मुंबईत भरणार देशातील पहिला ‘रेडिओ’ महोत्सव - आशिष शेलार यांची घोषणा; मराठी भाषा आणि कलाकारांसाठी नवे व्यासपीठ

    17-Jun-2025   
Total Views | 11


मुंबई :
 जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून दि. २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देशातील पहिल्या सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव, तसेच महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. १७ जून रोजी केली.

मंत्रालयातील विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दि. २१ जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ रेडिओ पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेलार म्हणाले, रेडिओ क्षेत्राला गौरव देणारा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. राज्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपण्याचे काम रेडिओ मार्फत झाले आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती आजही रेडिओ मार्फत जतन करण्यात आल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ साक्षीदार आहे. महाराष्ट्रात जशी आकाशवाणीने भूमिका निभावली आहे. तसेच खासगीकरणाच्या एफएम चॅनेल आणि कम्युनिटी रेडिओनेही भूमिका अधोरेखित केली आहेत.

मराठी संगीत, गाणी, शास्त्रीय संगीत जपणारे, उदयमशील आणि सृजनशील रेडिओ चॅनलला प्रोत्साहन मिळावे यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. मराठी निवेदक, मराठी अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक, तंत्रज्ञ, संपादक यांना एक व्यासपीठ मिळावे. त्यांच्या माध्यमातून मराठी कला, साहित्य, संस्कृतीचे जतन करण्यात यावे. तसेच ज्या रेडिओच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन, राजकारण, सामाजिक जाणीव यासाठी भरीव योगदान दिले आहे त्यांना यामध्यमातून योग्य सन्मान देण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात आशा रेडिओ गौरव पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील अग्रगण्य नाव असणाऱ्या "महाराष्ट्र भूषण आशा भोसले" यांच्या नावाने देण्यात येणार आहे. आशा भोसले यांचे संगीत क्षेत्रातील एकूण योगदान लक्षात घेता हे नाव देण्याचे शासनाने निश्चित केल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र आशा सर्वोकृष्ट रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ सामाजिक कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ महिला निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित रेडीओ निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडीओ मराठी निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम, आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा मराठी कार्यक्रम आणि आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम असे या पुरस्कारांची नावे असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार हे नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात येतील. यासाठी संबंधित कलाकार तंत्रज्ञ रेडिओ केंद्र यांनी विहित नमुन्यातील माहिती संचालनालयास सादर करावी लागेल. मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. यासाठी रेडिओ क्षेत्रातील तज्ज्ञ कलाकार तंत्रज्ञ अभ्यासक यांसारख्या शासकीय सदस्यांच्या माध्यमातून पुरस्कार मुर्तींची निवड करण्यात येईल, असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री रेडिओद्वारे साधणार संवाद

या पुरस्कार सोहळ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांशी रेडिओ निवेदक संवाद साधणार आहेत, तर दुसऱ्या भागामध्ये रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्याच्या पार्श्वभूमीत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी किस्से यांचे सादरीकरण प्रथितयश कलाकारांच्या माध्यमातून होईल. सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, संजीवनी भेलांडे अशा नावाजलेल्या कलाकारांच्या सादरीकरणातून सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र करणार आहेत. या कार्यक्रमांला प्रवेश विनामुल्य असून सन्मानिका सांस्कृतिक कार्य संचालनालयात दि. १९ जूनपासून उपलब्ध होतील. सर्व रेडिओ प्रेमींनी आणि रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मंत्री शेलार यांनी केले आहे.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंचा युतीबद्दल

राज ठाकरेंचा युतीबद्दल 'वेट अँड वॉच', उबाठा मात्र, सेलिब्रेशनमध्ये व्यस्त! मुलाखतीत म्हणाले, "आता राज पण..."

(Uddhav Thackeray Saamana Interview) उबाठा खासदार संजय राऊत यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. ‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे. मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर टीझर पोस्ट करुन माहिती दिली आहे. १९ आणि २० जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे मिळणार, असेही या टीझरमधून सांगितले जात आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121