पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मिळाला पाचशे जीबी डेटा!

    31-Jul-2023
Total Views | 78
500 GB Data Collected From Terrorists Arrested In Pune

पुणे
: पुण्यामध्ये पकडण्यात आलेले दहशतवादी ऑनलाइन व्हिडिओ पाहून प्रभावित झाल्याचे समोर आले आहे. यासोबतच धार्मिक कट्टरता आणि जिहाद पसरविणारी पुस्तके, मजकूर, ऑनलाईन कंटेंट उपलब्ध झाला. यासोबतच विविध मुस्लिम धर्मगुरूंची बयाने ऐकून ही मुले प्रभावित झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आतापर्यंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एकूण ५०० जीबीचा डाटा जप्त करण्यात आला आहे. त्या डाटामध्ये पुण्यातील छाबड हाऊससह काही संवेदनशील ठिकाणांची माहिती, छायाचित्रे, गुगल मॅप आणि स्क्रीन शॉट देखील आढळून आले आहे.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने रत्नागिरी येथून सीमाब नसरुद्दीन काझी (वय २७, सध्या रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी कातिल दस्तगिर पठाण ऊर्फ अब्दुल कादिर (वय ३२, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली होती. त्याने महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय २४) या दोन दहशतवाद्यांना पुण्यात राहण्यासाठी घर मिळवून देण्याची व्यवस्था केली होती. या दोघांना कोथरूड पोलिसांच्या गस्तीवरील पोलिसांनी वाहनचोरीच्या प्रयत्नात असताना या दोघाना मध्यरात्री पकडले होते.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाला आरोपींविरोधात ठोस आणि भक्कम पुरावे देखील मिळाले आहेत. या सर्व अह उल सुफाच्या मॉडेलमध्ये आणखीही काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरी येथून अटक करण्यात आलेल्या सीमाब काझी याने या दहशतवाद्यांना रोख तसेच ऑनलाइन स्वरूपामध्ये आर्थिक मदत केल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला पकडण्यात आलेले दोन दहशतवादी ग्राफिक डिझायनर असल्याची बतावणी करीत होते. मात्र, ते अशा प्रकारचे कुठलेही काम करीत नव्हते. तर केवळ 'कव्हर' घेण्यासाठी त्यांनीही बतावणी केलेली होती. पळून गेलेला त्यांचा तिसरा साथीदार हा अत्यंत 'हार्डकोर टेररिस्ट' असल्याचे सांगण्यात येते आहे.

दरम्यान, एनआयएने अटक केलेला भुलतज्ञ डॉ अदनान अली सरकार याचा महाराष्ट्र एटीएस करीत असलेल्या 'अह उल सुफा' या दहशतवादी संघटनेच्या तपासात कोणताही 'रोल' निष्पन्न झालेला नाही. भविष्यात त्या दृष्टीने तपास केला जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या तपासा दरम्यान सुरुवातीला पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून टेन्ट जप्त केले आहेत. या दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील विविध शहरामध्ये प्रवास केला असून त्यांची पाहणी केली आहे. ते हॉटेलमध्ये थांबत नव्हते. निर्मनुष्य ठिकाणी टेंटमध्ये ते राहत असत. यासोबतच त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे सर्किट, ड्रोन हे देखील जप्त करण्यात आलेले आहे. या ड्रोनद्वारे त्यांनी भरपूर ठिकाणांचे चित्रीकरण केले आहे. हे चित्रीकरण फॉरेन्सिक लॅब कडून रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121