मुंबई : महाविकास आघाडी ही केवळ कागदावरच होती. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा खूप अपमान झाला, अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. मंगळवार, १५ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
अतुल भातखळकर म्हणाले की, "विरोधी पक्षातले दोन पक्ष एकत्र येतात, एकत्र लढतात किंवा नाही लढत, हे सगळे मुद्दे आमच्या दृष्टीने अजिबात महत्त्वाचे नाहीत. भारतीय जनता पक्ष आणि महायुती महाराष्ट्रात सक्षमपणे काम करते. मराठी माणसाचे, मराठीचे आणि महाराष्ट्रातील लोकांचे हित सक्षमपणे सांभाळत आहे. त्यामुळे कुणीही एकत्र आले, एकत्र निवडणूका लढवल्या अथवा न लढवल्या तरी विधानसभे सारखेच निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येणार आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ते आता काहीही बोलण्यासाठी प्रसिद्ध झाले आहेत. महाविकास आघाडीची बैठक होत नाही हे आता त्यांना जाहीरपणे सांगावे लागत आहे. त्या बैठकीत त्यांना मानसन्मान मिळत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी ही कागदावरच होती. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा खूप अपमान झाला. आता त्यांना महाविकास आघाडीतही कोणतेही स्थान राहिलेले नाही," अशी टीकाही अतुल भातखळकर यांनी केली.