मुंबई : राज ठाकरेंवर अवलंबून असलेले पक्ष त्यांच्यासोबत युती करण्यासाठी उतावीळ झाले आहेत, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी उबाठा गटावर केली आहे. बुधवार, १६ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, "ठाकरे बंधूंचा मेळावा हा मराठी माणसांचा मेळावा होता, असे राज ठाकरेंनी सांगितले आहे. युतीच्या बाबतीत ते सक्षम आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. राज साहेबांचा एक स्वतंत्र विचार असतो. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. ते कुठल्याही पक्षावर अवलंबून नाहीत. परंतू, जे काही पक्ष त्यांच्यावर अवलंबून आहेत ते त्यांच्यासोबत युती करण्यासाठी उतावीळ झाले आहेत. त्यामुळे ज्यावेळी बोलायचे त्यावेळी मी बोलेन. युती कुणाशी आणि कधी करायची हे मला चांगले कळते, असा राज ठाकरेंचा मतितार्थ आहे," असे ते म्हणाले.
हा उद्योग अभ्यास करण्यासारखा!
"नितेश राणे साहेबांच्या खात्याची जाहिरात आणि त्यावर एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो सामनाला चालायला लागला हे चांगलेच लक्षण आहे. सकाळी बोलतात ते याच्याशी सहमत आहेत की, नाही ते माहिती नाही. पण सामनातून आमच्यावर प्रचंड टीका करायची, आम्हाला बदनाम करायचे आणि सामना चालण्यासाठीची जाहिरात आमच्याच शासनाकडून घ्यायची हा उद्योग अभ्यास करण्यासारखा आहे. आम्ही याला विकतचे शिव्या घालून घेणे म्हणतो," असा टोलाही मंत्री उदय सामंत यांनी लगावला.
पक्षाच्या प्रतिमेला त्रास होईल अशी वक्तव्ये करू नका!
"स्वातंत्रवीर सावरकर स्मारक येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी सांगितले की, मंत्री, आमदार, पदाधिकारी या सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या प्रतिमेला त्रास होईल अशी वक्तव्ये करू नये, असे आदेश त्यांनी दिले. चुकीच्या वक्तव्यांमुळे पक्षाला त्रास होतो. मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर त्याचा आक्षेप येतो. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी अशा पद्धतीने वागू नये, असे अधिकारवाणीने त्यांनी सांगितले. त्यात कुठलेही राजकारण नाही," असेही उदय सामंत यांनी सांगितले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....