मराठी चित्रपटांकडे तशी आशय आणि विषयांची कमतरता नाही. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने खर्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०२३ या वर्षाची दणक्यात सुरुवात केली. ‘बॉक्स ऑफिस’वर इतर भाषिक चित्रपटांच्या सोबतीने भरघोस कमाई करीत मराठी चित्रपटांसाठी हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. पण, २०२३ या वर्षात विविध विषयांवर आधारित मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात काही नवे विषय आहेत, तर एका गाजलेल्या मराठी चित्रपटाचा चौथा भागदेखील प्रदर्शित होणार आहे. तेव्हा, मराठीतील असे हे खाद्यपदार्थांच्या नावाशी मेळ साधणार्या चित्रपटांविषयी...
मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर ’बॉईज’च्या सीरिजने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या चित्रपटाच्या यशस्वी तीन भागांनंतर ’बॉईज ४’ धमाका करायला येत आहेत. पुन्हा एकदा ढुंग्या, धैर्या आणि कबीर यांची धमाल मस्ती प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘बॉईज ४’ या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीतील हा एकमेव चित्रपट आहे, ज्याचे चार भाग आले आहेत. या चित्रपटात पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे प्रमुख भूमिकेत असणार आहेत.
झणझणीत ‘लंडन मिसळ’
विनोदाचे अचूक टायमिंग साधणं, हे मराठीतील फार कमी कलाकारांना खर्या अर्थाने जमतं, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्या कलाकारांच्या यादीत अभिनेते भरत जाधव यांचे नाव आघाडीवर. अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारणारे भरत जाधव ’लंडन मिसळ’ या चित्रपटातून बर्याच वर्षांनी मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहेत. ’लंडन मिसळ’ ही आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणार्या दोन सख्ख्या बहिणींची कथा. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो आणि त्यावेळी ज्या-ज्या परिस्थितीतून जावे लागते, त्याची कथा म्हणजे ’लंडन मिसळ.’ अभिनय, संगीत, नृत्य आणि खळखळून हसवणारे विनोद यांची जुगलबंदी ‘लंडन मिसळ’ या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. अनेक वर्षांनी पुन्हा चित्रपटात झळकणार्या भरत जाधव यांनी या चित्रपटात ‘रॅप’ गाणेदेखील गायले आहे. या चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले प्रमुख भूमिकेत आहेत.
प्रसाद ओक घेऊन येणार वडापाव
’गुलाबजाम’, ’मुरांबा’ अशी खाद्यपदार्थांची नावं असलेले अनेकविध चित्रपट मराठीत प्रदर्शित झाले. यात आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. ’चंद्रमुखी’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याने काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी ’वडापाव’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे कथानक जरी प्रेमकथेचे असले, तरी गोड-तिखट अशी प्रेमकथा, या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. ’वडापाव’ चित्रपटात स्वतः प्रसाद ओक, सविता प्रभुणे, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर अशी कलाकारांची फौज असणार आहे.
रसिका शिंदे-पॉल