माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शिवतीर्थावर येऊ नका! राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन; नेमकं कारण काय?
11-Jun-2025
Total Views | 27
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या आधीच मनसैनिकांना पत्र लिहीत शुभेच्छा देण्याकरिता शिवतीर्थावर येऊ नका असे आवाहन केले आहे. बुधवार, ११ जून रोजी त्यांनी मनसैनिकाना पत्र लिहिले असून माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणे शक्य नाही, असे म्हटले आहे.
राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले की, "येत्या १४ जून २०२५ ला म्हणजे अर्थात माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणं शक्य नाही, कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबईबाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की, मी वाढदिवस साजरा का करणार नाहीये ? काही विशेष कारण आहे का? इत्यादी.. पण मनापासून सांगतोय की, खरंतर असं कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका."
"गेली अनेक दशकं माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सभळेजण येता. तुमच्याशी त्यादिवशी बोलणं होत नाही पण तुमचे दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट ही ऊर्जा देणारी असते. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावलं असेल तर तुम्हा सर्वांचं अफाट प्रेम आणि या प्रेमाबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे आणि पुढेदेखील राहीन. या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही, यामुळे त्याची मला रुखरुख लागेलच. पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला त्यांचे दर्शन घ्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही," असे ते म्हणाले.
लोकोपयोगी कार्यक्रम राबवा!
"माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी कार्यक्रम राखवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असे मी मानेन. त्यामुळे या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकर भेटू. महाराष्ट्राची, मराठी माणसाची तसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या," असेही राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले.