
‘संगीत सौभद्र’ या नाटकामधील ‘कोण तुजसम सांग या मज गुरुराया’ या नाट्यपदामध्ये, गुरू शिष्याची कशी तयारी करून घेतो आणि त्यावर पूर्ण कृपाही कशी करतो, याचे यथार्थ वर्णन आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीही शिष्य तयार झाला की गुरू पूर्ण कृपा करतात, असेच म्हटले. गुरू शिष्याच्या नात्याचा नुकत्याच संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आढावा...
'मास्टर वील पीअर व्हेन द डिस्सायपल इज रेडी’ (
Master will appear when the disciple is ready) आपण सर्वांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी व्यक्त केलेल हे सुविचार, यापूर्वीही कोठेतरी ऐकले असतील. पण अनेकांनी कधी त्याच्या अर्थाबद्दल सखोल विचार केला असेल का? नसेल तर आपण तो (व्यासपौर्णिमा) गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने करूया. गुरुवार, दि. १० जुलै रोजी अर्थात आषाढ पौर्णिमेस ठिकठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंच्या पूजनांचे कार्यक्रम झालेले आपण बघतिले. साधारणतः त्या गुरुपौर्णिमेच्या संपूर्ण सप्ताहातच ज्याच्या-त्याच्या सवडीनुसार गुरुपूजनाचे सोहळे चालतात. आद्य गुरूंना गुरुपौर्णिमेस केले जाणारे नमन हे विशेषच. तर काही गुरूंचे पूजन हे दैनंदिन स्वरूपातही रोज केले जाते. आपले आईवडील आणि पृथ्वी यांना रोज आपण नमस्कार करताना, त्यांच्यातील गुरुतत्त्वाचा आदरच व्यक्त करत असतो.
गुरू वंद्य महान भगवा एकचि जीवन प्राण|
अर्पण कोटी कोटी प्रणाम॥ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्या ध्वजाला प्रणाम करत, त्यालाच आपला गुरू मानत, त्याच्या पूजननाचा उत्सव केला जातो. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरू-शिष्यांच्या सोहळ्याचा दिवस! आपल्या संस्कृतीत गुरुला अनन्यसाधारण महत्त्व विविध तर्हेने दिले आहे. कोणी कोणापुढे ‘पीअर’ व्हायचे, हे त्यातील परिस्थितीवर अवलंबून असते. अशा जोडीत गुरू भगवंतासमान मानला जातो. म्हणूनच गुरुस्तवनाच्या अनेक श्लोकांची रचना झाल्याचे आपल्याला दिसते, जसे की,
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः|
गुरुरेकः परं ब्रह्म तस्मातगुरुमुपाश्रयेत॥
(गुरू ब्रह्मा सत्य जाण| तोचि रुद्र नारायण|
गुरुचि ब्रह्म कारण| म्हणोनि गुरू आश्रावा॥)कबीरा ते नर अंध हैं, गुरू को कहते और|
हरि रूठे गुरू ढौर हैं, गुरू रुठे नही ढौर॥गुरूंचे स्थान हे ईश्वराहूनही वरचे असल्याचे सांगताना संत कबीर त्यांच्या एका दोह्यात सांगतात की, गुरूंचा महिमा न कळणारे लोक अंध आहेत, मूर्ख आहेत. एकवेळ ईश्वराचा कोप झाला तर, गुरू आश्रय देतात. परंतु, गुरू कोपल्यास जगात कोणाचाही आश्रय मिळत नाही. तसेच, सद्गुरूसारखा दुसरा सखा नाही, याकडेही कबीर लक्ष वेधतात.
श्रीनृसिंहसरस्वती आख्यानातील शिष्य दीपकाच्या संवादाचा, श्रीगुरुचरित्रातील द्वितीय अध्यायात गुरूची महती विस्ताराने मांडली आहे. कली आणि ब्रह्म यांच्यातील संवादात कलीचे वैरी कोण आहेत; कली कोणाला त्रास देऊ शकत नाही, हे त्यात विशद केले आहे. शिष्याने एखादा गुरू मानणे आणि गुरूने स्वतःहून एखाद्याला आपले शिष्यत्व प्रदान करणे असे यांच्यातील नाते भिन्नभिन्न असले, तरी ही नाती महत्त्वपूर्ण असतात आणि हे गुरुचरित्रात आदराने दिसून येते.
एखाद्यावर गुरूची कृपा होणे किती महत्त्वपूर्ण असते ते पाहा.
गुरुकृपा होय ज्यासी| दैन्य दिसे कैचे त्यासी|
समस्त देव त्याचे वंशी| कळिकाळासी जिंके नर॥
गुरूः पिता गुरुर्माता| गुरुरेव परः शिवः|
शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन॥
(गुरू आपला मातापिता| गुरू शंकरु निश्चिता|
ईश्वरू होय जरि कोपता| गुरू रक्षील परियेसा॥
गुरू कोपेल एखाद्यासी| ईश्वर न राखे परियेसी|
ईश्वरू कोपेल ज्या नरासी| श्रीगुरू रक्षी निश्चये॥)हरौ प्रसन्नेऽपि च वैष्णवा जनाः संप्रार्थयन्ते गुरुअक्तिमव्ययाम्|
गुरौ प्रसन्ने जगदीश्वरः सदा जनार्दनस्तुष्यति सर्वसिद्धिदः॥
(ईश्वर जरी प्रसन्न होता| त्यासी गुरु होय ओळखविता|
गुरु आपण प्रसन्न होता| ईश्वर होय आधीन आपुल्या॥) अशी गुरुमहतीची बरीच उदाहरणे श्रीगुरुचरित्रात आपल्याला दिसतील.
ईश्वराचे ‘गु’प्त ‘रू’प जो दाखवून देतो तो गुरू. तो काही गिरीकंदरात जाऊन मिळत नसतो; तो शोधायला अनेक लोकं बाहेर पडतात; पण शेवटी निराश होऊन परत येतात. आहो तुम्ही नका जाऊ, तोच येणार आहे. त्याला यावसे वाटेल एवढे आपले मन मोठं ठेवा. आज आपण एखाद्याकडे काही शिकायला जातो. पण, गुरू हा नसतो जो आपले अंतरंग उजळवतो, तर गुरू तो असतो आणि त्याच्याकडे जाता येत नाही, त्याला आपल्याकडे यायला लागते. प्रत्येक झाडाला फुलण्याची क्षमता दिलेली असते पण, झाड कधी फुलते? बहुतांश झाडं वसंत ऋतूच फुलतात. म्हणजे माझ्यातच सगळ्या क्षमता असूनही, जोवर माझ्या आयुष्यात गुरूरूपी वसंत येत नाही, तोपर्यंत मी बहरत नाही. अमृतानुभवातील माऊलींचे हे विचार मनुष्याला चपखल बसतात. नाथांचे जे उपास्य दैवत दत्त महाराज, ज्यांना आपण आद्यगुरू,सद्गुरू म्हणतो, त्यांनी आपल्याला दाखवून दिले आहे की, आहो नाही हो मलाही २४ गुरू लागतात. व्योम तो पहिला गुरू, पवन तो दुसरा गुरू, पृथ्वी तो तिसरा गुरू असे ते दोन तीन नव्हे, तर २४ गुरू त्यांचे आहेत. हे दत्त महाराजांसारखे गुरू आपल्याला नम्रत्व देतात. ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त|’ असा जयघोष दत्तभक्त करीत असतात. त्याचा अर्थ एका ठिकाणी दिला आहे, अवधूत म्हणजे भक्त. भक्तांचे चिंतन करणारे, म्हणजे भक्तांचे हितचिंतक, ते श्री गुरुदेव दत्त.
जेव्हा भक्ताची, चेल्याची मनापासूनची इच्छा किंवा तयारी दिसते, तेव्हाच गुरू प्रकट होत त्याला स्वतःहून आपले शिष्यत्व प्रदान करतात, ‘मास्टर व्हिल पीअर व्हेन द डिस्सायपल इज रेडी.’ राधाकृष्णन म्हणालेत, त्या विचारांची प्रचिती आपण एका पौराणिक कथेतून, बिरसा यांच्या कहाणीतून, तर दुसरी स्वातंत्र्यपूर्व काळाच्या अखेरीस असलेल्या ध्यानचंद यांच्या कथेतून पाहू.
जनजाती समाज घडवणारे बिरसा मुंंडा, हे त्या समाजाचे आद्य गुरू. ज्यांना ‘धरती आबा’ (पृथ्वीचे पिता) म्हणून ओळखले जाते, त्यांनी त्यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण हे जयपाल नाग या आदिवासी व्यक्तीने चालविलेल्या आश्रमात घेतले. जयपाल नाग हे बिरसा मुंडांचे पहिले गुरू म्हणून आपण मानले, तरी बिरसा मुंडांना आपला शिष्य म्हणून आपणहून स्वीकारले ते आनंद पांडे यांनी. आनंद पांडे हे बिरसा यांच्या गावावरून येता-जाता त्यांना दिसत असत. घरच्या गायी-गुरांना रानात चारायला नेताना, बरोबरच्या सवंगड्यांचे ते करत असलेले नेतृत्व आनंद पांडे न्याहाळत. ते सगळ्यांना देशी खेळ शिकवत, कृष्णासारखा पावा वाजवत, सगळ्यांना मोहीत करत असत. कला, क्रीडा तसेच अध्यात्मात असलेली त्यांची रुची ते सवंगड्यांच्यातही रुजवीत. बिरसा यांच्यासारख्यांची समाजाला असलेली गरज लक्षात घेऊन, एक-एक दिवस करत त्यांना आपल्याकडचे सर्व ज्ञान देत, बिरसा यांनाही आनंद पांडे यांनी गुरुपद देऊ केले. असे आनंद पांडे यांच्याकडून धार्मिक आणि सामाजिक ज्ञानदेखील बिरसांनी घेतले. आनंद पांडे हे एक वैष्णव धर्मगुरू होते, त्यांनी बिरसांना ‘सत्य’ आणि ‘न्याया’च्या मार्गावर चालण्यास शिकवले. बिरसांनी त्यांच्या आनंद पांडे या गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाने, आदिवासींमध्ये जागृती केली आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला.
आता आपण बिरसा मुंडा यांच्यानंतरचा ध्यानचंद यांचा काळ पाहू. ध्यानचंद यांचे बंधू सैन्यदलात होते. सैन्यदलात अनेक खेळ खेळवले जात. त्यापैकी एका संघात ध्यानचंद यांचे बंधूही हॉकी खेळत. ध्यानचंद हे भावाकडील हॉकी स्टीकच्या प्रेमात पडले. दिवेलागणीला जेव्हा घरातील हॉकी स्टीक भिंतीच्या कोपर्यात ठेवलेली आढळली की, ती स्टीक आणि चेंडू घेऊन ध्यानचंद बाहेर पडत आणि घराजवळील मैदानात, येण्या-जाण्याच्या मार्गावर ‘ड्रिब्लिंग’चा प्रयत्न करीत. त्याच ठिकाणी सैन्यदलातलेच सुभेदार मेजर बाले तिवारी हे कामावरून येता-जाता त्या युवकाला न्याहाळत असत. रात्रीच्या चंद्रप्रकाशात स्टीकने खेळणार्या त्या युवकाला, हॉकीची विशेष ओढ असल्याचे सुभेदार मेजर बाले तिवारी यांना जाणवले. त्यांनी खेळातील विशेष गोष्टी या युवकास शिकवल्या. त्या युवकाकडे असलेल्या कसबाला अधिक पैलू पाडत, त्या हिर्यावर लक्ष देण्यास त्यांनी आपणहून प्रारंभ केला आणि बघता बघता ‘फर्स्ट ब्राह्मण रेजिमेंट’मध्ये कार्यरत असलेल्या बाले तिवारी नावाचा हिरा सैन्यदलाच्या संघात चमकत गेला. आज तो बाले तिवारींचा चेला क्रीडाविश्वात जगप्रसिद्ध झाल्याचे आपण बघत आहोत.
गुरू हा काही वैयक्तिक शारीरिक स्वरूपातच आनंद पांडे अथवा बाले तिवारी यांसारखाच असतो, असे नाही. विद्यार्थी, चेला, शिष्यांच्या शिक्षक, गुरू किंवा मेन्टॉर यांची अनेक रूपे आपण, बर्याच गोष्टींच्या माध्यमांतून बघू शकतो. जसे की व्हिडिओ, लिखित साहित्य, लिखित स्वानुभव,आव्हाने वगैरे.
जो आपल्यातल्या शक्तीची जाणीव करून देतो तो ‘गुरू.’ या अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला गुरूच शिकवत असतात. आपल्या जगण्याला वळणही गुरूच देतात. यशाच्या शिखरावरही आपल्याला तेच घेऊन जातात आणि जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्तीही सर्वांना गुरूच देतात.
असे हे गुरू-शिष्य नात्याची आठवण सगळेचजण व्यास किंवा गुरुपौर्णिमेस साजरी करतात. जोपर्यंत भारतीय संस्कृती आहे, तोपर्यंत ते साजरे होतच राहतील. हेच व्यासांचरणी आमचे चिरंतन नमन असेल.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४