अभिनेते माधव वझे यांच्या आठवणींचा स्मृतीगंध!

    10-Jun-2025   
Total Views |




the scent of memories of actor madhav vaze




मुंबई :
आठवणींच्या पाऊलखुणा माणूस आयुष्यभर शिदोरी जपून ठेवावी तशा हृदयात जपून ठेवतो. १९५३ साली आलेला आचार्य अत्रे लिखित-दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपट आणि त्या चित्रपटातील 'श्याम' आजही आपल्या स्मरणरंजनात आहे. या चित्रपटात श्यामची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे नुकतेच निधन झाले. २७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या 'ऑल इज वेल' या मराठी चित्रपटात माधव वझे यांची खास भूमिका आहे. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. माधव वझे यांच्या पश्चात प्रदर्शित होणारा 'ऑल इज वेल' हा चित्रपट त्यांना श्रद्धांजली असणार आहे.

माधव वझे यांच्यासारख्या अनुभवी, कलासंपन्न कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळणे हा आम्हा सर्वांसाठी एक समृद्ध करणारा अनुभव होता. त्यांच्यासोबत चित्रीकरणादरम्यान व्यतीत केलेले क्षण आणि त्यांच्याकडून मिळालेले मोलाचे मार्गदर्शन कधीही विसरता न येण्याजोगे आहे असं सांगताना, 'ऑल इज वेल' चित्रपटाची टीम त्यांच्या आठवणीत भावुक झाली. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना, त्यांच्या स्मृतींना उजाळा देत एक खास फोटो चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर शेअर केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझर मध्येही ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांची झलक पहायला मिळतेय.

'ऑल इज वेल' चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत.संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे.नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर गीतकार मंदार चोळकर आहेत.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.