पॅरिसचे तिकीट पटकवले आहेच. ऑलिंम्पिक कोटा यावेळेस आपल्याला नक्कीच मिळेल, अशा शुभेच्छा आपण देणार आहोत. आपण आपले सकारात्मक विचार मांडत हे वर्ष सुरू करत आहोत. त्या महिलांच्या अपेक्षित शुभवार्तेने चालू होत असलेल्या वर्षाच्या दुसर्‍या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत भुवनेश्वर आणि राउरकेलात (जागतिक हॉकी महासंघ आयोजित) ‘एफआयएच हॉकी प्रो लीग’मध्ये आपला पुरुष आणि महिलांचा संघ काही सामन्यात उतरणार आहे.

तिकिटावर कोण जाणार!

जून महिन्यापर्यंत भारताने कोणकोणत्या क्रीडा प्रकारात ऑलिंम्पिकमध्ये सहभाग घेण्याची परवानगी मिळवली आहे, ते पक्के झाले असेल. अशा क्रीडाप्रकारातल्या क्रीडापटूंचे, संघाचे खेळाडू ठरवण्यासाठी निवड चाचण्या त्यापाठोपाठ चालू होतील आणि अशांची यादी तयार करण्यात येईल.

क्रीडा प्लॅनर (माहवार)...

- कसोटी क्रिकेट सामन्यांचा ७ जानेवारीला दक्षिण आफ्रिका दौरा संपताच अफगाणिस्तानचा भारत दौरा दि. ११ ते १७ जानेवारीत तीन ‘टी-२०’ सामन्यांसाठी सुरू होत आहे.

ऑलिंम्पिक पात्रता स्पर्धा - हॉकी - रांची - १३ ते १९ जानेवारी.

इंडिया ओपन - बॅडमिंटन - दिल्ली - १६ ते २१ जानेवारी.

डब्ल्यू टी टी स्टार कंटेंडर - टेबल टेनिस - गोवा - २३ ते २८ जानेवारी.

इंग्लंडचा भारत दौरा - क्रिकेट - २५ जानेवारीत ते ११ मार्च.

महिलांच्या प्रो लीग स्पर्धा - हॉकी - भुवनेश्वर - ३ ते ९ फेब्रुवारी.

पुरुषांच्या प्रो लीग स्पर्धा - हॉकी - भुवनेश्वर - १० ते १६ फेब्रुवारी.

महिला प्रो लीग स्पर्धा - हॉकी - राउरकेला - १२ ते १८ फेब्रुवारी.

पुरुषांच्या प्रो लीग स्पर्धा - हॉकी - राउरकेला - १९ ते २५ फेब्रुवारी.

एसएएफएफ आयोजित कनिष्ठांच्या अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा - चेन्नई - १२ ते १४ एप्रिल.

२० वर्षांखालील बुद्धीबळपटूंसाठी जागतिक कनिष्ठ गट विजेतेपद स्पर्धा - दिल्ली - १ ते १४ जून.

इंडियन ग्रां प्री - मोटोक्रॉस स्पर्धा - ग्रेटर नोएडा - २० ते २२ सप्टेंबर.

बांगलादेशाचा भारत दौरा - क्रिकेट - सप्टेंबर.

एसएएफएफ आयोजित वरिष्ठ गटाच्या अ‍ॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धा - रांची - ४ ते १६ ऑक्टोबर.

न्यूझीलंडचा भारत दौरा - क्रिकेट - ऑक्टोबर.

सैय्यद मोदी इंडिया इंटरनेशनल - बॅडमिंटन - लखनौ - २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर.

इंडिया सुपर १००(१) - बॅडमिंटन - ३ ते ८ डिसेंबर.

इंडिया सुपर १००(२) - बॅडमिंटन - १० ते १५ डिसेंबर.

वेस्ट इंडीज महिला संघाचा भारत दौरा - क्रिकेट - डिसेंबर.

आपण वरती सर्वसमावेशक अशा प्लॅनरमध्ये काही मोजके क्रीडाप्रकार बघितल्यावर आता आपण अ‍ॅथलेटिक्ससाठीचे विशेष प्लॅनर पाहू की जे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने तयार केले आहे.

