मुंबई : प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे समर्थन कुणीच करू शकत नाही. आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी तो आरोपीच आहे, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, १५ जुलै रोजी दिली.
विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे समर्थन कुणीच करू शकत नाही. एखाद्या आरोपीला वाचवण्यासाठी आम्ही धडपड करू ही आमची वृत्ती नाही. आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी तो आरोपीच आहे. मी कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला फोन केलेला नाही. सीडीआर काढा, कुठलाही संवाद सापडणार नाही. संभाजी ब्रिगेडबद्दल आमचे काही वेगळे मत असेल तर आम्ही आमच्या बैठकीत ते व्यक्तिगत मांडू. पण अशा प्रकारे भ्याड हल्ला करणे योग्य नाही. त्यामुळे या घटनेचे समर्थन नाही. यावर पोलिसांनी पूर्ण कारवाई केली असून त्यांना या प्रकरणात सगळी कारवाई करण्याचा अधिकार आहे. मी कधीही कोणत्याही पोलिसाला कुठलाही फोन केला नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
तुकडेबंदी कायद्याची अधिसूचना लवकरच “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, अधिवेशन संपण्यापूर्वी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची अधिसूचना काढण्यात येईल. १ हजार चौ. फुटांपर्यंतचे प्लॉट कायदेशीर करण्यासाठी एसओपी तयार करून, नागरी भागातील रहिवाशांना दिलासा दिला जाईल," असेही त्यांनी सांगितले.
संस्कार, संस्कृती ही राजकीय असू नये“कौटुंबिक कार्यक्रमात भाऊ एकत्र येतात हे संस्कृतीचे लक्षण आहे. ते एका विषयावर एकत्र आले आहे. दोन भावांनी एकत्र आले तर काय बिघडते? हीच आपली संस्कार आणि संस्कृती आहे. पण संस्कार, संस्कृती ही राजकीय असता कामा नये. मी त्यांना सल्ला देण्याची गरज नाही. पण राजकीय भूमिकांमध्ये दोघे वेगळे आहेत. यामध्ये त्यांनी दोघांनी एकत्र येऊन काम केले तरी आम्हाला अडचण नाही आणि त्यांचे वेगळे विचार असले तरीही आम्हाला अडचण नाही. कितीही लोकं एकत्र आले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५१ टक्के मते घेऊन भाजप आणि महायुती जिंकेल, हा आमचा मानस असून तशी तयारी आम्ही सुरू केली आहे," असे त्यांनी सांगितले.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच!"आज सायंकाळी महायुतीची बैठक होणार असून त्यात आम्ही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा करू. या निर्णयाला खूप दिवस झाले आहेत. जितके दिवस हा निर्णय प्रलंबित राहील तेवढे दिवस रायगड आणि नाशिकच्या विकासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय होण्यासाठी आम्ही चर्चा करू," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.