मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता तथा टीव्ही मालिकेतील लोकप्रिय चेहरा धीरज कुमार यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. सोमवारी त्यांना अस्वथ वाटू लागल्याने अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. परंतू, उपचारादरम्यान प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.
काही काळापासून धीरज कुमार हे न्यूमोनियाने त्रस्त होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू कलाकार म्हणून धीरज कुमार यांची ओळख होती. सोमवार दि. १४ जुलै रोजी संध्याकाळी मंदिरात दर्शन घेऊन घरी परतल्यानंतर धीरज कुमार यांना अस्वथ वाटू लागले. दरम्यान, प्रकृती खूपच खालवल्याने त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. धीरज कुमार यांच्या निधनाची बातमी ऐकताच हिंदी चित्रपटसृष्टीसह छोट्या पडद्यावर शोककळा पसरली आहे.
ओम नमःशिवाय मालिकेतून मिळाली लोकप्रियता
धार्मिक ग्रंथावर आधारीत १९९७ साली दूरदर्शनवर चॅनलवर आलेल्या 'ओम नमः शिवाय' या पौराणिक टीव्ही मालिकेचा यशस्वी दिग्दर्शक म्हणून धीरज कुमार यांना अफाट लोकप्रियता मिळाली.
अशी होती बहरदार कारकीर्द...
धीरजकुमार यांनी १९७० ते १९८४ दरम्यान जवळपास २५ ते ३० हिंदी- पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले होते. १९७४ साली आलेल्या 'रोटी कपडा और मकान' या चित्रपटातील त्यांची सहाय्यक अभिनेत्याची भुमिका खुप गाजली होती. 'सरगम', 'बहुरूपिया', 'हीरापन्ना','रातों का राजा' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या बहरदार अभिनयाची छाप सोडली. याशिवाय त्याकाळातील हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार आणि झीनत अमान यांच्यासोबतही त्यांच्या सह-कलाकाराच्या भुमिकेला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता.