कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात एक अनोखी घटना घडली आहे. शार्लेट नावाची २० वर्षांची तरुणी डॉक्टरकडे गेली होती. तिच्या पोटात वेदना होत होत्या. ती महिला डॉक्टरकडे गेली, तिच्या डॉक्टरांनी काही नियमित तपासण्या केल्या. पण रिपोर्ट पाहून डॉक्टरही थक्क झाले. कारण शार्लेट प्रेग्नंट होती.
तिला प्रेग्नेंसीबद्दल काहीच माहिती नव्हती. तिला उलट्या, थकवा, पोट वाढणं अशी कोणतीही लक्षणं नव्हती. त्यामुळे तिला अजिबात कल्पना नव्हती की, ती आई होणार आहे. आश्चर्य म्हणजे हे समजल्यावर फक्त १७ तासांतच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. शार्लेटने एका मुलाला जन्म दिला. बाळही निरोगी आहे आणि शार्लेटही पूर्णपणे ठीक आहे. डॉक्टरांनी सांगितलं की अशा प्रकारच्या प्रेग्नन्सीला "क्रिप्टिक प्रेग्नन्सी" म्हणतात.
तिला वाटले की, तिला पोटाची समस्या आहे. पण ती आई होणार आहे, हे तिच्यासाठीच नाही तर तिच्या कुटुंबासाठीही मोठा सुखद धक्का ठरला. बाळ जन्माला आल्यावर तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. बाळ निरोगी असून त्याचे वजन सुमारे ३ किलो होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बाळाची वाढ ही पूर्ण झालेली आहे. शार्लेट सांगते, "माझं संपूर्ण आयुष्य एका दिवसात बदललं. मी अजूनही विश्वास ठेवू शकत नाही." सध्या शार्लेट आणि तिचं बाळ दोघंही घरी आहेत. ते सुरक्षित आणि सुखरूप आहेत. या घटनेनंतर अनेक लोकांनी सोशल मीडियावर शार्लेटला शुभेच्छा दिल्या आहेत.
क्रिप्टिक प्रेगेंन्सी म्हणजे काय?
क्रिप्टिक प्रेगेंन्सी ही एक दुर्मीळ अवस्था आहे. क्रिप्टिक प्रेग्नेंसी म्हणजे 'गुप्त गर्भधारणा'. यामध्ये महिलेला तिच्या गर्भावस्थेची कल्पना नसते, किंवा तिला गर्भधारणेची लक्षणे जाणवत नाहीत, किंवा ती लक्षणे ओळखायला ती अयशस्वी ठरते आणि जेव्हा तिला बाळंतपण जवळ येतं, तेव्हा तिला गर्भधारणेची जाणीव होते. यादरम्यान मासिक पाळीही काही महिलांमध्ये सुरूच राहते. त्यामुळे अनेकांना आपल्या गर्भधारणेबाबत कळतच नाही.