डोंबिवली : राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेतील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ नुकताच संस्थेच्या डॉ .हेडगेवार सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका निलजा प्रमोद पाटील , संस्थाध्यक्ष संजय कुलकर्णी , कार्यवाह शिरीष फडके, सहकार्यवाह प्रमोद उंटवाले, कोषाध्यक्ष संजय दीक्षित हे उपस्थित होते.
निलजा पाटील यांनी संस्थेचा सर्व शाळांचा निकाल अतिशय सुंदर लागल्याबद्दल अभिनंदन केले. तर विद्यार्थ्यांचे अशाप्रकारे कौतुक करणाऱ्या संस्थेचे करावे तितके कौतुक थोडेच आहे . तुमचे कौतुक करणाऱ्या शाळेशी,संस्थेशी कायम बांधील रहा व शाळेचा नावलौकिक वाढविण्याचा नेहमी प्रयत्न करा असे सांगितले .चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करायला शिका असे मार्गदर्शनपर उद्गार पाटील यांनी व्यक्त केले.
संस्थाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.यामध्ये विद्यार्थ्यांनी असेच उत्तमोतम गुण मिळवावेत . दहावी ही काळाची गरज आहे . यानंतर शिक्षणाचा एक परीघ पूर्ण होतो . यापुढील जीवन हे स्पर्धेचे आहे.यात तुम्हाला अभ्यास वाढवावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी जीवनाच्या अथांगसागरात स्वावलंबन , परिश्रम, स्वकष्ट आणि सिंहावलोकान करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले आहे यामध्ये तुमच्या पालकांचाही तितकाच सहभाग आहे त्यांना विसरू नका नावलौकिक मिळावा असा सल्ला त्यांनी दिला.
शाळेतील शिक्षिका अमिता बांदेकर यांनी सांगितले,
स्पर्धा करायची असेल तर स्वतःशी करा. मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका. असेच उत्तरोत्तर यश संपादन करा. यशाची शिखरे सर करत असताना शाळेला, संस्थेला विसरू नका असे सांगितले.
यावेळी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये संस्थेच्या सर्व शाळांमधून प्रथम - आयुष गणेश कान्हेरे,द्वितीय - हर्षाली दीपक गुजर आणि हिमांशी महेंद्र जाधव , तृतीय - निहारिका निरंजन कोठावदे यांसह प्रत्येक शाळेमधून पहिल्या तीन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले .
तसेच संस्थेच्या सर्व शाळांमधून रामचंद्रनगर इंग्रजी माध्यम शाळेचा निकाल 100% लागला. यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका वैभवी सावंत यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रथम क्रमांक प्राप्त आयुष कान्हेरे आणि द्वितीय क्रमांक प्राप्त हर्षाली गुजर या दोघांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला हे यश प्राप्त झाले. तसेच शाळेच्या स्कॉलर बॅच आणि कृतीपेढी या पुस्तिकेचा फायदा झाल्याचे देखील मुलांनी म्हटले.
होमी भाभा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यासारख्या स्पर्धा परीक्षांना अधिक संख्येने विद्यार्थी बसवून शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या विष्णुनगर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भावना प्रकाश राठोड आणि अरुणोदय प्राथमिक चे मुख्याध्यापक सुरेश जगन्नाथ नारोळे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नॅशनल लेव्हल साठी दिल्लीमध्ये जाऊन अरुणोदय माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ऍथलेटिक्स मध्ये घवघवीत यश मिळवले . याबद्दल या शाळेतील विद्यार्थ्यांना व क्रीडा शिक्षक रवींद्र तानसिंग पवार यांना देखील गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती नाईक यांनी केले . आभार संस्थेचे सहकार्यवाह प्रमोद उंटवाले यांनी मानले. यावेळी संस्था कार्यकारणी सदस्य ,मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.