लोकमान्य टिळक यांचे पणतू, 'केसरी'चे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांचे निधन

    16-Jul-2025   
Total Views |

पुणे : (Dr. Deepak Tilak) लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे अल्पशा आजाराने बुधवारी पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा डॉ. रोहित टिळक, मुलगी डॉ. गीताली टिळक, नातवंडे असा परिवार आहे. आज (बुधवारी) सकाळी ८ ते ११ वाजताच्या दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी बारा वाजल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. वसंत व्याख्यानमाला, टिळक स्मारक मंदिर, हिंदू महिला अनाथ आश्रम, वेदशास्त्नोत्तेजक सभा या संस्थांचे ते अध्यक्ष होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते विद्यमान कुलपती होते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा त्यांनी पुढे नेला. २०२१ मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

लोकाभिमुख सामाजिक संस्थाचा आधारस्तंभ हरपला - मुख्यमंत्री

डॉ. दीपक टिळक यांच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. "लोकमान्य टिळक यांचा महाराष्ट्रातील समाजकारणातील विविधांगी क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालविणारे लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला आहे", अशा शोकभावना देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणालेत की, लोकमान्य टिळक आणि त्यांचे सुपुत्र दिवंगत जयंत टिळक यांच्याकडून मिळालेला वारसा डॉ. दीपक टिळक यांनी समर्थपणे चालविला. ते राजकारणात फारसे रमले नाहीत. पण लोकमान्य टिळक यांनी पाया घातलेल्या दैनिक केसरी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य त्यांनी तितक्याच जबाबदारीने सांभाळले. यातून ते कित्येक सामाजिक संस्था, संघटना, विश्वस्त मंडळांचे आधारस्तंभ ठरले. त्यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना समाजातून पाठबळ मिळत राहिले. डॉ. टिळक हे व्यवस्थापन आणि पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासक, संशोधक राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक होतकरू युवकांनाही या क्षेत्रातील संशोधनाची प्रेरणा मिळाली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे कार्य केले आहे. डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक असे उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले आहे. ही या क्षेत्रासाठी हानी आहे. डॉ. टिळक यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर, विविध संस्था, संघटना आणि सामाजिक उपक्रमांशी निगडित कार्यकर्ते यांच्यावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वराला प्रार्थना करतो. डॉ. दीपक टिळक यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

"केसरीचे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, 'केसरी'सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला", अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121