मुंबई : मराठी नाट्यसृष्टीच्या विकासासाठी आणि नाट्य निर्मात्यांच्या रास्त मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार आशिष शेलार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. "मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा"च्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी नाट्य निर्मात्यांच्या विविध मागण्या समजून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
"मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ" (स्थापना १९६९) ही मराठी व्यावसायिक नाट्य निर्मात्यांची नोंदणीकृत संस्था आहे. या संस्थेच्या मागण्यांवर चर्चा-निर्णयासाठी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ९मे रोजी "पु.ल.देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी" येथील समिती कक्षामध्ये विशेष बैठक बोलवली होती. या बैठकीला मराठी नाट्य व्यवसायिक निर्माता संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे व सहकार्यवाह श्रीकांत तटकरे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे, "पु.ल. देशपांडे कला अकादमी" संचालक मीनल जोगळेकर आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
१. गोडाऊनसाठी जागा: सर्व नाट्य निर्मात्यांच्या नाटकाचे नेपथ्य (सेट) व अन्य सामान एकाच जागी ठेवण्यासाठी गोडाऊनसाठी जागा मिळावी.
२. वाहतूक आणि पार्किंग: नाटकाच्या सामानाची व रंगकर्मीची वाहतूक करणाऱ्या बस व टेम्पोसाठी गोडाऊन जवळच पार्किंग जागा मिळावी.
३. नवीन नाटक निर्मितीसाठी अनुदान: नवीन नाटक निर्मितीसाठी मिळणाऱ्या अनुदानात भरघोस वाढ व नियमावलीत बदल व्हावा.
४. निवासासाठी सवलतीच्या दरात सदनिका: नाट्य निर्मात्यांना निवासासाठी सवलतीच्या दरात सिडकोच्या सदनिका उपलब्ध करून द्याव्यात.
मंत्री आशिष शेलार यांनी या मागण्या रास्त असल्याचे मान्य करून त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. "मराठी नाट्य व्यवसाय सशक्त राहावा, शासनाच्या मदतीची निर्मात्यांना गरज राहू नये, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे," असेही ते म्हणाले.
"ह्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आम्ही पाठपुरावा करू," असे सांगून "मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा"चे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे म्हणाले, "आमच्या मागण्यांकडे मंत्री महोदयांनी आपुलकीने पाहिले. आमच्या समस्या तपशिलासह समजून घेतल्या. त्या सोडवण्याच्या दृष्टीने शासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी लवकरच पुन्हा बैठक घेण्याचे सांगितले. ह्या गोष्टी नाट्य निर्मात्यांना आणखी चांगल्या नाट्यकृती रंगमंचावर आणण्यासाठी बळ देणाऱ्या आहेत."
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.