भारतीय अ‍ॅथलेटिक्स कॅलेंडर २०२४...

गया येथे दि. १५ जानेवारी राष्ट्रीय क्रॉस कंट्री विजेतेपद स्पर्धांनी त्यांचे वर्ष चालू होईल. मग या २०२४ मध्ये सगळ्यांची नजर आता असेल पॅरिस ऑलिंम्पिकवर. भारतीय धावपटूंचे या संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक जरी तयार असले तरी इतर क्रीडापटूंसारखेच अ‍ॅथलेटिक्सवाल्यांचेही पहिले सहा महिने गडबडीचे, धावपळीचे असतील. कारण, दि. २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान ऑलिंम्पिक स्पर्धा असतील. त्यात प्रवेश मिळवण्यासाठी होणार्‍या अनेक पर्यायांपैकी काही मोजकेचा पर्याय आता शिल्लक आहेत.

ऑलिंम्पिकच्या धावपळीबरोबरच या वर्षात वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धादेखील होत आहेत. या देशातच होणार्‍या अनेक स्पर्धांचा फायदा ऑलिंम्पिकची रंगीत तालीम, चाचणी परीक्षा अथवा आपण कुठवर आहोत, हे अजमावून पाहण्यासाठी अनेकांना होणार आहे. अनेकांना आपली राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रमवारी जाणून घेता येणार आहे.

दि. ७ ऑगस्ट रोजी भारतात ’राष्ट्रीय भाला दिवस’ साजरा होणार आहे. नीरज चोप्राने ऑलिंम्पिक स्पर्धेत भालाफेक क्रीडाप्रकारात भारताला सुवर्ण पदक दि. ७ ऑगस्ट रोजीच जिंकून दिले होते. त्याप्रीत्यर्थ विविध भालाफेक स्पर्धा तसेच महोत्सव साजरे होणार आहेत. खुद्द नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकरिता पुन्हा भाला हाती घेऊन उतरणार असल्याने तो मात्र त्या महोत्सवात नसेल.

सर्वोत्तम क्रिकेटवीर...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघ (आयसीसी) २०२३ या वर्षातील क्रिकेटच्या ‘टी-२०’, एकदिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारातील सर्वोत्तम खेळाडूंची निवड जाहीर करणार आहे. त्यासाठी भारतासहीत जगातल्या क्रिकेट खेळणार्‍या देशांकडून नामांकन मागवण्यात आली असून २०२४ मध्ये त्याची घोषणा करण्यात येईल.

वर्ष २०२४ कॅमेलिड’चे..

आखाती देशांत सर्वत्र आढळणारा उंट, तसेच भारतातील राजस्थान, गुजरात अशा प्रदेशात आढळणारा उंट आपल्याला परिचयाचा आहेच. पुणे, मुंबई, नाशिक अशा अनेक ठिकाणी उंटावर बसून फेरी मारायला आपल्याकडे सर्वांनाच आवडते. अशा आपल्या परिचयातील उंटाची एक प्रजात आहे ‘कॅमेलिड.’ संयुक्त राष्ट्र संघटनेने २०२४ हे वर्ष उंटांमधील कॅमेलिड या प्रजातीला समर्पित केले आहे. फुटबॉलच्या स्पर्धा २०२२ साली कतारमध्ये झाल्या होत्या. त्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धा अनुभवायला कतारमध्ये देशोदेशीच्या फुटबॉलप्रेमींनी प्रचंड संख्येने हजेरी लावली होती. त्या सगळ्या क्रीडाप्रेमींनी तेथील उंटांचा मनोसक्त अनुभव घेतलेला आपण पाहिला असेलच. ऑलिंम्पिक क्रीडाप्रकारात उंटांच्या शर्यतींचा समावेश नसला तरी ज्या ज्या ठिकाणी उंट असतात तेथे तेथे उंटांच्या शर्यती खेळवण्यात येतात आणि त्याला विलक्षण प्रतिसादही मिळत असतो. अनेकांनी ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट बघितला असेल, त्यात हत्तींच्या शर्यती दाखवल्या आहेत. आपल्याकडे ज्याप्रकारे अश्वशर्यतींचे, बैलांच्या शर्यतींचे, आयोजन होते, तसेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रमाणात उंटांच्या शर्यती आखातात प्रसिद्ध आहेत.

