नाशकात उबाठा गटाला खिंडार! अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
17-Jun-2025
Total Views |
मंबई : नाशिकमधील उबाठा गटाच्या अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, १७ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाने उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे.
यावेळी उबाठाच्या नाशिकमधील युवती सेना उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविका किरण बाळा दराडे, नाशिक महापालिकेच्या माजी महिला बाल कल्याण सभापती सीमा गोकुळ नगळ, माजी सभापती पुंडलिक अरिंगले, माजी नगरसेवक पुनजाराम गामणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. याप्रसंगी शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, नाशिक जिल्हाप्रमुख व उपनेते अजय बोरस्ते तसेच शिवसेना सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आज फक्त प्रतीकात्मक प्रवेश असून नाशिकमध्ये मोठा प्रवेश मेळावा घेण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे शिवसेना आणि नाशिककरांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तुमच्या प्रवेशामुळे हे नाते आणखी मजबूत होईल. तसेच नाशिकच्या औद्योगिक भागांत विकास करण्यास चालना देणार आहोत."
"राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून आणि तालूक्यातून शिवसेनेत प्रवेश सुरु आहेत. याचे कारण आपण विकासाच्या मुद्दयाला महत्व दिले आहे. मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचे काम केले. लोकाभिमूख कल्याणकारी योजना केल्या. त्यामुळेच राज्यातील लोकांनी विश्वास ठेवून आपण ८० पैकी ६० जागा जिंकलो. महाराष्ट्रात शिवसेना वेगाने पुढे जात आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचे विचार आणि विकासाचे वारे घेऊन आपण पुढे जात आहोत. तुम्ही सगळे दुसऱ्या पक्षात नाही तर स्वगृही आल्या आहात," असेही ते यावेळी म्हणाले.