हिंदी ‘गीतरामायण’ लवकरच रामभक्तांच्या भेटीला...

    13-Jan-2024   
Total Views |
hindi Geetharamayana

राम हा समस्त भारतीयांचा आदर्श. या रामाच्या भक्ती आणि प्रेमातून गदिमा आणि बाबूजी या द्वयीने ‘गीतरामायण’ साकारले. ते अजरामर झाले. हेच ‘गीतरामायण’ म्हणजे महाराष्ट्राचं वैभव. त्याचा छंद-वृत्तासहित हिंदीत अनुवाद करण्याचे कौशल्यपूर्ण काम गोव्याच्या दत्तप्रसाद जोग यांनी केले आहे. आगामी राममंदिर लोकार्पणाच्या औचित्याने त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

मुळात ‘गीतरामायण’ ही एक अतुलनीय कलाकृती. इतर भाषांनाही त्याची भुरळ पडावी, अशाच गीतरामायणातील रचना आणि संगीत. तेव्हा हिंदीसह अन्य भाषांमध्ये त्यांचा अनुवाद होणं, हे स्वाभाविकच. तेव्हा, हिंदीत गीतरामायणाचा अनुवाद करण्याची प्रेरणा नेमकी कशी मिळाली?


खरं तर अनुवादाबाबत असं काही ठरवलं वगैरे नव्हतं. एक उत्स्फूर्त गीत सादर केलं आणि इथेच हे बीज रोवलं गेलं. माझ्या घरात अगदी लहानपणापासून साहित्यमय वातावरण. ‘गीतरामायण’ बालपणीच ऐकलेलं; पण गदिमांच्या इतरही रचना तोंडपाठ होत्याच. गुजरातमध्ये असताना सर्व मित्र कोंडाळं करून कविता गात बसलो होतो. आपलं मराठी साहित्य इतकं समृद्ध आहे; परंतु हिंदी किंवा गुजरातीशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा आपल्या गीतरामायणातील एका गीताचा उत्स्फूर्त हिंदी अनुवाद करून कडवं सादर केलं. कधी न ऐकलेलं, हे त्या सर्वांनाच इतकं आवडलं की, हे गीत पूर्ण कर, म्हणून त्यांनी गळ घातली. तेव्हा ते तसेच उत्स्फूर्तपणे पूर्ण केले आणि मग ठरवले की, हा आपल्या मराठीचा समृद्ध वारसा, हे महाराष्ट्राचं वैभव हिंदीसाठी खुलं करावं. यासाठी मला एकूण १४ वर्षे लागली. २००३ पासून सुरू झालेला हा अनुवादाचा प्रवास २०१७ साली संपूर्ण झाला. एकूण एक ५६ गीतांचा मी अनुवाद केला. त्यानंतर पंचवटीत श्रीधर माडगुळकर यांच्याकडे सादर केली. त्यांनीच प्रोत्साहनदिले. ते म्हणाले, “तू भारत सरकारशी बोल. आमच्या बाजूने सर्व अधिकार आम्ही सुपुर्द करतो.” त्यांच्या खंबीर पाठबळामुळेच आज हिंदीत ’गीतरामायण’ उपलब्ध आहे.
 
गद्याचा अनुवाद करण्यापेक्षा पद्याचा अनुवाद तसा काहीसा अवघडच. तेव्हा या प्रक्रियेदरम्यान नेमक्या कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले?

असे होते खरे; परंतु फार अवघड गेले नाही. बराच वेळ गेला, हे मात्र खरे. कविता मी करत होतोच; पण वृत्तात लेखन तोवर केले नव्हते. ‘गीतरामायण’ म्हणजे वृत्तकाव्य. काना, मात्रा मोजून शब्द निवडावे लागत. ’किलबिल’ हा शब्द त्यांनी वापरलाय. त्यासाठी हिंदीत शब्द शोधायचा. पुन्हा ‘गीतरामायणा’त शब्द काही केवळ शब्द नव्हेत, ते भाव व्यक्त करणारे आहेत. बाबूजींचे उच्चारही अगदी भावस्पर्शी. तेव्हा आव्हाने होतीच!

अनुवाद कार्याव्यतिरिक्त संपूर्ण प्रकल्पात काय अडचणी होत्या?
 
कसं आहे की, आपला राम मराठमोळा आहे. राम जेव्हा नाशिकजवळ आला, तेव्हा जी गीते येतात, शूर्पणखेचे आणि सीताहरणाचे, तेव्हा तो आपल्या जवळ आला. आपण राममय झालो. गदिमांनी तो असाच लिहिला. मराठी संस्कृतीशी त्याला जोडून घेतले. आता तो आपल्याला हिंदीत पुन्हा त्यांना द्यायचा आहे. तेव्हा तो आपल्या मूळ संस्कृतीचा असावा, असे वाटले. अयोध्येचे भाविक मराठी श्रीराम का स्वीकारतील? तो त्यांना त्यांचा वाटायला हवा, किंबहुना तो सर्वांना सर्वांचाच वाटायला हवा. आपल्या संगीतात जो भजनी ठेका आहे, ज्यात आपण रममाण होतो, ती आपली संगीत संस्कृती आहे. वाद्ये आहेत. रामाला ‘हिंदी’ बनवण्यासाठी वेगळ्या वाद्यांच्या प्रयोजनाने संगीत दिले गेले. हे एक आव्हान नक्कीच होतं; पण अडचणी नाहीत.

हिंदी ‘गीतरामायण’ वाचायला किंवा ऐकायला कुठे मिळेल?

शासनाच्या नोंदणीकृत संकेतस्थळावर हिंदी ‘गीतरामायणा’ची अधिकृत प्रत उपलब्ध आहे. मराठी ‘गीतरामायणा’च्या खालोखाल किंवा पुस्तक विक्रेत्यांकडूनही तुम्ही खरेदी करू शकता. हिंदी ‘गीतरामायणा’ची ऑडिओ फाईल मात्र अजून तयार झालेली नाही. पुढच्या वर्षी ती उपलब्ध होईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. चिन्मय कोल्हटकर, किशोर भावे आणि संजय दांडेकर या गोव्याच्या तिन्ही कलाकारांनी संगीतासाठी साहाय्य केले. आजपर्यंत त्याची ध्वनिमुद्रित फीत उपलब्ध नसली, तरीही साधारण पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो आहोत. सध्या हे प्रयोग स्वान्तसुखाय सुरू आहेत. हिंदी ‘गीतरामायण’, गोव्याने भारताला दिलेली एक मौल्यवान भेट आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.