दीव बीच गेम्स...

केंद्रशासित प्रदेश दीव येथे भारतातील समुद्रकिनार्‍यावरील पहिल्या बहुविध क्रीडास्पर्धांचे आयोजन दि. ४ ते ११ जानेवारी या काळात आयोजित करण्यात आले आहे. त्यात समुद्रकिनार्‍यावर व्हॉलीबॉल, मल्लखांब, पेनचाक सिलाट, फुटबॉल, रस्सीखेच, कबड्डी, मुष्टियुद्ध, पोहणे असे वाळूतील व सागरातील क्रीडाप्रकारांचा समावेश असेल. दीव येथील घोघला या समुद्रकिनार्‍यावरच्या या स्पर्धांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ पद्धतीने संबोधित करुन केले, तर राष्ट्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते ते झाले. २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील क्रीडापटूंचा सहभाग असलेल्या त्या स्पर्धेचा ’पर्ल’ नामक डॉल्फीन हा शुभंकर आहे. डॉल्फीनवर आधारित मध्यवर्ती संकल्पना असलेल्या शुभंकरच्या या क्रीडास्पर्धेचा समारोप भारतीय नौदलाच्या खुकरी स्मारकावर होणार आहे.

नववर्षाच्या शुभेच्छा...

दोन वेळची बॅडमिंटन ऑलिंम्पिकपटू आणि आता आपल्या क्रीडाजीवनातील शेवटच्या म्हणजे सलग तिसरे ऑलिंम्पिक पॅरिस २०२४ मध्ये कामगिरीवर निघालेल्या पी. व्ही. सिंधू हीने नवीन २०२४ वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांसाठी व्यक्त केल्या आहेत. त्यासाठी जानेवारीच्या पहिल्या सकाळी आपल्या मनोगतात आपल्याला अमेरिकन लेखक सॅम्युएल लँगहॉर्न क्लेमेन्स अर्थात टोपणनावाने जगप्रसिद्ध असलेल्या मार्क ट्वेन यांचे सुविचार ती सांगत आहे. त्यात म्हटले आहे की - ‘फोकस मोअर ऑन युवर डिझायर दॅन ऑन युवर डाऊट, अ‍ॅण्ड द ड्रीम विल टेक केअर ऑफ इटसेल्फ.’

आपण स्वतःच्या आशाआकांक्षांवर लक्ष केंद्रीत करण्यावर भर द्यायचा प्रयत्न करा, द्विधा मनस्थितीत पडू नका, आपल्याकडे आपणच शंकेखोर नजरेने बघत स्वतःला कमी लेखू नका. मार्क ट्वेन म्हणतात तसे आपण करत गेलो की, आपली स्वप्नपूर्ती नकळत होऊनही जाते. किती समर्पक विचार आहेत तिचे! आपण सगळ्यांनी अडचणींवर मात करत नवीन आदर्श निर्माण करायचा असतो. आपण आपल्या कामगिरीचे मूल्यांकन केले की आपसुकच आपली स्वप्नपूर्ती होऊन जायला मदत मिळत जाते. अनपेक्षितपणे शारीरिक दुखापती, शिखर काबीज करताना अनेकदा अचानकपणे गडगडत धपकन खाली कोसळायला जेव्हा होते. तेव्हा, हिवाळ्यात एव्हरेस्टचे शिखर सर करणार्‍या गिर्यारोहकासारखेच जणू आपण वागले पाहिजे. यात अडचणींवर मात करायला थोडे कष्ट पडतील, थोडा धीर धरावा लागेल, पण शेवटी यश नक्की येईल.

पी व्ही सिंधूचे हे विचार क्रीडापटूंनीच नव्हे, तर सगळ्याच क्षेत्रातील एव्हरेस्टचे ध्येय धरणार्‍यांनी लक्षात ठेवले पाहिजे. असे केले तर हे २०२४चे वर्ष आपल्याला व आपल्या देशाला भरभराट आणि यश हमखास घेऊन येणारे ठरेल ही कामना आणि सिंधूसहित समस्त क्रीडापटूंना आपण सारे नववर्षाच्या शुभेच्छा येथे देऊ.

श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121